12 July 2020

News Flash

खऱ्याची दुनिया नाही, सायेब!

अमेरिकेत एक महत्त्वाची चळवळ २०१३ पासून चालू आहे - ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’. कृष्णवर्णीयांच्या आयुष्यांना किंमत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संहिता जोशी

केंब्रिज अ‍ॅनालिटिका आणि त्यांनी गोळा केलेली विदा वापरणारे रशियन बॉट्स यांनी संगनमतानं मतदारांना खोटी माहिती पुरवली आणि लोकशाही मूल्यांना हरताळ फासला. ‘कोणत्या गोष्टीबद्दलची आपली मतं इतरांनी ठरवलेली चालतील?’ हा यामागचा प्रश्न आहे..

‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’नं चोरून मिळवलेल्या विदेतून पुढे काय केलं, याची पुराव्यानं शाबीत झालेली उदाहरणं, परिणाम या लेखात बघू.

केंब्रिज अ‍ॅनालिटिकानं लोकांची फेसबुक पोस्ट्स वाचून त्यांच्याबद्दल माहिती मिळवली. एका माणसानं कोणत्या वेळेस, फेसबुकवर काय लिहिलं, हा एक विदाबिंदू (डेटा पॉइंट). त्यातून भाषा, फोटो बघून एकेका व्यक्तीसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते, ही माहिती; ती मिळवण्यासाठी बऱ्याच जास्त लोकांची, बरीच जास्त विदा मिळवावी लागते. कोणत्या भागातल्या लोकांचे काय विचार आहेत, असे गट तयार करणं ही आणखी माहिती. कोणत्याही जाहिराती, अगदी निवडणुकांच्या प्रचाराच्याही दृष्टीनं ही माहिती महत्त्वाची असते.

२०१६च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल बघितले तर त्यात दिसलं की कृष्णवर्णीय आणि कनिष्ठ आर्थिक वर्गातल्या मतदारांच्या निरुत्साहाचा फटका हिलरी क्लिंटनला बसला; तिच्या विरोधातल्या निखालस खोटय़ा किंवा नरो-वा-कुंजरोवा छाप बातम्या या वर्गाला मोठय़ा प्रमाणावर दाखवल्या गेल्या. रशियन बॉटांनी अशा बातम्या मोठय़ा प्रमाणावर पसरवल्या.

फेसबुक आणि ट्विटरवर तेव्हा मोठय़ा प्रमाणावर बॉट होते. बॉट म्हणजे अल्गोरिदमच. इथे खऱ्याखोटय़ा, पण बॉट लिहिणाऱ्यांना हव्या त्या बातम्या ठरावीक लोकांसमोर पुन्हापुन्हा दाखवणारा प्रोग्रॅम, अल्गोरिदम म्हणजे बॉट. हे रशियातून काम करत होते, त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘रशियन बॉट’ असा केला जातो. अमेरिकेच्या राजधानीच्या शहरातल्या कोणत्याशा पिझ्झरियात हिलरी क्लिंटन कुंटणखाना चालवते, किंवा तिला असाध्य रोग झाला आहे, अशा छापाच्या निखालस खोटय़ा बातम्याही तेव्हा समाजमाध्यमांवर होत्या; त्या पसरवण्याचं काम या बॉटांनी केलं.

अमेरिकेत एक महत्त्वाची चळवळ २०१३ पासून चालू आहे – ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’. कृष्णवर्णीयांच्या आयुष्यांना किंमत आहे. अमेरिकेतले कृष्णवर्णीय बहुतांशी डेमोक्रॅटिक मतदार असतात; अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हाही कृष्णवर्णीय आणि डेमोक्रॅट. त्याला कृष्णवर्णीयांनी भरघोस मतं दिली. आजच्या काळातल्या कोणत्याही चळवळ, आंदोलन, व्यवसायासारखंच या ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’चंही एक फेसबुक पान अर्थातच आहे. त्यांचं नाव वापरणारं, पण खोटय़ा बातम्या पसरवणारं, चळवळीशी अजिबात संबंधित नसणारं एक फेसबुक पानही अवतरलं. निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात या खोटय़ा पानाचे फॉलोअर्स खऱ्या पानापेक्षा जास्त होते.

