|| डॉ. मनोज अणावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आश्विानचा सरता महिना आणि र्काितकाचे वेध लागलेले… आखूड होत चाललेले दिवस अंधाराची शाल अंगावर अंमळ जरा लवकरच पांघरू लागलेले… त्यामुळे दिवेलागणीची वेळ काहीशी लवकर आलेली आणि दिवसा निसर्गात बघावं तर भाजक्या ऊन्हानं काहीशी कमी होऊ लागलेली हिरवाई थोडीशी पिवळट दिसायला लागलेली… पानांचा पोक्तपणाच जणू त्यातून जाणवतो. पण त्याचबरोबर वृक्षराजींच्या पर्णवैभवाची सांजवेळ झाल्याचंही तो पिवळसरपणा खुणावतो. पानझडीला सुरुवात झाल्यामुळे डोंगरमाथे मातीचे तपकिरी मुकुट मिरवताना दिसतात. डोंगरांच्या तळाजवळच्या झाडांवर शिल्लक असलेला गर्द हिरवा, त्यावर थोडासा फिक्कट हिरवा, मग त्यावर पिवळसर हिरवा, त्याच्यावर मातीचा तपकिरी आणि या सगळ्याच्यावर निळंशार आकाश आणि त्यात अलगद विहरणारं, कापसासारखं मऊ दिसणारं पांढरं शुभ्र अभ्र… अशी रंगांची मुक्त हस्तानं उधळण करणाऱ्या तसंच लवकर पडू लागलेल्या अंधारामुळे दिव्यांची गरज अधोरेखित करणाऱ्या या र्काितक महिन्याच्या उंबऱ्यावर आश्विान संपता संपता येतो, तो रंगांचा आणि दिव्यांचा सण… दिवाळी! दिवेलागणीच्यावेळी रोजच लक्ष्मी येते असं आपण मानतो, मग खास दिवाळीत या ऐश्वार्यदायिनी लक्ष्मीमातेचं स्वागत नको का करायला?

म्हणूनच दिवाळीच्या निमित्ताने घरांमध्ये जशी साफसूफ होते तशी गृहसजावटही केली जाते. वेगवेगळी फर्निचर आणण्याबरोबरच सजावटीच्या वस्तूंनी घराची शोभा वाढवण्यावरही भर दिला जातो. या सजावटीच्या वस्तूंच्या दुनियेत फेरफटका मारताना डोळ्यांचं पारणं फिटणं म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.

लिव्हिंगरूम किंवा बेडरूममधल्या वॉलयुनिट्सपासून ते आकर्षक शू-स्टँडपर्यंत अनेक फर्निचर युनिट्स आपल्याला बाजारात फेरफटका मारताना दिसून येतात. हे फर्निचर घरी करून घेतलं तर थोडं महाग पडतं, पण बारा ते पंधरा वर्षं टिकतं. कारण उत्तम सागवानी लाकूड तसंच मरीन प्लायवुडचा वापर करून आपण ते तयार करून घेतो. याउलट बाजारात तयार मिळणारं फर्निचर हे तुलनेनं खूपच स्वस्त असतं, पण ते पाच-सहा वर्षंच टिकतं. उदाहरण द्यायचं झालं तर जे वॉर्डरोब घरी करून घेतलं, तर ३० ते ४० हजारांना पडेल, ते बाजारात १०-१५ हजारांना मिळू शकतं. दही खाणाऱ्या बाळकृष्णाची किंवा हसऱ्या ढेरपोट्याची एखादी मूर्ती आपण याच लिव्हिंगरूममध्ये ठेवू शकता. धबधब्यांच्या रूपाने घरात निसर्ग आणायचा असेल तर १५०० ते ३००० रुपयांपर्यंत मिळणारी डिजिटल पेंटिंग्ज आपण लिव्हिंगरूमच्या भिंतीवर लावू शकता. याउलट धबधब्याचं चित्र असलेली साधी पेंटिंग्ज ही ३००-४०० रुपयांपर्यंतही मिळू शकतात. याशिवाय दगड, शंख-शिंपले यांसारख्या वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या लँडस्र्केंपगमधून खऱ्याखुऱ्या पाण्याचा धबधबा लिव्हिंगरूमच्या एखाद्या कोपऱ्यात आपण ठेवू शकता. असे धबधबे ३००० रुपयांपासून मिळू शकतात. लिव्हिंगरूमचा आणखी एक अविभाज्य भाग बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळतो तो पुस्तकांच्या रूपाने… या पुस्तकांसाठी उपलब्ध असलेले लोभस बुकरॅक्स आपल्याला बाजारात दिसतात.

