24 May 2020

News Flash

सांगोवानगीदाखल..

कोणत्याही बाजूची ठोस, ठाम मतं असणाऱ्यांना जाहिराती, खऱ्या-खोटय़ा बातम्या दाखवून काहीही फरक पडत नाही

(संग्रहित छायाचित्र)

संहिता जोशी

बातम्या वाचून प्रश्न विचारणारे लोक बऱ्याच जास्त प्रमाणात असतात. विदाविज्ञान वापरून ज्यांचा बुद्धिभेद केला जातो, तो हा वर्ग.. त्यांच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील, अशा प्रकारे बनावट बातम्या फैलावल्या की एरवी बुद्धीचा वापर करणारे हे लोकसुद्धा सांगोवांगीच्या (अप)प्रचारावर विश्वास ठेवू लागतात!

डेव्हिड कॅरल नावाच्या अमेरिकी प्राध्यापकाला समजलं की केंब्रिज अ‍ॅनलिटिकानं लाखो अमेरिकी लोकांची व्यक्तिगत विदा (पर्सनल डेटा), त्यांच्या संमतीशिवाय गोळा केली आहे. त्यानं त्याची विदा केंब्रिज अ‍ॅनलिटिकाकडून परत मागितली. ती न मिळाल्यानं २०१७ सालात त्यानं केंब्रिज अ‍ॅनलिटिकावर दावा गुदरला. केंब्रिज अ‍ॅनलिटिकानं दंड भरला पण डेव्हिडला त्याची विदा परत दिली नाही. त्यांचा दावा होता, त्यांनी सगळ्यांची व्यक्तिगत विदा नष्ट केली आहे. (यावर फार कुणी विश्वास ठेवत नाहीत.)

केंब्रिज अ‍ॅनलिटिकाचं आता दिवाळं निघालं आहे. म्हणून इतर कोणी असे उद्योग करू शकत नाही, असं नाही.

बनावट बातम्या किंवा ‘फेक न्यूज’ ही सध्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्पची आवडती सबब आहे. गैरसोयीच्या कोणत्याही बातमीचा उद्धार ‘बनावट बातमी’ असा करून वेळ मारून नेणं सोपं असतं. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असो वा समाजमाध्यमावरचा चिल्लर वाद. अमेरिकेतल्या २०१६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये रशियन बॉटांनी बनावट बातम्या तयार करून, पसरवून दिल्या; प्रतिष्ठित माध्यमांत याची चर्चा व्हायला सुरुवात झाली तशी ‘बनावट बातमी’ अशी सबब वापरणंही सोपं झालं.

बनावट बातम्यांचा उपद्रव दुहेरी स्वरूपाचा असतो. एक तर खोटं पसरवलं जातं. दुसरं, समोर आलेली बातमी खरी का खोटी, हे ठरवण्याचा मार्ग सर्वसामान्यांकडे नसतो; त्यामुळे सगळ्याच महत्त्वाच्या बातम्यांवर विश्वास ठेवणं कठीण वाटतं; किंवा आपल्याला सोयीस्कर बातम्यांवरच विश्वास ठेवला जातो. किंवा बातमीमधलाही सोयीस्कर भाग तेवढाच उचलला जातो. म्हणजे कसं? कन्हैया कुमार आठवतो? सुरुवातीला ‘त्यानं आणि त्याच्या सहाध्यायांनी देशविरोधी घोषणा दिल्या,’ अशा बातम्या होत्या. पुढे लक्षात आलं की, ते व्हिडीओ बनावट होते. बनावट बातम्या. आजही समाजमाध्यमांवर आणि काही प्रस्थापित माध्यमांवरही ‘टुकडेटुकडे गँग’ हा हिणकस उल्लेख फॅशनीत आहे. ‘सगळेच साले चोर आहेत,’ असं म्हणणारे लोक दिसतात; कन्हैया कुमार आणि त्याच्यासारख्यांवर झालेली कारवाई योग्यच आहे, असं म्हणणारी बहुसंख्या दिसते. देशाचे तुकडे व्हावेत, असं म्हणणाऱ्यांना विरोध करण्यात काही गैर नाही; ते मत किंवा विचार झाले. कन्हैया आणि मित्रांनी खरोखर अशा घोषणा दिल्या का, ही खरी किंवा बनावट बातमी आहे. दोन्ही एकत्र करून, लोकमत कन्हैयाविरोधी करण्याचं काम समाजमाध्यमांमुळे मोठय़ा प्रमाणावर झालं. फक्त तोच नाही, त्याचा संबंध ज्या कोणत्या नावडत्या लोक आणि वर्गाशी लावता आला, त्या सगळ्यांच्या विरोधी मत सहज बनवता आलं.

