संहिता जोशी

विरोधी विचार, आपल्या मतांचा प्रतिवाद, आपल्या अभिव्यक्तीवर झालेली टीका, यांतलं काहीएक ऐकून न घेणं आणि यांतून होणारं समाजाचं ध्रुवीकरण हा ‘गोग्गोऽड’ समाजमाध्यमांचाही परिणाम आहे. त्यामागचं एक सांख्यिकी कारण आहे, अपूर्ण विदा..

संपूर्ण विदा म्हणजे काय याचं एक उदाहरण आपण गेल्या लेखात बघितलं. समजा फेसबुकनं ‘मी मतदान केलं’ असं बटण उपलब्ध करून दिलं; कोणी-कोणी ते बटण वापरलं यासोबत, ज्यांना बटण मिळालं त्यांच्यापैकी कोणी ते बटण वापरलं नाही, याचीही नोंद ठेवली तर संपूर्ण विदा जमा केली असं म्हणता येईल.

आपल्यापैकी अनेकांनी गुगलचं पान बघितलं असेल, गुगल.कॉम. पान उघडल्यावर अगदी मोजकी बटणं आणि मर्यादित मजकूर दिसतो. आणि Google या अक्षरांचे ठरावीक रंग दिसतात. हे रंग कसे दिसायचे याबद्दलही गुगलनं प्रयोग केले. फेसबुक किंवा गुगल वापरणाऱ्या लोकांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे त्यांना हे प्रयोग कसे करता येतात ते बघू.

संस्कृती, धारणा किंवा ऋतूंनुसार माणसांच्या रंगांच्या आवडीनिवडी बदलतात. पाश्चात्त्य जगात मुलगी म्हणजे गुलाबी आणि मुलगा म्हणजे निळा, असे रंग प्रमाण मानतात. आपल्याकडे असं काही नाही, मात्र कपडय़ांचे काळे-पांढरे रंग सहसा वापरले जात नाहीत; अशुभ समजले जातात. वसंत ऋतू आला की रंगारंग कपडे, त्यावर फुलांचं, प्रसन्न पिंट्र असे कपडे निवडले जातात. ही सरधोपट निरीक्षणं. दु:खी मन:स्थिती असणारे लोक कदाचित करडे, तपकिरी रंग वापरत असतील. यांतली महत्त्वाची गोष्ट अशी की, ऋतुमान, मनोवस्था, दिवसाची वेळ, घरी आहोत की सणासुदीसाठी मत्रांना भेटत आहोत, अशा अनेक कारणांनुसार आपण कोणत्या रंगांचे, कसे कपडे घालायचे हे ठरवतो.

गुगलला आपल्या लोगोचे रंग ठरवताना या सगळ्या पुस्तकी माहितीचा काही फायदा नव्हता. लोगो बऱ्याच लोकांना, वर्षांचा बहुतेकसा काळ आकर्षक वाटला पाहिजे, निदान टाकाऊ, उदास वाटू नये. लोकांची आवड काय आहे हे समजून घ्यायचं तर लोकांनाच विचारलं तर? थेट विचारण्यापेक्षा लोकांच्या नकळत प्रयोग करण्याचीही सोय तंत्रज्ञानात आहे. ‘‘तुझा आवडता रंग कोणता?’’, असं कोणी विचारलं तर मी कदाचित उत्तर देईन, ‘‘मी काही आठ वर्षांची नाही. वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे रंग चांगले दिसतात.’’ पण गुगलचे दोन निरनिराळ्या रंगांचे लोगो दाखवले तर त्यांतला मला कोणता जास्त आवडला हे सहज सांगता येईल.

हा प्रयोग अशा पद्धतीनं करण्याचीही गरज नाही. एकाच व्यक्तीचं मत म्हणजे सांगोवांगी ठरेल. त्याऐवजी लाखो लोकांचं मत विचारात घेतलं तर त्यातून संपूर्ण विदा जमा करता येईल. समजा गुगलनं लोगोची दोन डिझाइन्स बनवली. गुगल वापरणाऱ्या लोकांचे दोन गट केले. हे दोन गट अशा पद्धतीनं केले की त्यात स्त्री/पुरुष, निरनिराळे वयोगट, त्यांची भौगोलिक पाश्र्वभूमी, अशा कित्येक गोष्टी समान पद्धतीनं विभागल्या जातील. उदाहरणार्थ, मला आणि शेजारच्या डेस्कवर बसणाऱ्या मत्रिणीला दोन निरनिराळे लोगो दाखवले गेले, तर ती समान विभागणी म्हणता येईल. दोन गटांतल्या लोकांपैकी किती लोकांनी गुगलचा लोगो दिसणाऱ्या पानावर जास्त वेळ घालवला हे मोजलं. ज्यांना लोगो आवडणार नाही ते लोक त्या पानावर फार वेळ घालवणार नाहीत, हे गृहीतक. अर्थातच, नावडत्या गोष्टीकडे कशाला कोणी टक लावून बघेल!

हा प्रयोग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, संचाचा आकार – किती लोक या प्रयोगात सहभागी होते, तो आकडा. हा आकडा अगदी कमी असेल तर प्रयोग फसतील. गुगल (आणि फेसबुक)चे वापरकत्रे खूप असल्यामुळे ही मर्यादा नाही किंवा एका गटात फक्त स्त्रिया आणि दुसऱ्या गटात फक्त पुरुष असतील तरीही या प्रयोगांचे निष्कर्ष चुकतील. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग करताना माणसांचे गट जेवढे एकसमान असतील तेवढं चांगलं.

