सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कणकवली तालुक्यात सावडाव- खलांत्रीवाडी येथे आमचे वडिलोपार्जित घर आहे. १९५४ मध्ये माझ्या वडिलांनी व आजीने बांधलेल्या घराला आता साठ वर्षे होत आली. घर चिरेबंदी असले तरी साठ वर्षांनंतर वार्धक्याच्या खुणा घरावर दिसत होत्या. परिणामी घराच्या अंतरंगात अनेक बदल काळानुरूप करणे गरजेचे होते.
सर्वात तातडीचे काम होते ‘चौपाकी’ घराची कौलारू पद्धतीची लाकडी मांडणी नव्याने करण्याची.. याच्या जोडीला मुख्य प्रवेशद्वार, खिडक्या, स्वयंपाकघर, देवघर, न्हाणीघर, स्वच्छतालय, अंगण आणि तुळशी वृंदावन इ. अनेक बाबींची पुन्हा रचना करणे निकडीचे होते.
घराचा मूळ आकार १४०० चौरस फुटांचा. तो तसाच ठेवून मूळ आराखडय़ास धक्का न लावता गरजेनुसार नव्या पद्धतीची रचना करावयाची होती.
१९५४ साली वडिलांनी जेव्हा चिरेबंदी घर बांधले तेव्हा त्यांचे वय होते २५ वर्षे! घरबांधणीबाबत अनेक निर्णय घेण्यास हे वय तसे कोवळेच.. पण माझ्या वडिलांना त्या काळात ज्या बुजुर्गानी मातीचे घर न बांधता चिरेबंदी घर बांधण्याचा सल्ला दिला त्यांच्या दूरदृष्टीचे व कल्पकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
घर बांधले तेव्हा त्या काळी प्रसिद्ध असलेला ‘जांभा’ दगड बांधकामास वापरला होता. आज साठ वर्षांनंतरही त्या दगडांना कुठेही उभी किंवा आडवी चीर पडलेली नव्हती. या बांधणीमुळेच गेल्या साठ वर्षांत घराच्या मूळ ढाच्याला कसलीही बाधा आली नव्हती किंवा मोठय़ा दुरुस्तीची वेळ आली नाही.
घर चिरेबंदी असले तरी घराचे छप्पर त्या काळाला साजेसे असे लाकडी मांडणीवर कौले बसवून केलेले कौलारू. सिंधुदुर्गातील आचरा तालुक्यात रामगड हे गाव आहे. त्या काळी रामगडचे ‘वासे’ प्रसिद्ध होते. आमच्या घराला तेच वासे वापरले होते. जोडीला सागवानी व फणसाचे बार व शिवणीची रिप.
आज साठ वर्षांनंतर मात्र निसर्गाने आपली किमया दाखवायला सुरुवात केली होती. ऊन, वारा, पाऊस यांच्या जोडीला वाळवीने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती. रामगडचे वासे साठ वर्षांच्या अथक सेवेनंतर आता थकले होते. घराचे हे रूप आम्ही भावंडे पाहत होतो. उतरणीला आलेले घराचे छप्पर सावरायला हवे याची जाणीव होत होती. तब्बल साठ वर्षे कोणतीही कुरकुर न करता उभे असलेले घर आता ‘नवनिर्माणा’च्या प्रतीक्षेत होते.
घराचा मूळ आराखडा कायम ठेवून नव्याने कायापालट कसा करता येईल यावर चर्चा सुरू झाली. आम्ही भावंडे या चर्चेत होतोच; पण कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहभागी झाला. जोडीला आमचे समवयस्क मित्र, नातेवाईक व शेजारी होतेच. अनेक सूचना येत होत्या. काही पटत होत्या, तर काही आवाक्याबाहेर होत्या. यातच २०१४ चा पावसाळा येऊन गेला.
गणेश चतुर्थी आली आणि पुन्हा एकदा घराच्या विषयाने उचल खाल्ली. यापुढे अधिक वेळ घालवण्यात अर्थ नाही यावर एकमत झाले आणि घराच्या नवनिर्माणाच्या खर्चाचे अंदाजपत्रक मांडण्यास सुरुवात झाली.
मुख्य प्रश्न होता तो घराचे नवनिर्माण करण्याचे काम कुणाला द्यायचे याचा.. घराची मूळ बांधणी जुन्या धाटणीची होती, पण आता नवे रूप देताना त्यात अनेक बदल करावयाचे होते. आधुनिकतेची जोड देऊन नवीन काम करावयाचे होते.
आता शोध सुरू झाला बांधकाम व्यावसायिकाचा. जुन्या पद्धतीची घरे बांधणारे कॉन्ट्रॅक्टर माहीत होते; पण आम्हाला नव्या-जुन्याचा संगम घडवून बांधकाम करणारा व्यावसायिक हवा होता. त्यातही घराचे चौपाकी छप्पर आता लाकडाऐवजी लोखंडी सामानाचे करायचे होते. घराच्या छपराची चौपाकी मांडणी आता पूर्णत: लोखंडी होणार होती. गावपातळीवर अशा प्रकारची कामे फार कमी होती. त्यामुळे अनुभव कमी होता. घराच्या मूळ आराखडय़ात काही बदल करायचे होते. त्यामुळे तोडफोड करताना अधिक नुकसान न होता काम करणारा कुशल व्यावसायिक हवा होता. त्याच्या कामाची खात्री हवी होती. खंड न पाडता सलग काम करण्याची हमी हवी होती. शेवटी आमच्या अपेक्षांची पूर्ती करणारा एक उमदा व्यावसायिक भेटला. कामाचे स्वरूप समजावून घेतल्यानंतर त्याने आमच्या शंकांना, प्रश्नांना आणि अपेक्षांना ज्या आत्मविश्वासाने उत्तरे दिली ती आम्हाला समाधानकारक वाटली आणि कामाचा ‘ठराव’ निश्चित झाला.
