‘मरिन ड्राइव्ह’च्या रस्त्याचे काम १८ डिसेंबर १९१५ रोजी पीडब्लूडी इंजिनीअर केनेडी यांच्या देखरेखीखाली सुरू झाले. अलीकडेच या घटनेला १०० वष्रे पूर्ण झाली. त्यानिमत्ताने..
मागील तीन दशकांपासून मुंबई शहर आणि उपनगरे व आजूबाजूच्या भागांतील जीर्णोद्धारातील लक्षणीय बदल व ते हाताळण्याच्या पद्धती आपणास चांगल्याच परिचयाच्या झाल्या आहेत. त्यामुळे हे शहर आज एखाद्या अजस्र कारखान्यासारखे दिसू लागले आहे. शहरे फक्त अमाप पैसा कमावण्याची केंद्रेच असतात अशा समजुतीने अनेक लोक आता शहरांकडे धावू लागले आहेत. मुख्य शहरापेक्षा विशेषकरून उपनगरे चित्रविचित्र पद्धतीने वाढत आहेत. मुख्य शहरातील १०० ते १५० वर्षांपूर्वी बांधलेल्या सार्वजनिक इमारती आजही कार्यरत आहेत. साधारणपणे १९३०-४० सालात बांधलेल्या मरिन ड्राइव्ह, फोर्ट किंवा बॅलार्ड इस्टेट येथील निवासी-व्यावसायिक इमारती आजही चांगल्या अवस्थेत आहेत. किंवा त्या भागातील बाह्य़ स्वरूपात काहीही बदल करावे लागले नाहीत. राज्य आणि परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सीएसटी रेल्वे स्थानकाच्या भव्यतेतून मुंबई शहराच्या अवाढव्यतेची कल्पना येते. रोज नवनव्या गरजा निर्माण करावयाच्या व त्याच्या पूर्ततेसाठी रात्रीचा दिवस करायचा, ही का या शहराची ओळख म्हणायची?
मुंबई शहराची ओळख दर्शविणाऱ्या अनेक जागा आहेत. तरीसुद्धा त्यापैकी एक खरी ओळख कोणती, असे विचारले तर सर्वाच्या पसंतीस उतरणारी खरी ओळख कोणती असावी? या विषयाचा थोडक्यात घेतलेला परामर्श..
मरिन ड्राइव्ह हा रस्ता लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य हक्क’ सिंहगर्जनेतून पुनित झालेल्या भूमीपासून सुरू होतो. या रस्त्याचे काम १८ डिसेंबर १९१५ ला पीडब्लृूडी इंजिनीअर केनेडी यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आल्याची माहिती मफतलाल तलावाच्या प्रवेशद्वारावरील दगडी दीपस्तंभावर कोरलेली आहे. त्यानुसार १८ डिसेंबर २०१५ रोजी या घटनेला १०० वष्रे पूर्ण होत आहेत. केनेडी यांच्या निधनानंतर या रस्त्याला केनेडी सी-फेस असे नाव दिले होते. कालांतराने सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिलेला हा रस्ता आज मरिन ड्राइव्ह म्हणून ओळखला जातो. ४.३ किमी लांबीचा कठडा, टाटा थिएटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच भारतीय कला, संस्कृती, नृत्य यांचे जतन करणाऱ्या एनसीपीए या आधुनिक वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या वास्तूपर्यंत जाऊन थांबतो. या इमारतीचे आराखडे आधुनिक वास्तुशास्त्राचे प्रणेते आणि जगप्रसिद्ध अमेरिकन आर्किटेक्ट फिलिप जॉन्सन यांनी बनविले आहेत.
सर्वप्रथम या रस्त्याला लागून बांधलेल्या आर्ट डेको शैलीतील इमारती, सहा पदरी रस्ता, त्याला लागून असलेली मोकळी जागा व या जागेला लागून बांधलेल्या कठडय़ाच्या ‘कल्पक’ संकल्पनाकारास माझा सलाम! याच रस्त्याच्या एका टोकाला राज्यपाल, मुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांची निवासस्थाने आहेत, तर दुसऱ्या टोकाला समुद्रात भराव घालून निर्माण केलेल्या जागेवर विधान भवन, निवासी व व्यावसायिक संकुले उभी आहेत.
