दिनविशेष फक्त ‘भिंतीवर’ न राहता घरात असणाऱ्या, घरात येणाऱ्या, घरावरून जाणाऱ्या सगळ्यांच्या नजरेस पडले तर.. ही अभिनव कल्पना रोहिणी दळवी यांच्या मनात आली आणि ती प्रत्यक्षातही उतरली. त्यासाठी त्यांनी दारातल्या रांगोळीचे माध्यम वापरले. त्यांच्या या अभिनव रांगोळ्यांविषयी..

२० १६ ला निरोप देण्याची घटिका आता अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. नवीन वर्षांचं स्वागत करण्याची अहमहमिका सर्व प्रसारमाध्यमांतून व्यक्त होत आहे. आपल्याबरोबर अज्ञात गोष्टींचा खजिना घेऊन हे नवीन वर्ष मावळतीच्या क्षितिजावर  रेंगाळलेले आहे. रंगीबेरंगी दिव्यांचा लखलखाट, माणसांनी फुललेले रस्ते, मुक्त विहार करणारी तरुणाई, त्यांच्या हास्यविनोदांचे रंगतरंग अशा चैतन्यदायी वातावरणात ‘रात्री’चा दिवस होऊन २०१७ ची प्रसन्न पहाट उजळणार आहे. या  बदलाची जाणीव भिंतीवरील नवीन दिनदर्शिका करून देत असते.

Careers for Dancers
चौकट मोडताना : नुपूरचे नृत्य
horse decorated with worth rs two lakh stolen from wedding destination
वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

प्रथमदर्शनी त्यातील लाल रंगातले आकडे सुट्टय़ांचं गुपित फोडून टाकतात. गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी यांचे ‘वेळापत्रक’ हातात आल्यामुळे रजेच्या व्यवस्थापनाच्या चर्चा रंगात येतात. बारा पानांचा धावता आढावा घेऊन झाला की मात्र महिन्याचं पान स्थिरावतं आणि दिनविशेष खुणावू लागतात. सर्वसाधारणपणे चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावास्या अशा तिथी मोदक, झेंडा, पूर्ण चंद्र अशा प्रतीकांच्या रूपात चौकटीतल्या तारखांच्या डोक्यावर बसून आपलं वेगळेपण दर्शवत असतात. इंग्रजी महिन्यांशी मराठी महिन्यांची सांगड घालत असतात.

असे दिनविशेष फक्त ‘भिंतीवर’ न राहता घरात असणाऱ्या, घरात येणाऱ्या, घरावरून जाणाऱ्या सगळ्यांच्या नजरेस पडले तर.. ही अभिनव कल्पना रोहिणी सुहास दळवी यांच्या मनात आली आणि ती प्रत्यक्षातही उतरली. त्यासाठी त्यांनी दारातल्या रांगोळीचे माध्यम वापरले. ‘स्वर्भूसंग असा तयात इतक्या, अप्लावकाशी नसे, कोणी दाखविला अजून सुभगे, जो साधिला तू असे.’

आकाश व जमीन यांचा अगदी कमी जागेत मोहक मेळ घालून चितारल्या जाणाऱ्या रांगोळीचा वारसा जपतच रोहिणी सासरी आल्या. आई-वडिलांकडून रंगरेषांचं वळण लाभलेला ‘हात’ होता. लहानपणी चित्रकलेची वही पूर्ण करताना कां कूं करणारा हा हात, स्वत:च्या घराच्या उंबरठय़ाशी रांगोळी रेखताना कल्पकता दाखवू लागला. मोठय़ा अंगणाची सवय त्यामुळे केवळ आठ इंच ७ दहा इंच जागेत आनंदनिर्मिती म्हणजे त्यांची परीक्षाच होती. पण सुपारी, बांगडी अशा घरगुती ट्रिक्स व रंगवलेली रांगोळी (रंग + रांगोळी या समीकरणापेक्षा बाजारात मिळणारी रंगवलेली रांगोळी सोईस्कर होते) यांचा उपयोग करून काढलेली मनभावन रांगोळी पाहताक्षणी कौतुकास पात्र ठरू लागली. जमिनीऐवजी ग्रॅनाइटचा तुकडा ठेवण्याचा प्रयोग केला, पण त्याच्या उंचीने दरवाजा पूर्ण उघडता येईना. विचारांती गडद तपकिरी रंगाच्या सनमायकाच्या (८”७१०”)  चौकोनाच्या रूपाने उत्तम पर्याय सापडला आणि रांगोळीला उठाव आला.

