संहिता जोशी

‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ या कंपनीचा ‘घोटाळा’ हा लोकांची विदा गोळा करून तिचा वापर लोकांच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्याचा तो ‘रीतसर’ झालेला, पण बेकायदा प्रकार होता. आता कुणाही यंत्रणेनं आपली विदा मागितली, तरी ते किल्मिष असणारच..

मिहाल कोचिन्स्की नावाच्या केम्ब्रिज विद्यापीठातल्या एका प्राध्यापकानं फेसबुकवरचे ‘लाइक’ आणि तत्सम विदा (डेटा) वापरून हे दाखवून दिलं की, मर्यादित विदा वापरून आपल्याला जवळून ओळखणाऱ्या लोकांपेक्षाही आपले मनोव्यापार आणखी चांगले समजून घेता येतात. कोण, कोणत्या बातम्या, लेखन, फोटो लाइक करतात, शेअर करतात यावरून व्यक्तीचे विचार काय, कसे आहेत हे समजून घेता येतं. कोणाच्याही १०० पोस्ट्स बघितल्यावर त्या माणसाला स्वत:ची जेवढी ओळख असेल त्यापेक्षा जास्त आकलन होईल अशी यंत्रणा कोचिन्स्कीनं आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत तयार केली. मत्र-परिवाराला जितकी ओळख असेल तितकी ओळख होण्यासाठी साधारण ३० पोस्ट्स, लाइक्स वगैरे विदाबिंदू पुरतील, असं त्यांचं म्हणणं होतं.

ही यंत्रणा, अशी कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटलिजन्स) तयार करण्यासाठी त्यांनी फेसबुक वापरणाऱ्या काही लोकांची विदा (डेटा) गोळा केली. ही विदा गोळा करण्यासाठी त्यांनी ‘क्रूझ क्रू’ नावाचं फेसबुक अ‍ॅप बनवलं. ज्या लोकांनी अ‍ॅप वापरलं, त्यांना ‘रीतसर’ सांगून, परवानगी घेऊन ही विदा त्यांनी गोळा केली. फेसबुकच्या मेसेंजरमध्ये तेव्हा काही त्रुटी (बग्ज) होत्या; त्यांचा वापर करून या परवानगी देणाऱ्या लोकांच्या मत्रयादीत असणाऱ्या, पण परवानगी न दिलेल्या लोकांची विदाही त्यांनी अलगद गोळा केली.

ही विदा वापरून कोण कसा विचार करतात ते समजेल, त्यानुसार राजकीय जाहिराती आणि खऱ्याखोटय़ा बातम्या दाखवण्यासाठी, पसरवण्यासाठी ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ नावाची कंपनी मर्सर या गडगंज श्रीमंत कुटुंबाच्या आशीर्वादानं सुरू झाली. केम्ब्रिज हे नाव त्यात येण्याचं कारण, कोचिन्स्की केम्ब्रिजमध्ये होता आणि त्यानं गोळा केलेली विदा वापरली गेली. २०१६ मध्ये झालेल्या, जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या दोन निवडणुकांच्या विजयी बाजूंना केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकानं मदत केली. एक ‘ब्रेग्झिट’चं मतदान आणि दुसरी निवडणूक अमेरिकेतली ज्यात डोनाल्ड ट्रम्प निवडून आला. या सगळ्या प्रकारांना पैसे पुरवणारे मर्सर कुटुंबीय उदारमतवाद, पुरोगामी मूल्यं, जागतिकीकरण अशा गोष्टींच्या विरोधात आहेत, हे नोंदवणं महत्त्वाचं.

कारण जी मूल्यं मर्सर कुटुंबीय नाकारतात, त्याच मूल्यांना फेसबुकचा सर्वसाधारणपणे पाठिंबा असतो; निदान फेसबुकचा प्रणेता आणि प्रमुख मार्क झकरबर्ग या मूल्यांच्या बाजूनं असतो, अशा छापाचे दावे अधूनमधून फेसबुककडून होत असतात. ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’चं प्रकरण गाजत होतं, तेव्हा फेसबुकमध्ये अशा छापाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चपदस्थांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं की, असे ३० आणि १०० क्लिक बघून माणसांचे मनोव्यापार समजणं कठीण आहे आणि त्यांनी गोळा केलेल्या विदेचा असा काही राजकीय वापर झाल्याचे पुरावे सापडत नाहीत, म्हणे!

फेसबुक वापरून अशा प्रकारे लोकांची विदा गोळा करणं हेच मुळात बेकायदा आहे. तरीही ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’नं अशी विदा गोळा केल्याचं जाहीर झाल्यावर फेसबुकनं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. म्हणजे काय, तर त्यांना ही सगळी विदा नष्ट करायला भाग पाडलं. त्यांनी ही विदा संपूर्णपणे नष्ट केली आणि कुठेही हे डबोलं जपून ठेवलेलं नाही, यावर विश्वास ठेवणं मला कठीण वाटतं. मलाच नाही, ज्या फेसबुक उच्चपदस्थांचा आधी उल्लेख केला त्याही लोकांचं व्यक्तिगत पातळीवर हेच म्हणणं दिसतं. हाच तो केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचा घोटाळा!

