आरशाचा वापर हा अगदी पूर्वापारपासून चालत आला आहे. पण आज जो आरसा पाहतो तो आधुनिक आरसा १८३५ मध्ये बनवला गेला असं मानतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजदेखील भव्य महाल असो वा चंद्रमौळी झोपडी, आरशाशिवाय पान हलत नाही. प्रत्येक घरी आरसा हा असतोच. पूर्वी राजे-महाराजे त्यांच्या महालात अतिशय कलात्मकतेने आरशाचा वापर करत. आजच्या काळातदेखील इंटिरियरमध्ये आरशाचा मोजकाच, पण कल्पकतेने वापर केला जातो. काही जणांना येता-जाता आरशात आपली छबी न्याहाळायची सवय असते. खास त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आरसे बसवून घेणारे महाभागही आहेत.

सर्वसाधारणपणे आरसा हा ड्रेसिंग टेबलवर, वॉशबेसिनवर लावला जातो. पण इतर ठिकाणीही आरशाचा वापर केला जाऊ शकतो. आपण डिस्प्ले युनिटस्मध्ये आरसा वापरता येतो. टीव्ही युनिटमध्ये जर काचेचे शोकेस / डिस्प्ले युनिट असेल अथवा क्रोकरी युनिट असेल तर बॅक प्लायला आरसा फिक्स केलाजातो व टॉप प्लायला एखादा स्पॉट लाइट फिक्स केला जातो. याचा एकत्रित परिणाम खूप छान येतो. मागील बाजूस लावलेल्या आरशांमुळे युनिटमध्ये ठेवलेल्या सुंदर वस्तूंचे प्रतिबिंब दिसते व स्पॉट लाइटमुळे युनिट उजळून निघते. त्यामुळे ते युनिट अप्रतिम दिसते.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर काही घरांमध्ये लॉबी असते. या लॉबीमध्ये आरशाचा वापर करता येतो. जेणेकरून त्या लॉबीमधील अरुंदपणा कमी भासतो. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर भिंत असेल तर त्या भिंतीवरदेखील आरसा लावता येईल. त्यामुळे एक छान इफेक्ट येतो.

काही रूम्सचा आकार विचित्र असतो. काही विचित्र कोपरे किंवा ऑफसेटस् असतात. त्यामुळे ती रूम अतिशय अवघडलेली भासते. अशा वेळेस त्या रूमच्या लेआऊटचा व्यवस्थित अभ्यास करून त्या रूमचा आकार बदलू शकतो. अर्थातच आरसा हा त्या रूमचा आकार बदलू शकत नाही, पण असे भास निर्माण करू शकतो. जेणेकरून त्या रूमचा अवघडलेपणा जाऊ शकतो.

रूमचा आकार लहान असल्यास आरशाच्या योग्य वापराने रूम आकाराने मोठी भासू शकते. पण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला  घेणे योग्य ठरते. चुकीच्या प्रकारे आरसा लावल्याने रूमचा समतोल बिघडू श्कातो व प्रतिकूल परिणाम होतो. जसा रूमचा लहान आकार मोठा भासवण्यासाठी आरशाचा उपयोग होतो तसाच रूममध्ये सूर्यप्रकाश कमी आल्याने जर रूम अंधारी असेल तर त्यावर उपाय म्हणूनही आरशाचा उपयोग होऊ शकतो. आरशाच्या योग्य वापराने रूम प्रकाशमान होते.

आरसा रूम पार्टिशन्समध्येही वापरता येतो. तसेच दरवाजांच्या पॅनल्समध्येही आरशांचा सुंदर वापर करता येतो. आरसा हा कधीही थेट भिंतीवर फिक्स करू नये. आरसा ६ एम एम जाडीच्या मरीन प्लायवर फिक्स करावा व तो प्लाय भिंतीवर टांगावा. प्लायवूडवर आरसा चिकटवू नये. त्यामुळे आरशाला तडे जाण्याची शक्यता असते. आरसा खरेदी करण्याआधी त्याला स्क्रूसाठी भोकं पाडून घ्यावीत व तो मिरर स्क्रूच्या साहाय्याने प्लायवर फिक्स करावा. तसेच आरसा फिक्स करण्यासाठी खास हार्डवेअर फिटिंग्जही मिळतात. आरसा लावण्याची जागा अतिशय काळजीपूर्वक ठरवावी. चिल्ड्रेन्स बेडरूममध्ये आरसा व काच लावणे कटाक्षाने टाळावे, कारण मुलांच्या खेळात आरसा फुटून भयंकर इजा होऊ शकते. तसेच खुच्र्या-टेबल लागून आरशाला तडे जाऊ शकतात. त्यामुळे डायनिंग व सिटिंग एरियामध्ये जागा अभ्यासून आरशाची जागा ठरवावी. आरशाच्या पाण्याची जास्त संपर्क होऊ देऊ नये.

आरसा नेहमी साफ ठेवावा. त्यावरील डाग व हाताबोटांचे ठसे अतिशय गलिच्छ दिसतात. आरसा हा वर्तमानपत्राने छान साफ होतो तसेच आरसा साफ करण्यासाठी खास लिक्विड सोपही बाजारत उपलब्ध आहेत.

नेहमीच्या आरशांबरोबरच अनेक डिझाइनर आरसेही बाजारात उपलब्ध आहेत. अनेक प्रकारची ट्रीटमेंट आरशांवर करता येते. आपल्याला हवे तसे डिझाइन आरशावर करून घेता येते. आरसा मात्र उत्तम दर्जाचाच घ्यावा जेणेकरून त्यात प्रतिबिंब चांगलं दिसेल व आरसा जास्त काळ टिकेल.

आपल्या रूमच्या इंटिरियरमध्ये आरशाची गरज असेल तरच आरसा वापरावा. आरसा आवडतो म्हणून त्याच्या वापराचा अट्टहास टाळावा.

कोणत्या रूममध्ये व कशासाठी आरसा वापरायचा आहे यांच्या योग्य अभ्यासाअंती आपण आपल्या इंटिरिरमध्ये मिरर मॅजिक करू शकता.

(इंटिरियर डिझाइनर)

ajitsawantdesigners@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home decor by glass
First published on: 19-11-2016 at 01:12 IST