देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झालीत. आज आपण ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. या काळात सुखाच्या, स्वातंत्र्याच्या कल्पना बदलत गेल्या. आता हेच पाहा ना, पूर्वी लोक कामानिमित्त आपलं घर-गाव सोडून दुसरीकडे गेली की हमखास जीव अडकायचा तो घरच्या जेवणात. सारं काही चांगलं आहे, पण घरचं जेवण नाही. त्याची सर बाहेरच्या जेवणाला कुठे? असा विचार असायचा. पण आज मात्र तसं नाही, आज अनेक शहरांत-गावांत खरोखरीच घरचं जेवण वाटावं अशी सोय उपलब्ध आहे. घराच्या बाबतीतही तेच आहे. तुम्ही भाड्याच्या घरात जर राहत असाल- मग ते छोटं असो वा आलिशान, पण ही बोच सतत मनाला टोचत राहते की, आपण भाड्याच्या घरात राहतोय.

आपलं हक्काचं घर असावं, अगदी तो बंगला नसला तरी चालेल, पण प्रशस्त असं स्वत:चं स्वतंत्र घर असावं असं बहुतांश लोकांचं स्वप्न असतं. या बहुतांश मंडळींत फक्त तरुण आणि पुरुष गटाचा समावेश नसतो, तर कित्येक तरुणी आणि महिलाही असतात. आता हे स्वतंत्र घर म्हणजे काय? तर जिथे स्वत:च्या मर्जीप्रमाणे राहता येईल, खाता-पिता येईल, स्वत:च्या आवडीनुसार सजविता येईल असं घर. आजकालची घरं किंवा व्हिला यांची सर्वसाधारण रचना बघितली तर ती टिपिकल स्वरूपाची असते, म्हणजे टू बेडरूम किंवा घरात खाली-वर अशा दोन किंवा चार बेडरूमनी युक्त असं घर. त्या त्या खोलीत अटॅच्ड शौचालय-बाथरूम, बाल्कनी वगैरे. मग हॉलची सजावट अमुक पद्धतीचीच हवी किंवा बेडरूम म्हटलं की, तिकडे अर्ध्याहून अधिक जागा व्यापणारा बेड हा हवाच. पण या नेहमीच्याच पठडीतल्या संकल्पनांना थारा न देता स्वत:च्या मर्जीप्रमाणे घर सजविता आलं पाहिजे. जसं की, एखाद्यााला आपला हॉल मोकळा-ढाकळा ठेवायचाय अथवा पारंपरिक भारतीय बैठकीची रचना करायची असेल तर ते स्वातंत्र्य त्याला तिथे असलं पाहिजे. अर्थात हे करताना बांधकामाचे नियम पाळायलाच हवेत.

अलीकडच्या काळात घरं ही नुसतीच सोयी-सुविधांनी युक्त नसावीत तर ती तितकीच आरोग्यपूर्ण असणंदेखील महत्त्वाचं ठरत आहे. म्हणजे एखाद्यााला आपल्या घराच्या बाल्कनीत छोटीशी बाग तयार करायची असेल आणि तिथं बसून त्याला सहज स्वत:शी संवाद साधता येईल. हा संवाद साधण्यासाठी दरवेळी त्याला घराच्या जवळपास असलेल्या बागेत जाण्याची गरज नाही. घरी राहूनदेखील हा संवाद त्याला साधता येण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे.

ब-याचदा परदेशात तिथल्या उपनगरांत किंवा तिथल्या खेड्यांत स्वंतत्र घराची रचना दिसते. म्हणजे तुम्ही एखाद्याा कॉलनीमध्ये जरी राहत असलात तरी प्रत्येकाच्या घराची रचना ही त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार वेगळी असते. मग कधी कुणाच्या घरात स्विमिंग पूल असतो तर कधी एखाद्या विशिष्ट स्वरूपाच्या खेळासाठी जसं बास्केट बॉल, टेबल टेनिस किंवा जिम्नॅस्टिक्स त्या त्या खेळासाठी उपयुक्त अशी सोय घरातच केलेली असते. याचा एक फायदा असा असतो की ती गोष्ट अथवा तो खेळ तुम्हाला मनमुरादपणे खेळता येतो. असे स्वातंत्र्य आपल्या घरात असलं पाहिजे.

स्वतंत्र घर असणं हे जितकं फायद्याचं आहे, तितकच ते जबाबदारीचंदेखील काम आहे. कारण घरात एखाद्याा दुरुस्तीचं काम निघालं तर ती करणं ही त्या त्या घरमालकाची जबाबदारी असते. यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविणारी यंत्रणा घरमालकाजवळ असणं गरजेचं असतं.

अलीकडच्या काळात आपल्याकडेदेखील ही स्वतंत्र घराची संकल्पना मूळ धरू लागली आहे. गावात किंवा शहरालगतच्या मोकळ्या जमिनी घेऊन त्यावर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आपलं स्वतंत्र घर उभारणं इतकाच हा मर्यादित अर्थ नाही. तर ही संकल्पना शहरांत-उपनगरांतदेखील रुजू होऊ पाहात आहे. इथे स्वंतत्र घर म्हणजे एक असं घर जे पूर्णत: स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर बांधलं आहे. ते कोणत्याही प्रकारच्या सोसायटीशी जोडलं गेलेलं नाही. कोणत्याही प्रकारच्या इतर घराबरोबर तर भिंत अथवा अन्य कुठल्याही स्वरूपाच्या जागेबरोबर समानरीत्या ते वाटलं जात नाही असं घर आणि या घरांमध्ये ज्या काही सोयीसुविधा असतात, त्या घरमालकाच्या आवडीप्रमाणे आकारास येतात. येणाऱ्या काळात विविध गृहप्रकल्पांपेक्षा अशी स्वत:च्या संकल्पनेनुसार आकारास येणारी स्वतंत्र घरं ही कदाचित ग्राहकाची पसंती असू शकेल.suchup@gmail.com