आपल्या व्यक्तिगत अनुभवांच्या चष्म्यातून याकडे बघू नका. आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या फोटोंचं आपल्यासाठी भावनिक मूल्य असतं. आपली व्यक्तिगत स्वरूपाची माहिती, आपल्यासाठी फक्त माहिती असते. व्यापारी तत्त्वावर जेव्हा विदा गोळा केली जाते तेव्हा तिला दोन प्रकारचं महत्त्व असतं : एक तर त्या विदेतून काय प्रकारची माहिती गोळा करता येईल हे शोधण्यासाठी काही गणित, सांख्यिकी आणि संगणकशास्त्रीय शिक्षण शिकणं, नवीन पद्धती विकसित करण्यातून वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती होते; आणि दुसरं आर्थिक महत्त्व. त्या माहितीचा वापर करून नफा मिळवणं. आपल्यासाठी आपल्या घरच्यांचे वेगवेगळ्या वयातले फोटो भावनिक कारणांसाठी महत्त्वाचे असतात. समाजशास्त्रज्ञ हे फोटो बघून त्या-त्या काळातल्या चालीरीतींबद्दल निष्कर्ष काढू शकतात; त्यासाठी त्यांना लाखो-कोटय़वधी फोटो मिळवण्याची गरज नसते; त्यांना मोजका वानवळाही (सॅम्पल) पुरतो.

जेव्हा लोकांचे लाखो-कोटय़वधी फोटो मिळतात तेव्हा त्यातून किती माहिती कोळून काढता येईल हे सांगता येत नाही. म्हणजे एक तीळ फार तर सात लोक वाटून खाऊ शकतील. पण त्यातून समजा तिळाचं रोप लावता आलं आणि त्यातून हजारो-लाखो तीळ मिळाले तर ते किती लोकांना पुरतील, असा विचार करा. विदेला आजच्या काळातलं सोनं किंवा पेट्रोल म्हणतात. सोनं आणि पेट्रोल या वस्तू अशा आहेत, की ज्यांचं काही भौतिक अस्तित्व आहे. सोन्याचा एक ठरावीक तुकडा किंवा ठरावीक एक लिटर पेट्रोल एका वेळी एकाच व्यक्तीकडे असू शकतं; त्याची मालकी एकाच व्यक्तीची असू शकते. पण विदेचं तसं नाही. लाखो फोटोंचा एकच संच एकाच वेळी अनेक विदावैज्ञानिक वापरू शकतात. कौटुंबिक समारंभांत काढलेले फोटो असे सगळे फोटो एकत्र केले तर त्यातून कोण लोक, कोणत्या वेळेस, कुठे होते; एका फोटोत सरासरी किती लोक असतात; अशा ठिकाणी कोणत्या रंगांचे कपडे लोक घालतात, असे कुठलेही कामाचे/ बिनकामाचे प्रश्न विचारता येतात. कोणत्याही प्रकारच्या विदेतून, विशेषत: लोक फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर जे काही लिहितात, जाहीर करतात त्यातून काय काय माहिती मिळवता येईल, यावर अखेर दोन मर्यादा नक्की आहेत : आपल्याला हवी तशी विदा मिळते का आणि आपली कल्पनाशक्ती.

‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’नं दिवाळखोरी जाहीर केली आणि ती बंद पडली, त्यालाही काळ लोटला. मग आता ती का आठवते?

उच्चशिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापली ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामची खाती आपल्या शैक्षणिक संस्थांच्या खात्यांशी जोडून घ्यावीत, असा सरकारी आदेश निघाला आहे. यामागचा हेतू या संस्थांबद्दल सकारात्मक बातम्या पसरवण्यासाठी करता येईल, असं सांगतात. पण विदा एकदा गोळा केली की तिचा वापर कशासाठी होणार हे आपल्याला समजत नाही. ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’चा अमेरिकी निवडणुकांच्या निकालांवर परिणाम झाला का, याबद्दल वादविवाद होत राहतील. त्या काळात ज्या काही खोटय़ा बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यांत एक होती की एका पिझ्झरियामधून हिलरी क्लिंटन लहान मुलांची विक्री करते. त्या पिझ्झरियामध्ये एका माथेफिरूनं गोळीबार केला.

समाजमाध्यमांवर आपण जाहीर करतो, अशा कोणत्याही प्रकारची माहिती आपल्या शिक्षण संस्थेला द्यावी का? पर्यायानं ही माहिती सरकारकडे असावी का? आपलं व्यक्तिगत आयुष्य आपण कोणासमोर आणि किती उघडं करावं आणि त्याची काय किंमत चुकवण्याची आपली तयारी आहे, यावर आपला किती ताबा असावा, अशासारखे अनेक प्रश्न या निर्णयातून उभे राहतात.

सध्या तरी विद्यार्थ्यांचं लिंक्डिन खातं शिक्षण संस्थेशी जोडण्याचे आदेश आलेले दिसत नाहीत. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक आयुष्यात सरकारला आणि पर्यायानं शिक्षण संस्थांना रस नाही, असं दिसतंय. लवकरच लिंक्डिनवर राजकीय मतं आणि सेल्फ्यांचं प्रमाण वाढेल का?

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com