इथे विदाविज्ञानाचा (डेटा सायन्स) काय संबंध? निवडक बातम्या किंवा बातमीतला निवडक मजकूर ठळक करून अपप्रचार करण्याची कुजबुज कॅम्पेनं आजवर होतच होती. आता फरक पडतो, तो आपल्या विदेमुळे.

‘तुमच्या मित्रमत्रिणींना आहे, त्यापेक्षा तुमच्याबद्दल जास्त माहिती मिळवण्यासाठी तुमच्या ३० पोस्ट्स वाचणं पुरेसं आहे’, असा दावा केंब्रिज अ‍ॅनलिटिका करत होती. यात ३० पोस्ट्स की १०० हा आकडा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचं आहे ते आपले विचार काय, आपल्याला कोणत्या प्रकारच्या बातम्या आवडतात, याची माहिती मिळवता येणं. आणि दुसरं महत्त्वाचं आहे, तंत्रज्ञान वापरून बसल्या जागी, कोणालाही समजण्याच्या आत खऱ्याखोटय़ा बातम्या सहज पसरवता येतात.

सोयीसाठी लोकांचे तीन गट करू; कन्हैया आणि कंपनीनं देशद्रोही घोषणा दिल्याची बातमी वाचून त्याकडे (कोणत्याही कारणास्तव) दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागणारे लोक, अशा बातम्या वाचून मनात शंका उत्पन्न होणारे आणि तिसरे ही बातमी खरीच आहे असं मानणारे लोक.

कोणत्याही बाजूची ठोस, ठाम मतं असणाऱ्यांना जाहिराती, खऱ्या-खोटय़ा बातम्या दाखवून काहीही फरक पडत नाही. बहुतेकदा दुसऱ्या गटातले, बातम्या वाचून प्रश्न विचारणारे, लोक बऱ्याच जास्त प्रमाणात असतात. विदाविज्ञान वापरून ज्यांचा बुद्धिभेद करायचा आहे, तो हा वर्ग. यांना सतत अशा प्रकारच्या बातम्या दाखवत राहिल्या की ‘खरंच असं घडलं होतं’ यावर त्यांचा विश्वास बसायला लागतो. सगळ्या लोकांचं मत बदलण्याची, किंवा कोण लोक काठावरचे आहेत याची भाकितं १०० टक्के अचूक असण्याची काही गरज नाही. (नेटफ्लिक्स आपल्याला आवडतील असे चित्रपट-मालिका सुचवतं, त्यांत दहा-बारा टक्के अचूकता असते.)

विदाविज्ञान हा संभ्रमित, काठावरचा वर्ग शोधून काढतं. एरवी प्रश्न विचारणं, शंका असणं हा सद्गुण समजला जातो. तो बनावट बातम्या आणि अपप्रचार करवण्यासाठी उपयुक्त ठरतो; पण बहुतेकदा लोक अपप्रचाराबद्दल प्रश्न विचारतच नाहीत. ‘चक्षुर्वै सत्यम्’ किंवा डोळ्याला दिसतं ते खरंच असतं, असा ग्रह बहुतेक समाजांमध्ये आहे. फोटोशॉप करणं, खोटे व्हिडीओ पसरवणं यांना जोड दिली जाते, एखाद्या प्रसंगाचा संदर्भ काढून घेण्याची. एखादं विधान विनोद म्हणून वापरलं असेल; संदर्भ काढून घेतला तर ते विनोदी राहणारही नाही. अपप्रचारासाठी ते वापरूनही घेता येईल. (गटारी हा शब्द ‘गताहारी’तून आला आहे, म्हणून श्रावणात मांसाहार सोडा; असं काही समाजमाध्यमांवर दिसलं. गताहारी असा काही उल्लेख जुन्या लेखनात आणि महाराष्ट्राबाहेरही सापडतो का, हा प्रश्न न विचारता फक्त उच्चारसाधम्र्य म्हणून लोक ते लगेच खरं मानतात; पसरवतात!)