मुलांच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या स्टडी टेबल्स आणि कॉम्प्युटर ट्रॉलीजचे विविध पर्यायही ६ हजारांपासून मिळू शकतात. वॉलयुनिटमध्ये टीव्ही ठेवायचा नसेल तर टिंटेड ग्लासेस असलेल्या टीव्ही ट्रॉलीज ५-६ हजारांपासून मिळतात. ओव्हनबेक्ड स्टीलची कपाटं आठ-दहा हजारांपासून उपलब्ध असतात. पडद्यांमध्येही वेगवेगळे प्रकार बाजारात पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे पडदे पाचशे रुपयांपासून मिळतात. याशिवाय आपल्याला हव्या असलेल्या आकाराचे पडदेही शिवून मिळतात. बाथरूमसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिकचे शॉवर कर्टन्स ३०० रुपयांपासून मिळतात.

दिव्यांच्या या सणाला दिव्यांना विसरून कसं चालेल? दिव्यांच्या आणि लँपशेडड्सच्या दुकानांमधून फेरफटका मारताना मात्र सावध राहा. कारण खरेदी करण्याचा मोह अनावर करणारे अनेक आकार, प्रकार आणि रंगांचे दिवे पाहताना वेळेचं भान तर राहत नाहीच, पण एखादं महागडं झुंबर विकत घेऊन आपण दुकानातून बाहेर पडतो तेव्हा घरी गेल्यावर आपण भानावर येतो, की आपण दिवाळीच्या एकूण बजेटचा बराचसा भाग त्या एका झुंबरावरच खर्च केला आहे.

माईल्ड स्टीलवर सोनेरी मुलामा दिलेल्या झुंबरांपासून ते पितळ्यावर थेट १४ कॅरेटच्या सोन्याचा मुलामा दिलेल्या झुंबरांपर्यंत अनेक प्रकार आपली नजर खिळवून ठेवतात. याबरोबरच शंख- शिंपले, फुलं अशा असंख्य आकाराप्रकाराच्या लँपशेड्स पाहायला लागलं की, त्या आपल्या लिव्हिंगरूममध्ये कशा दिसतील याची स्वप्नं डोळ्यात तरळायला लागतात.

दिवाळीच्या निमित्ताने सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी एक अख्खा दिवसच राखून ठेवा. मात्र, खरेदी करण्याआधी हे लक्षात ठेवा-

उ कुठलीही वस्तू खरेदी करण्याआधी ती वस्तू जिथे मिळते अशी तीन-चार दुकानं फिरून तिचे वेगवेगळे ब्रँड्स, त्यातले फायदे-तोटे यानुसार असलेले फरक जाणून घेऊन त्यांच्या किमती विचारून मगच त्या वस्तूचा कुठला पर्याय निवडायचा ते निश्चिात करा. त्यामुळे नंतर फसगत होण्याची शक्यता कमी असते.

उ वस्तूंच्या किमती या मूळ किमती आहेत की जीएसटीसारखे कर लावल्यानंतरच्या किमती आहेत ते विचारून घ्या. शिवाय ज्या वस्तूंची होम डिलिव्हरी अपेक्षित असेल, अशा वस्तूंच्या किमतीत त्या डिलिव्हरीचे पैसे समाविष्ट आहेत की नाहीत ते विचारून घ्या.

उ आपण निवडत असलेली पडद्यांची आणि इतर र्फिर्नंशगची डिझाइन्स ही खोलीच्या रंगाला आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप असतील याची खात्री करून घ्या.

उ वॉलयुनिर्ट किंवा वॉर्डरोबसारख्या वस्तू घेताना आपण निवडत असलेल्या डिझाइन्समध्ये आपल्या एकूण गरजांच्या तुलनेत संख्येने पुरेसे आणि पुरेशा उंची-रुंदीचे कप्पे आहेत की नाहीत ते पाहून घ्या. त्याकरता घरून निघण्याआधीच त्या कप्प्यांमध्ये ठेवायच्या वस्तूंची उंची-रुंदी मोजून घेऊनच खरेदीला निघा.

उ झुंबरं, दिवे किंवा कुठलीही विजेच्या वापरावर चालणारी वस्तू घेताना ती वापरण्यासाठी विजेची किती युनिट्स लागतात त्याची चौकशी करा; नाहीतर मागाहून वीज फार लागते म्हणून अशा वस्तू फारशा वापरल्या जात नाहीत आणि उगाचच घरात पडून राहतात. त्यामुळे घरातल्या अडगळीत भर पडते.

anaokarm@yahoo.co.in   

(इंटीरिअर डिझायनर आणि स्पेस मॅनेजमेंट कन्सल्टंट)

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When buying goods see nature akp
First published on: 30-10-2021 at 00:14 IST