इंग्रजीत एक म्हण आहे ‘स्टिच इन टाइम सेव्झ नाइन’. इमारतीच्या बाबतीत ती पुरेपूर लागू पडते. लोखंडाच्या सळ्या आणि सिमेंट काँक्रीट ही एक अत्यंत अनुरूप अशी जोडी निसर्गाने मानवाला दिली आहे. किंबहुना त्यामुळेच आपण आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उत्तुंग इमारती पाहत आहोत. मुळात काँक्रीट हा एक प्रचंड ताकदवान असा पदार्थ आहे, परंतु एका विशिष्ट दबावा खाली त्याची ताकद शून्य ठरते व त्यातून साकारलेली वस्तू कोलमडून पडते. असे होऊ  नये म्हणून त्या दबावाविरुद्ध आधारासाठी तेवढय़ाच ताकदीची सळ्यांची जाळी उभारली जाते, जेणेकरून कॉँक्रीट व सळ्या या एकत्रितरीत्या सर्व प्रकारचा दबाव झेलून इमारतीला जागेवरती भक्कम स्वरूपात उभी धरून ठेवतात. काँक्रीट किंवा सळ्या यातील कुठच्याही पदार्थाची ताकद, कोणत्याही कारणामुळे आवश्यकतेपेक्षा कमी झाली तर परिणामी इमारत अस्थिर होते व तिचा विनाश जवळ येऊन ठेपतो. म्हणूनच इमारतीच्या निगराणीमध्ये इमारतीच्या ढाच्याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे ठरते. इमारतीच्या ढाच्यावर ज्याला कोर सेक्शन असे म्हणतात, तिचे आयुष्य अवलंबून असते. काँक्रीट व सळ्या नैसर्गिकरीत्या एकमेकाला घट्ट धरून ठेवतात व त्यापासून आर. सी. सी. हा नवीन पदार्थ बनतो. हा पदार्थ प्रचंड ताकदवान असला तरी त्याला शत्रूही भरपूर आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे पाणी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिमेंटवर रासायनिक क्रिया होऊन त्यातून खडी व रेतीसकट एक बंध निर्माण होण्यासाठी नेमक्या प्रमाणात पाण्याची गरज असते. जरुरीपेक्षा पाणी कमी अथवा जास्त झाल्यास काँक्रीटची प्रत खालावते. आजकाल आवश्यक त्या ताकदीचे, एकसंध, एकाच प्रतीचे काँक्रीट पुरविणाऱ्या, निव्वळ काँक्रीट बनविणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आल्या आहेत. त्यांनी मूळ पदार्थात इतर काही रसायने घालून अप्रतिम दर्जाचे काँक्रीट बाजारात आणले आहे. इंजिनीअरच्या जरुरीप्रमाणे हवे त्या प्रकारचे हवे तेवढे काँक्रीट या कंपन्या देऊ  शकतात. रस्त्यातून जाताना खूप वेळा आपण एक विचित्र ट्रक बघतो, ज्याच्यावर एक मोठ्ठा ड्रम हळू फिरत असतो. हीच ती रेडी मिक्स काँक्रीट वाहवून नेणारी गाडी. अलीकडच्या काळात आर. एम. सी. म्हणजे रेडी मिक्स काँक्रीटचा वापर सर्रास असला तरी आज उभ्या असलेल्या बहुसंख्य इमारती या याच काँक्रीट या प्रकारातून बांधल्या गेल्या आहेत व त्यामुळे त्यांचे प्रश्न हे जास्त तीव्र व निराळ्या प्रकारचे आहेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water proofing in buildings
First published on: 04-03-2017 at 02:06 IST