डेव्हिड कॅरलला आपली विदा हवी होती, ती या कारणासाठी. अपप्रचार ‘योग्य’ व्यक्तीसमोर करण्यासाठी काय विदा वापरली जाते, ती वापरून आपली विभागणी नक्की कोणत्या गटात केली आहे, याची माहिती आपल्याला मिळाली तर पुढे काय करायचं हे ठरवता येईल. आपल्याला दिसणाऱ्या बातम्या, व्हिडीओ खरे आहेत की बनावट हे मुळातच माहीत नसेल तर बहुतेकदा आपण छापलेल्या बातम्या, आपल्या मित्रमत्रिणींनी शेअर केलेले व्हॉट्सॅप मेसेजेस खरेच आहेत असं मानतो.

माझी मतं ठामच आहेत, असं मला वाटतं. बहुतेक सगळ्यांनाच असं वाटतं. तरीही कोणत्या वृत्तसंस्थेवर विश्वास ठेवायचा, हे अत्यंत काळजीपूर्वक ठरवण्याची वेळ आली आहे. आपल्याला नावडणाऱ्या बातम्या देतात, नावडते शब्द वापरतात म्हणून ट्रम्पसारखं ‘फेक न्यूज’ म्हणणं योग्य नाही. प्रस्थापित आणि प्रतिष्ठित माध्यमांमध्ये बातम्यांची सत्यासत्यता तपासून घेतली जाते. वृत्तपत्रं अग्रलेख छापतात ती ‘मधली पानं’ मतांसाठी असतात. मतं निराळी आणि बातम्या निराळ्या. व्हॉट्सॅप विद्यापीठात हल्ली कोणी, काहीही लिहू शकतात; आपल्या जवळच्या लोकांनी फॉरवर्ड पाठवलं आहे, म्हणून ते खरंच आहे, असं मानण्याची काही आवश्यकता नाही.

फेसबुकवरून अमेरिकी निवडणुकांत ढवळाढवळ झाली, याबद्दल लोकप्रतिनिधिगृहात फेसबुकचा प्रमुख मार्क झकरबर्ग याची सुनावणी झाली. त्या सुमारास पाश्चात्त्य माध्यमांनी एक मुद्दा लावून धरला होता की, सर्व वृत्तसंस्थांवर बनावट बातम्या, अपप्रचार पसरवण्याविरोधात जशी बंधनं आहेत तशी फेसबुकवरही असावीत. फेसबुकचं त्यावर उत्तर होतं की, ‘आम्ही वृत्तसंस्था नाही; आम्ही बातम्या एकत्र करण्याचं फक्त काम करतो’. आपणही फेसबुककडे तसंच बघितलं पाहिजे. फेसबुकवर बातम्या पसरवण्याचं काम चोखपणे होत असेल तरीही त्या बातम्या खऱ्या आहेत का नाहीत, याची शहानिशा झालेली नसते.

संस्थात्मक पातळीवर आपली विदा, पर्यायानं आपलं मतस्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कसा विचार करायला हवा, हे पुढच्या भागात बघू.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 12:10 am

Web Title: fake news data cambridge analytica abn 97
Next Stories
1 माझ्या दारचं जास्वंद
2 खऱ्याची दुनिया नाही, सायेब!
3 ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’चं किल्मिष
Just Now!
X