मागील काही लेखांतून आपण घरातील वातावरणात ठेवण्यायोग्य झाडांच्या प्रजातींची माहिती घेत आहोत. त्यात विविध रंगांच्या पानांचे प्रकार असलेल्या अनेक प्रजातींबद्दल आपण जाणून घेतले आहे. आज आपण काही फुलझाडांविषयी जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे झाडांना फुलण्यासाठी कडक सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाशात फुलणाऱ्या प्रजातींची संख्या कडक सूर्यप्रकाशात फुलणाऱ्या प्रजातींच्या मानाने कमी आहे. त्यातील काही प्रजातींविषयी या लेखातून जाणून घेऊया.

हेलिकोनिया (Heliconia)

हेलिकोनियाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. काही कमी उंचीचे, काही मध्यम उंचीचे तर काही उंच वाढणारे. आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार यातील प्रकारांची निवड करावी. या झाडांची वाढ कंदांपासून होत असते. त्यामुळे याला मध्यम ते मोठय़ा आकाराच्या कुंडीत किंवा मोठय़ा ट्रफ (ळ१४ॠँ) मध्ये लावावे. याच्या कुंडीतील माती भुसभुशीत आणि भरपूर सेंद्रिय खतयुक्त असावी. या झाडाला दिवसातील काही वेळ सूर्यप्रकाश आणि नंतर भरपूर उजेड मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. याच्या फुलांचे तुरे फुलदाणीत ठेवता येतात. हे तुरे बरेच दिवस टवटवीत राहतात. लावलेल्या झाडाच्या कंदाची वाढ होऊन त्यातून नवीन झाडेही वाढतात. अशा झाडांनी कुंडी संपूर्ण भरल्यावर ही झाडे त्यातून काढून वेगळी करून वेगवेगळ्या कुंडय़ांमध्ये लावावी, जेणेकरून एका कुंडीत खूप झाडांची गर्दी होणार नाही. या झाडाला साधारणपणे उन्हाळ्यात व पावसाळ्यात फुले येतात.

स्पेदीफायलम (Spathiphylum)

कमी उंचीची ही झाडे त्याची गडद हिरवी पाने आणि पांढरी फुले यामुळे आकर्षक दिसतात. याच्या फुलांचा आकार नागफणीसारखा असतो. या झाडांना उजेडाच्या जागी ठेवावे. कुंडीतील मातीत सेंद्रिय खतांचे प्रमाण व्यवस्थित असावे. त्यात थोडे कोकोपिट वापरले तरी चालते. कुंडीतील मातीत ओलावा असणे गरजेचे असते. त्यामुळे या झाडांची वाढ चांगली होते. झाडांची वाढ होऊन त्यातून नवीन झाडे येत असतात. कुंडी पूर्ण भरल्यावर झाडे वेगळी करून लावावीत.

हायड्रेनजिया (Hydrangea)

मध्यम उंचीचे हे झाड त्याच्या फुलांच्या गुच्छांमुळे आकर्षक दिसते. याच्या कुंडीतील माती भुसभुशीत व भरपूर सेंद्रिय खत असलेली असावी. याच्या चांगल्या वाढीसाठी मातीत ओलावा असणे गरजेचे असते. जमिनीच्या सामू (स्र्ऌ) प्रमाणे याच्या फुलांच्या गुच्छांचा रंग निळा किंवा गुलाबी असतो. याची कुंडी दिवसातील थोडा वेळ सूर्यप्रकाश आणि नंतर भरपूर उजेड मिळेल अशा ठिकाणी ठेवावी. झाडे फुलून गेल्यानंतर याची छाटणी करावी.

वरील सर्व झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना ८ ते १० दिवसांतून एकदा काही तासांसाठी गॅलरीत किंवा बाहेरील मोकळ्या वातावरणात ठेवणे गरजेचे असते. ही सर्व झाडे बागेतही लावली जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jilpa@krishivarada.in