या रस्त्याला लागून असलेल्या कठडय़ाच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला मोकळेपणाने फिरता येईल अशा विस्तीर्ण जागेला लागून सहा पदरी दुहेरी रस्ता आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सन १९२०-४० सालात प्रसिद्ध असलेल्या शैलीतील इमारतींचं संकुल असलेलं अमेरिकेतील मियामीनंतर, मुंबई हे जगातील दुसरे शहर असावे. त्या काळातील सर्व श्रीमंतांना या शैलीत आपली इमारत असावी असे वाटत असे. या इमारतींपकी जवळपास सर्व इमारती भारतीय वास्तुविशारदांनीच डिझाइन केलेल्या आहेत. त्यात वास्तुविशारद जी. बी. म्हात्रे यांचा खूप मोठा वाटा आहे. या समूहातील अनेक इमारती वेगवेगळ्या वास्तुविशारदांनी जरी डिझाइन केल्या असल्या तरी सर्व वास्तुविशारदांनी आर्ट डेको शैलीचाच वापर करून या परिसराची शान कायम ठेवण्यात स्वत:चे कौशल्य दाखवून दिल्यामुळेच हा परिसर सर्वाच्या पसंतीस उतरतो. शैलीविना वर्तमान इमारतींची भविष्यातील ओळख काय असणार आहे?
आर्ट डोको या वैशिष्टय़पूर्ण शैलीचे बाह्य़ स्वरूपातील सर्वात महत्त्वाचे घटक नजरेत भरतात ते असे-
हलक्या व मुलायम रंगातील सारख्या उंचीतील इमारती.

प्रत्येक मजल्यावरील प्रशस्त बाल्कनी व त्यांची एक गोलाकार बाजू.
खिडक्यांना संरक्षणासाठी लावलेले, पण बटबटीतपणा जाणवू न देणारे नक्षीदार लोखंडी ग्रिल.
मध्यवर्ती जिन्याच्या बाहय़ पृष्ठभागावरील खिडक्या व गच्चीवरील भागाचे कलात्मक आकृतिबंध जे मनाला मोहित करतात.
या परिसराचे आणखी एक नावीन्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यास लागून बांधलेला कठडा. समुद्राच्या रौद्र लाटा थोपवत पहुडलेले अनगिनत टेट्रापॉड व येथे येणारे असंख्य पाहुणे हेच या कठडय़ाचे मित्र! टेट्रापॉडवर पडणाऱ्या लाटांच्या नादात अडकवून ठेवणारा, ऊन, ओलेपणा व थंडावा जाणवू न देणारा हा कठडाच सर्वाना आपलासा वाटतो. या परिसरात येणाऱ्या असंख्य पाहुण्यांना सामावून घेण्याची क्षमता असलेली ही एकमेव जागा असावी. या कठडय़ावर बसून प्रत्येक इमारतींच्या शैलीतील बारकाव्याने निरिक्षण करणे व सूर्यास्ताच्या रंगछटा न्याहाळणे हा मी व मित्राने अनेक वर्षांपासून जपलेला छंद! ‘मरिन डाइव्ह’ ही मुंबईकरांना मिळलेली एक नैसर्गिक व मानवनिर्मित देणगी आहे. या सर्व आनंदमय सौंदर्यपूर्ण ठेव्याचा भागीदार असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
वास्तविक पाहता या परिसराची गंमत खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती सूर्यास्तावेळी व त्यानंतर असंख्य दिव्याने झळाळून निघणाऱ्या पिवळ्या रंगातील रोषणाईत! ‘पांढरे दिवे नकोत व पिवळे दिवे पुर्नसचयित का करायला हवेत हे इतर दुसऱ्या कुठल्याही कारणापेक्षा, कलासौंदर्यानुभवाच्या निकषांवर समजून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते; कारण हे निकषच आपल्या जीवनातील आनंद व उत्साह वाढवत असतात!
सूर्यास्ताच्या संधिप्रकाशातील फिकट पिवळा रंग जेव्हा स्वैरावस्थेत पहुडलेल्या सिमेंट काँक्रीटच्या टेट्रापॉडवर विसावतो तेव्हा त्या रंगछटांची, धिम्या गतीत होणारी नसíगक स्थित्यंतरांची किमया भान हरखून टाकणारी आहे. अशा प्रकारची जादूई किमया, एलईडीच्या पांढऱ्या प्रकाशातील शुभ्रतेत नाही हे मात्र तितकेच खरे आहे.
पाण्याचा निळा रंग थंड प्रकृतीची प्रचीती देतो. समुद्रकिनाऱ्यास लागून ठेवलेल्या स्वच्छंदी टेट्रापॉडच्या विविध आकारांवर स्थिरावणारा फिकट पिवळा रंग पुढे जाऊन गूढ होत जातो व किंचितसा काळपट हलका तांबूस रंग धारण करतो. आणि शेवटी करडय़ा रंगाच्या कठडय़ावर मावळत्या सूर्याला निरोप देत रेंगाळणाऱ्या प्रकाशकिरणांचे कवडसे बघण्याचा आनंद प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळणे ही मुंबईकरांना मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा भूभाग हा राणीच्या चंद्रहाराप्रमाणे दिसतो. मरिन ड्राइव्ह व आजूबाजूच्या परिसरातच मुंबईची खरी ओळख दडलेली आहे.
आर्किटेक्ट
fifthwall123@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai marine drive turns
First published on: 26-12-2015 at 01:10 IST