एखाद्या व्यक्तीशी वैचारिक नाळ जुळणं, संसारात आयुष्याच्या जोडीदाराबरोबर चांगले सूर जुळणं किंवा शाळा-कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांमध्ये विशिष्ट मुलांची मत्री होऊन त्यांचे गट तयार होणं या सगळ्या प्रक्रियेचा जर नीट, खोलवर आणि साकल्याने विचार केला; आणि हे नेमकं घडतं कसं, याचा शोध घ्यायला गेलं तर प्रामुख्याने काही गोष्टी जाणवतात. कधी वैचारिक पातळीवरती दोन किंवा अधिक व्यक्तींची काही गोष्टींबाबत ‘वेव्हलेंग्थ’ जुळते म्हणजेच विचार जुळतात. म्हणजेच मतक्य अथवा सारखेपणा असल्यामुळे त्या दोन एकत्र आल्या तर संसार सुखाचा होतो. किंवा अशा समविचारी व्यक्तींचा समूह तयार झाला, तर एखादी चांगली संस्था किंवा सामाजिक कार्यही घडू शकतं. अर्थात असे गट आयुष्याला उठाव आणतात; पण केवळ समविचारी असून भागत नाही, तर कधीकधी एखाद्या व्यक्तीकडे ज्या गोष्टीची किंवा गुणांची कमतरता आहे, त्या बाबतीत दुसऱ्या व्यक्तीकडे असलेल्या त्या गुणामुळे पहिली व्यक्ती तरून जाते. कमी बोलणाऱ्या किंवा व्यवहारापेक्षा भावनेवर अधिक जगणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा जोडीदारापाशी जर वाक्चातुर्य आणि व्यवहारचातुर्य हे गुण असतील तर संसार तरून जातो. हेच दोन सच्च्या मित्रांनाही लागू आहे; पण हेही सरसकट लागू नाही, तर काही बाबतीत व्यावहारिक संकुचितपणापेक्षा मनाचा भावनिक मोठेपणा हा खूप काही समाधान आणि माणुसकीचं मोठेपण देऊन जातो, अशा ठिकाणी मात्र दुसऱ्या जोडीदाराचं अशा बाबतीतलं उणेपण हे पहिल्यामुळे दुणावतं. म्हणजेच एखाद्या विशिष्ट परिस्थितीत असलेले गुण हे दुसऱ्या परिस्थितीत गुण ठरतीलच असं नाही. दोन व्यक्तींचं किंवा व्यक्तिसमूहाचं एकमेकांबरोबर असणं आणि त्यातून त्यांची आयुष्यं जशी पाहणाऱ्याला उठावदार, आनंदी वाटू शकतात, तसंच विविध रंग हे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेसुद्धा अशा व्यक्तींप्रमाणेच कधी समानतेतून, तर कधी विरोधाभासातून उठून दिसतात. मात्र, ज्याप्रमाणे आपण पाहिलं की, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत असलेले गुण हे दुसऱ्या परिस्थितीत कमतरता ठरू शकते, तसंच रंगांचं उठून दिसणं किंवा खुलून दिसणं हे त्या रंगांची व्यापकता किती यावरही अवलंबून असतं. विविध रंगांची लहानशा भिंतीवरची गुंफण ही मोठय़ा भिंतींवरही तितकीच प्रभावी दिसेल असं सांगता येत नाही. एकूणच काय, तर घरासाठी, ऑफिससाठी किंवा इतर ठिकाणांसाठी रंगांची व्यामिश्रता ठरवताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घराच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर घरातल्या एखाद्या खोलीतल्या भिंतींसाठी रंगछटा ठरवताना त्या खोलीचा उपयोग कोणत्या कारणांसाठी होतो आहे, याचाही विचार रंगछटा निवडताना केला जायला हवा. भिंतींचा रंग ठरवताना आपण नसíगक आणि कृत्रिम प्रकाश किती आहे, कृत्रिम प्रकाश पांढरा आहे की पिवळा, थेट आहे की अप्रत्यक्ष अशा अनेक गोष्टींचा विचार केलेला असतो. तसंच टेक्शचर असेल, तर ते कुठल्या भिंतींसाठी असेल आणि कुठल्या भिंती साध्या रंगात रंगवायच्या आहेत वगरे गोष्टीबाबतही निर्णय घेतलेला असतो. भिंतींना कुठला रंग द्यायचा हे एकदा ठरलं की मग फर्निचरच्या पॉलिशचा किंवा सनमायकाचा रंग, सोफ्याच्या आणि तक्क्यांच्या कव्हर्सचे रंग आणि खोलीतली एकूणच रंगसंगती कशी असावी, याबाबत विचार करावा लागतो. त्यामुळे आता खोलीतली इतर रंगसंगती आकर्षक आणि नेत्रसुखद कशी होईल, हे ठरवायचा पुढला टप्पा असतो.

Web Title: Important tip to select the right paint and color for home and office
First published on: 25-03-2017 at 03:36 IST