‘वास्तुरंग’मधील भिंतीची बोलकी सजावट हा लेख वाचला आणि गतस्मृतींना उजाळा मिळाला. मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या एकमेकींना पूरक आहेत. या तीन मूलभूत गरजांपैकी कुठल्याही एका गरजेची उणीव असेल तर मनुष्याची तिच्या प्राप्तीसाठी धडपड चालू असते. मुंबईसारख्या शहरात, महानगरात अन्न व वस्त्र या गरजा बऱ्यापैकी पूर्ण करून घेता येतात. पण जिथे इंच इंच जागेला आलेल्या सोन्याच्या भावामुळे (किंबहुना त्यापेक्षाही जास्त) निवारा ही गरज भागलेले मुंबईकर खरे भाग्यवानच म्हणायला हवेत. अशा भाग्यवानांपैकी मीही एक. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर ताडदेवच्या वडिलोपार्जित घरातून मी वरळीला बारा र्वषपूर्वी २००४ साली स्थलांतरित झालो. नवी जायफळवाडी, ताडदेव हा पूर्वीचा पत्ता कागदोपत्री गांधीनगर, वरळी असा झाला. सध्या वास्तव्यास असलेल्या या घराविषयीची ही एक आठवण.

घराचा ताबा मिळाल्यानंतर इथे राहायला येण्यापूर्वी अंतर्गत रचनेत जुजबी बदल (इमारतीच्या गाभ्याला धक्का न लावता) करून घराला रंगकाम करून घेतले. प्रवेशद्वारावर असणााऱ्या छोटय़ाशा संगमरवरी मंदिरातील गणेशाची छोटीशीच, पण सुंदर मूर्ती आम्हावर वरदहस्त ठेवून असल्याची भावना मनाला आधार देऊन जाते. घराच्या भिंती मात्र मोकळ्याच ठेवल्या होत्या. माझ्या दोन्ही छोटय़ांना (तन्वी, सखी ) लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. वेगवेगळी चित्रे काढून ती रंगवत बसणे त्यांना फार आवडत असे. त्यांच्या या छंदाला आमच्याकडून कधीही आडकाठी झाली नाही. उलट त्यांना प्रोत्साहनच दिले. अशी चित्रे काढता काढता बरीच चित्रे जमा झाली होती.

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास

एके दिवशी त्या दोघींनीच जमा झालेल्या चित्रांतील काही निवडक चित्रे बाजूला काढली आणि घरातील एका मोकळ्या भिंतीवर व्यवस्थित चिकटवली. मी त्या दिवशी ऑफिसला असल्यामुळे मला घरी येईपर्यंत याची काही कल्पनाच नव्हती. त्यांच्या आईला त्यांची चालू असलेली कामगिरी माहिती असली तरी प्रत्यक्ष सहभाग नव्हता. पण प्रोत्साहन जरूर होते. मी ऑफिसातून रात्री घरी आल्यानंतर त्यांची ही नवीनच कलाकृती पाहून खूश झालो. मनाला समाधान वाटले. माझ्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून दोघींनाही त्यांच्या कामाचे चीज झाल्याची पोचपावती मिळाली होती आणि त्यांचा हुरूप वाढला.

दोघींना वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच पुढे जाऊन वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धामध्ये त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत. शेवटी घराला घरपण येते ते घरातील प्रसन्न वातावरणामुळे आणि घरातील माणसांमध्ये असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळेच. असे घरदेखील त्या नात्याचाच एक भाग होऊन जाते. चित्रांनी सजलेली आमच्या घरातील ती भिंत त्यामुळेच सजीव होऊन गेली होती!

-दीपक गुंडये, वरळी.