तो होता साधारणत: तीन-चार दशकांपूर्वीचा काळ. आमच्या चाळवजा वस्तीत अनेक फेरीवाले मुक्तपणे हाकारे देत वावरत असत. तसेच रोजच उपयुक्ततेतील स्वयंपाकघरातील आयुधांना ठीकठाक करणारेही फेरीवाले येत असत. असाच एक वृद्ध मुसलमान सकाळीच हाकारा देत यायचा.
‘धारवालाऽऽ धारवालाऽऽ आला होऽ कायबी धारंदार करून देनाऽऽर’. स्वयंपाकघरातील आधुनिक साधने अजून अवतरली नसल्याचा तो काळ. प्रत्येक घरात एक विळी, भाज्या चिरण्यासाठी आणि नारळाची वाटी खवण्यासाठी आवश्यक अशी एक मोठी सुरी, कोशिंबिरीला आवश्यक अशी कांदा-टोमॅटो-काकडी उभ्यानेच चिरण्यासाठी लागणारी. एखादा चाकू अथवा लहानशी कात्री, दुधाच्या पिशव्यांना उघडिपीची चीर देण्यासाठी उपयुक्त आणि एखादी मोठ्ठी शिंप्याची कात्री, गृहिणीच्या शिवणयंत्राशी संलग्न अशी ही अवजारे असतच. वापरून वापरून ही अवजारे काही महिन्यांत बोथट व्हायचीच. मग आई घोषणा करून ठेवायची. ‘धारवाला आला तर लक्ष ठेवा रेऽ पोरांनोऽऽ’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा वेळेला वाट पाहिली जायची. ती त्या हनुवटीपुरती शुभ्र दाढी राखलेल्या, टकलावर जेमतेम बसेल अशी हिरवी टोपी घातलेल्या अबूमियाँ धारवाल्याची. एक सायकलसारखे लहानसे मशीन तो ढकलत आणायचा. त्यात मोठय़ा व्यासाचे लाकडी चाक आणि कमी व्यासाचे छोटे चाक, जे त्या मोठय़ा चाकाशी पट्टय़ाने जोडलेले असायचे. त्या छोटय़ा चाकाला जोडून एक धार लावण्याचे दगडी चाक आणि मोठे चाक चालविण्यासाठी पायाशी एक पॅडल.
आम्ही मुले घरातील धार लावून घेण्याची अवजारे घेऊन अबूमियाँसमोर रांग धरून उभे राहायचो. मियाँभाई हातात विळी घट्ट धरून त्याचे पाते उलगडून त्या दगडी चाकावर अलगद धरायचा. पायाने पॅडल मारणे सुरू केले की मोठय़ा चाकापाठोपाठ तो कमी व्यासाचा दगड फिरू लागला, त्यावर धरलेल्या अवजाराच्या संघर्षांमुळे चरऽचऽरऽऽ अशा आवाजासह आगीच्या ठिणग्या हवेत उडत असत. मग मियाँभोवती जमा झालेली आम्ही मुले पटकन् चार पावले मागे सरकत असू. तरीही त्या उडत्या चांदण्यांची गंमतही वाटे. पाच-सहा मिनिटांत एका अवजाराची धार लावून झाली की अबूमियाँबरोबरच्या एका कागदावर ती सुरी-कातरी वापरून दाखवायचा. सर्वाच्या अवजारांना धार लावून दिली की त्याचे दाम मशीनलाच टांगलेल्या एका पिशवीत टाकून मियाँभाई पसार व्हायचा.
पण आता तो मियाँभाई कधीही येत नाही किंवा रस्त्यातून ओरडत जातानाही दिसत नाही. बदलत्या काळाचा महिमा दुसरं काय? मग आता अशा अवजारांना धार लावून कशी मिळेल? असा प्रश्न फारसा पडत नाही. कारण स्वयंपाकघरात आता कटर, स्लाइसर, ब्लेंडर अशी आधुनिक यंत्रे अवतरली आहेत आणि नारळ फोडण्याची कला अस्तंगतच झालेय. कोपऱ्यावरच्या नारळवाल्याकडून तेथेच त्याच्या दोन वाटय़ा करूनच आणायच्या.
मधुसूदन फाटक 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man sharpening knives for people with a stone
First published on: 11-06-2016 at 01:36 IST