दिव्याच्या अमावास्येला गोपद्माचा ‘दीप’ रेखाटून त्यांनी दीपपूजन केले. स्वत:च्या कल्पनेवर त्या स्वत:च खूश झाल्या. दिनविशेष सांगण्याची ही चित्रभाषा त्यांना आवडली. ज्यांना, घरात दिनदर्शिका असूनही, ‘आज दिव्याची अमावास्या आहे’ हे माहीत नव्हतं, त्यांनी जातायेता रांगोळी बघून ‘या’ दिवसाची नोंद घेतली. संस्कृतिसंवर्धनाचा आनंद अचानक गवसला. प्रतिसाद देण्यासाठी घराची बेल वाजत राहिली. या आगळ्यावेगळ्या  रांगोळीतून दिनविशेषाबरोबरच, स्वत:ची ‘ओळख’ करून देताना, ओळखीचा परीघ आपोआप विस्तारत गेला.

अमावास्येला चितारलेल्या ‘दिव्या’चा प्रकाश पडत गेला आणि वेगवेगळे ‘दिन’ रोहिणीच्या दारात रंगत गेले. श्रावणात रिमझिम पावसाळ्यातील इंद्रधनुष्याबरोबरच रंगीबेरंगी फुलं तिथे उमलली. राखीबरोबरच  गोकुळाष्टमीला ‘बासरी’ अव्यक्तपणे सूर लावून गेली. स्वातंत्र्य दिनाला झेंडा लहरला. नवरात्रात घटस्थापनेला जशी देवीची पावलं उमटली तसा देवीचा मुखवटाही दर्शनसुख देऊन गेला. नवरात्राचे नऊ रंग झळकले. ‘आजचा रंग कुठला’ हे विसरायला झालं तर पावलं पटकन रोहिणीच्या दारात थबकू लागली. एकादशीला भगव्या झेंडय़ाचं रिंगण घातलं गेलं. कधी प्रतीकात्मक विठोबा दारात उभा राहिला. कोजागिरीचा चंद्र शुभ्रतेचा सात्त्विक आनंद देऊ लागला. खंडोबाच्या  नवरात्रात रांगोळीने पिवळ्या रंगाचा भंडारा उधळला. त्याचा रंग अनेक दिवस टिकला. तुळशीच्या लग्नाला तुळशीचं वृंदावन मोरपीस लावून सज्ज झालं. नागपंचमीला नागोबा डोलू लागला. कोजागिरीला केशरी दुधात केशर जास्त झालं, अशी मसालेदार प्रतिक्रियाही उमटली. ख्रिसमसला घंटा निनादली.   दत्तजयंतीला रुद्र, शंख, त्रिशूळ या प्रतीकांनी ‘दत्त’ दत्त झाले. संक्रांतीला तिळगूळ वाटला गेला. अक्षय्य तृतीयेला ‘कलश’ ठेवला गेला. कधी मोर ‘मन मांगे मोर’ची भावना व्यक्त करू लागला. रथसप्तमीच्या निमित्ताने सात दिवस सूर्यगोल ही संकल्पना चित्रित झाली. नवीन वर्षांसाठी वेलकम्ची स्माइली बघणाऱ्यांना हसवू लागली.

झाडावरचं  फूल कोणी पटकन् तोडून आणलं की ‘अरेरे ते कसं फुललेलं होतं? त्या वेळी झाडावर कसं दिसत होतं? मला बघायचं होतं,’ असं संवेदनशील मन असलेली रोहिणी काही ‘दिनविशेष’ नसताना  अनेक लक्षणीय आकृतिबंधांनी रांगोळी सजवत असते. गणेश चतुर्थीला रांगोळी काढताना असं नावीन्य रंगवावं असं सुचलं आणि तेव्हापासून ‘तो’च माझ्याकडून करवून घेतो अशी त्यांची श्रद्धा आहे.

दारातली रांगोळी ही सौंदर्याची, मांगल्याची ‘भाषाच’ असते. आकाराने अगदी छोटी असते. अनेक घरं हे संस्कृतिवैभव जपत असतात. रोहिणी यांचं वेगळेपण असं की त्यांनी त्या छोटय़ाशा जागेत त्यात रंग भरले. आणि दिवसाचा ‘अर्थ’ स्पष्ट केला. तोही सातत्य जपून. ही रंगीत ‘दिन’दर्शिका बघताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी एका व्याख्यानात दिलेल्या दृष्टांताची आठवण होते. ते म्हणाले, ‘‘रांगोळी पुसली जाणार आहे याचे गृहिणीला भान असते. पण म्हणून ती वाटेल तशी रांगोळी काढत नाही. रांगोळी मनापासूनच काढते.’’  सूर्य उगवतो, ‘पूर्वा’ उजळते आणि त्या दिवसाचं प्रतिबिंब रोहिणीच्या रांगोळीत उमटतं. नवीन वर्ष उद्यावर येऊन ठेपलंय, बघूया ही ‘दिन’दर्शिका आपल्यासाठी काय ‘विशेष’ घेऊन येतेय ते!