२६ नोव्हेंबर २०१४ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. घराचे छप्पर लाकडी मांडणीसह पूर्णपणे उतरविले गेले. आता कौलारू छपरासाठी लोखंडी मांडणी करावयाची होती. मात्र या कामाला सुरुवात करण्यापूर्वी बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकाच्या मनात एक शंका आली. घर ६० वर्षांपूर्वी बांधलेले. आता घरावर लोखंडी मांडणी केली तर हा लोखंडाचा भार सोसण्यासाठी घराचा पाया आवश्यक तेवढा खोल व भक्कम आहे का? कारण ६० वर्षांपूर्वी पाया किती खोल बांधला असेल याची कुणालाच कल्पना नव्हती.
तरुण व्यावसायिक इथे थोडा गडबडला. घराच्या पायाचा अंदाज घेणे गरजेचे होते. त्याशिवाय पुढील काम करणे धोकादायक होते. आजवर लाकडाचा भार वाहणारे घर आता लोखंडाचा भार वाहण्यास सक्षम असणे गरजेचे होते. विचारात एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी घराच्या चौथऱ्याची एक बाजू खोदायचा निर्णय झाला. पहारीचे व टिकावाचे घाव बसू लागले. माती निखळू लागली, खोली दिसू लागली. चार फुटांपर्यंत चरी खणली गेली आणि डोक्यावरचे ओझे क्षणात उतरले. पाया मजबूत होता, अभंग होता. आता कसली चिंता नव्हती. ६० वर्षांपूर्वी ज्यांनी घराची पायाभरणी केली त्यांच्या दूरदृष्टीला दाद देण्यात आली. काम जोमाने सुरू झाले. मनात विचार आला, हा पाया हवा तेवढा सक्षम नसता तर..? घराचा पूर्ण आराखडाच आम्हाला बदलावा लागला असता.
२२ एप्रिल २०१५ ला घराचे काम सर्वदृष्टय़ा पूर्ण झाले. आवश्यक असलेले सर्व बदल मनासारखे करण्यात आले, पण त्याचबरोबर जुन्या घराची आठवण म्हणून तीर्थरूपांनी बांधकाम केलेल्या काही गोष्टी तशाच ठेवल्या. अनेकांनी त्याबद्दल विचारले; पण १९५४ सालच्या कारागिरांची आठवण म्हणून आम्ही त्या स्मृती जपल्या. आणखी एक गोष्ट आवर्जून केली. साठ वर्षांपासून घरात असलेल्या, पण आता कालबाहय़ वाटणाऱ्या वस्तूंची जपणूक! या वस्तूंची जपणूक म्हणजे माझे पणजोबा, आजोबा-आजी व वडील अशा तीन पिढय़ांच्या आठवणींची कहाणी आहे. ही कहाणी आमच्याकडून पुढच्या पिढीला सांगता यावी म्हणून त्यांची जपणूक!
या जपणुकीत काय-काय आहे? त्या काळात सातत्याने वापरले जाणारे ‘मुसळ’, भात भरडायची ‘घिरट’, धान्य मोजायची ‘पायली’, पाटा-वरवंटा, जाते, मातीचे रांजण व मडकी, भात साठवायची ‘कणग’ (कणगी), वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी येणाऱ्या शेणाने सारवलेल्या टोपल्या, तांब्यापितळेची भांडी, आजोबांची ‘आरामखुर्ची’, त्या काळी वरातीमध्ये फिरवली जाणारी ‘बनाटीची काठी’, प्रभाकर कंपनीचा कंदील, पेट्रोमॅक्सची बत्ती आणि मातीची चूल.
काळाची आठवण देणाऱ्या या वस्तू जपून ठेवताना काही गोष्टींना निरोप द्यावा लागला. घराच्या बांधकामात तो अपरिहार्य भाग ठरला. कोणत्या होत्या त्या गोष्टी? घरासमोरील पेरूचे झाड, पारिजातक आणि चाफा. वर्षांनुवर्षे अनेक घटनांचे साक्षीदार असलेले हे अबोल सोबती.. पण त्यांना निरोप द्यावाच लागला.
नवनिर्मिती होत असताना जुन्याने काळाच्या उदरात लुप्त व्हायचे असते, हा निसर्गाचा नियमच आहे, पण माहेरच्या अंगणात मायेचे कोंब रुजावेत म्हणून माझ्या विवाहित बहिणींनी फुलझाडांची रोपे अंगणापुढील मोकळ्या जागेत लावली, सर्जनाच्या नव्या आरंभासाठी..!
घर पूर्ण झाले. अंगणाला आकार आला. तुळशी वृंदावन तयार झाले. घराला नवे रंगरूप मिळाले. मित्र, हितचिंतक व आप्तेष्टांनी कौतुक केले. ध्येयपूर्तीचे समाधान कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळाले, कारण.. ‘साठीतले घर आता तारुण्याच्या उंबरठय़ावरून हसत होते!

offensive song during marriage marathi news
लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात
Jalgaon, Private Bus Overturns in jalgaon, Five Injured, five injured in Bus Overturns, Guardian Minister Gulabrao, Relief Efforts, Minister Gulabrao Patil Leads Relief Efforts,
जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून पाच प्रवासी गंभीर; मंत्री गुलाबराव पाटील यांचे मदतकार्य
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?