आजच्या निवडणुका समाजमाध्यमांवर ‘खेळल्या’ जातात. प्रचाराची धामधूम संगणकासमोर जास्त चालते. या खोटय़ा पानाचे फॉलोअर्स आले रशियन संगणकांतून, रशियन कंपन्यांनी चालवलेल्या बॉट खात्यांमधून. एका बाजूनं या खात्यांतून प्रसारित केलेले व्हिडीओ आणि बातम्या होत्या त्या कृष्णवर्णीय लोकांना पोलिसांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीच्या. त्या बघून त्या खात्याला कृष्णवर्णीय लोकांची सहानुभूती मिळणं अपेक्षित होतं. दुसरीकडे हिलरी क्लिंटनची नाझी अधिकाऱ्यांशी तुलना करणं, तिच्या विरोधात खऱ्याखोटय़ा बातम्या पसरवण्याचं कामही या खात्यानं केलं. त्या खात्याला चिकार बॉट फॉलोअर्स होते; त्या बॉटांनी त्या बातम्या आणखी पसरवल्या.

फेसबुक किंवा समाजमाध्यमं कशा प्रकारे काम करतात, ते इथे महत्त्वाचं आहे. एखादी बातमी जर खूप लोकांना महत्त्वाची वाटली, तर ती सतत वर येत राहते. तुकोबाच्या गाथेसारखी. गाथेची अस्सलता असण्याची गरज समाजमाध्यमावर नाही; निदान २०१६च्या निवडणुकांच्या काळात तरी नव्हती. ज्या लोकांना ही बातमी महत्त्वाची वाटते, ते लोक खरे आहेत का बॉटांची खाती आहेत यात फेसबुकला फरक करता आला नाही, तर ती बातमी /व्हिडीओ पुन्हापुन्हा वर येत राहणार. आणि मग ती बातमी ‘व्हायरल’ होते.

आपण सारासार विचार करतो, असं वाटणारे लोकही हिरिरीनं समाजमाध्यमांवर कर्कश वाद घालताना दिसतात; खऱ्याखोटय़ाची शहानिशा न करता बातम्या पुढे ढकलताना दिसतात; लोकांमध्ये दुही माजेल याचा विचार न करता दोन घडीच्या प्रसिद्धीच्या मागे लागलेले दिसतात. रशियन बॉटांनी या मानसिकतेचा फायदा घेतला. हिलरी क्लिंटनविरोधात त्यांनी वातावरण तापवलं.

ओबामानं आपला वारसा पुढे चालवणारी म्हणून हिलरी क्लिंटनचा प्रचार केला होता. मात्र वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणातून असं दिसतं की ओबामाच्या मतदारांपैकी अनेकांनी अध्यक्षीय निवडणुकांत मत देणं नाकारलं. यात गोऱ्या लोकांची संख्या काळ्यांपेक्षा जास्त होती. मात्र महत्त्वाचा भाग असा की, रशियन बॉटांकडून आलेल्या खोटय़ा बातम्या, हिलरीविरोधी जाहिराती मुद्दाम कृष्णवर्णीय मतदारांना मोठय़ा प्रमाणावर दाखवल्या गेल्या. याला लक्ष्यवेधी (टाग्रेटेड) जाहिराती म्हणतात. आपला ‘माल’ कोणासमोर खपेल हे शोधायचं आणि त्यांनाच जाहिराती दाखवायच्या, कधी भडिमार करायचा. ओबामाच्या मतदारांपैकी एकतृतीयांश, ३३ टक्के कृष्णवर्णीय मतदारांनी २०१६च्या निवडणुकांत मतदान करणंच नाकारलं. वेगवेगळ्या ३३ राज्यांत एकाच वेळेस अध्यक्षीय निवडणुका आणि राज्यव्यापी इतर निवडणुकांसाठी मतदान झालं; एकाच ठिकाणी मतदानाची सोय असूनही १० लाख मतदारांनी अध्यक्षीय निवडणुकांत मतदान केलं नाही. मतदारांचा निरुत्साह हिलरी क्लिंटनला महागात पडला.