अशा प्रकारचे प्रयोग म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू, चित्र, फोटो, लेखनाला येणारा प्रतिसाद मोजणं. एखादी गोष्ट आवडल्याचं आपण जितक्या आवर्जून सांगतो, तितक्या पोटतिडकीनं नावड व्यक्त करत नाही. नावडलेल्या गोष्टींवर प्रतिसाद न देण्यामागे बरीच कारणं असतात. तशीही नावडलेली प्रत्येक गोष्ट हिंसेतून होणाऱ्या प्राणहानीएवढी वाईट नसतेच.

आपण आपले फोटो, मतं, विचार वगैरे समाजमाध्यमांवर जाहीर करतो. यात एक मुद्दा लेखमालेच्या कक्षेबाहेरचा म्हणून सोडून देणार आहे – समाजमाध्यमांवरचा आपला फोटो म्हणजे आपण की आपली अभिव्यक्ती? आपल्या फोटोवर टीका झाली म्हणजे आपल्यावर झाली का? – ते असो. समाजमाध्यमांवर निर्थक ‘गुड मॉìनग’पासून संदर्भापासून छाटून काढलेली, प्रसिद्ध पुरुषांची एकोळी विचारमौक्तिकं, आणि गायतोंडेंसारख्या प्रसिद्ध चित्रकाराच्या चित्रांपासून विचार करायला भाग पाडणाऱ्या भाषणांचे व्हिडीओ अशा अनेक गोष्टी दिसतात; आपणच या गोष्टी व्यक्त करतो किंवा शेअर करतो.

जाहिरातींचं उत्पन्न वाढावं म्हणून जसं आपल्याला आवडतील अशाच पोस्ट्स आपल्याला दाखवल्या जातात, तसं दुसऱ्या बाजूनं आपल्या पोस्ट्सवर व्यक्त होणारी मतंच आपल्याला दिसतात. कोणी पोस्ट्स लाइक, शेअर करतात; कोणी कॉमेंट करतात. आपली अभिव्यक्ती, पोस्ट्स कोणी बघितल्या; कोणी त्याकडे ‘हे बिनमहत्त्वाचं वाटतंय’ म्हणत दुर्लक्ष केलं; कोणी न आवडल्यामुळे दुर्लक्ष केलं; कोण बरेच महिने त्या वेबसाइटवर फिरकलेलंच नाही, अशा गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. बहुतेकशा समाजमाध्यमांवर ‘पोस्ट आवडली नाही’ किंवा ‘पकाऊ आहे’ हे म्हणण्याची सोपी सोय नाही. पाच-पन्नास लाइक्स आणि ‘हाऽऽहा’ अशा प्रतिक्रिया दिसतात, त्यात जांभया देण्याचा पर्याय चुटकीसरशी उपलब्ध नाही.

यातून आपल्याला अप्रिय असं काही ऐकण्याची सवय समाजमाध्यमांवर राहत नाही. अप्रिय प्रतिक्रिया द्यायचीच असेल तर मुद्दाम टंकनाचे कष्ट घ्यावे लागतात. मात्र आपल्या ‘प्रगल्भ’ प्रतिक्रिया लाइकच्या बटणात देण्याची सवय झाल्यावर टंकाळा (टंकण्याचा कंटाळा) आड येतो; अर्थातच सोय सगळ्यांसाठीच महत्त्वाची असते. भारतात गेल्या दहा-एक वर्षांत फेसबुक लोकप्रिय झालं आहे. तोवर लोक याहू चॅटरूम्स, ईमेल्स, ऑर्कुट वगैरे वापरत होते; तिथेही इमोजी वापरून प्रतिक्रिया देण्याची सोय होती. पण त्यांत बरंच जास्त वैविध्य होतं. जांभई देणारा चेहरा, काहीही न समजल्यामुळे गोंधळलेला चेहरा, आजारी चेहरा, असे बरेच पर्याय होते.

फेसबुक, ट्विटर, वगैरे समाजमाध्यमांवर आता फक्त आवडण्याच्या निरनिराळ्या छटा दाखवण्याची सोय आहे. फेसबुकवर राग आणि अश्रू दाखवण्याची सोय गेल्या काही वर्षांतच आलेली आहे. एकुणातच आपल्या विधान, अभिव्यक्तीबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया द्यायची असेल तर ते सोपं नाही. त्यातून खुशमस्कऱ्यांची कोंडाळी प्रत्येक व्यक्तीच्या भोवती तयार होतात. अप्रिय बातम्या, मतं, विचार मांडण्याचं प्रमाण कमी होतं. कोणाचं काही मत आवडलं नाही तर ब्लॉक करण्याची सोय असतेच!

यातून तयार होतात आपापली विचारकूपं आणि आपण बनतो त्यांचे मांडलिक. विरोधी विचार, आपल्या मतांचा प्रतिवाद, आपल्या अभिव्यक्तीवर झालेली टीका, यांतलं काहीएक ऐकून न घेणं आणि यांतून होणारं समाजाचं ध्रुवीकरण हा गोग्गोऽड समाजमाध्यमांचा परिणाम आहे. त्यामागचं सांख्यिकी कारण आहे, अपूर्ण विदा. सहजरीत्या पूर्ण विदा आपल्याला दाखवली जात नाही; दाखवलं जातंय ते र्अध चित्रही नाही, हे आपल्याला माहीतही नसतं.

हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीसारखीच परिस्थिती दिसते. आणि आपण आपल्याला मान्य करायचं आहे तेवढंच सत्य, म्हणत भांडत राहतो.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com