आपला माल खपवायला सगळ्यांनाच आवडतो. माझा लेखही कमी लोकांनी वाचण्याऐवजी जास्त लोकांनी वाचलेला, मला आवडेल. पण आपला माल म्हणजे नक्की काय? कोणी आपल्याला साबण विकतात, कोणी छत्री. पण आपली राजकीय मतं काय असावीत हे ठरवण्याचा हक्क इतर कोणाला द्यावा का? कोणत्या गोष्टीबद्दलची आपली मतं इतरांनी ठरवलेली चालतील? त्यात आणखी खोटेपणाचा गोंगाट कोणता हे ओळखणं आणखी कठीण आहे. मग आपली मतं कशी ठरवायची, ‘व्हॉट्सॅप विद्यापीठा’तून आलेल्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा?

फेसबुकवर मोठय़ा प्रमाणावर रशियन बॉट्स होते आणि त्यांच्या कारवायांमुळे अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल बदलले, हे मान्य करायला फेसबुकनं बराच वेळ लावला. पण केंब्रिज अ‍ॅनालिटिका आणि त्यांनी गोळा केलेली विदा वापरणारे रशियन बॉट्स यांनी संगनमतानं लोकशाही मूल्यांना हरताळ फासला. लोकशाहीत लोकांनी आपले नेते निवडावेत, त्यासाठी आपल्या मनानुसार मतदान करणं अपेक्षित असतं. पण मतदान करणाऱ्यांना त्यात खोटी माहिती दिलेली नाही, असं गृहीतकही असतं. वेळेत आपली जबाबदारी न ओळखणाऱ्या फेसबुकमुळे अमेरिकी लोकशाहीत रशिया सहज ढवळाढवळ करू शकला. लोकशाहीत मतदान ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. अनेक अमेरिकी मतदारांनी २०१६ साली मतदान करणंच नाकारलं.

म्हणायला फेसबुकचा लोकशाही, उदारमतवाद, सत्यप्रियता वगैरे मूल्यांवर तत्त्वत: विश्वास आहे. तरीही आपली जबाबदारी ओळखू न शकलेल्या फेसबुकाच्या नेतृत्वानं पुरेशी कृती केली नाही. त्यामुळे यापुढेही मतदारांचा लोकशाही प्रक्रियेवर असणारा मतदारांचा संशय फिटणं कठीण होईल.

अमेरिकेचे भौगोलिक, राजकीय तपशील भारतीय वाचकांसाठी महत्त्वाचे नाहीत. पण तरीही फेसबुक, ट्विटरकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. जे अमेरिकेत घडलं, ते आपल्याकडे होणार नाही याची काहीही खात्री नाही. ‘कसाबनं बिर्याणी खायला मागितली’, ही सरकारी वकिलांनी उठवलेली आवई आपल्याकडे आजही निवडणुकांच्या काळात सत्य म्हणून पसरवली जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याचं व्हॉट्सॅप फिरत होतं.

‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ आता बंद पडली. पण बाटलीतला राक्षस कधीच बाहेर आला आहे. रशिया-अमेरिका ‘युद्धात’ सध्या तरी रशियाचं पारडं जड दिसत आहे. जगातल्या सगळ्यात मोठय़ा लोकशाहीनं याकडे दुर्लक्ष करू नये.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 12:24 am

Web Title: examples of the authenticity of cambridge analytica steal data abn 97
Next Stories
1 ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’चं किल्मिष
2 बिन ‘आँखों देखी’
3 शिफारस करण्याचा धंदा
Just Now!
X