संहिता जोशी

एकेकटय़ानं गूगल वापरणारी माणसं, जे हवं त्याचाच शोध घेताना सभ्यपणाचे संकेत वगैरेंमुळे दबणार नाहीत, गूगलशी खोटंही बोलणार नाहीत.. मग त्यांचं राजकारण आणि त्यांची नैतिकता यांचा संबंध लावता येईल?

पूर्ण विदा (डेटा) कशी असते आणि विदेनुसार त्यातून काय शिकता येतं, किंवा विदाविज्ञानामुळे आपल्याला आपल्याबद्दलच अनेक गोष्टी कशा कळू शकतात, याची काही उदाहरणं या लेखात बघू. लेखात सांगितलेलं अमेरिकी उदाहरण Everybody Lies या पुस्तकातून घेतलं आहे.

चारचौघांत बोलण्या-वागण्याच्या, सभ्यासभ्यतेच्या काही कल्पना असतात. शिवीगाळ करणं हे सभ्यतेच्या मर्यादेत बसत नाही. त्यामुळे एखाद्या सभ्य-सुशिक्षित दिसणाऱ्या व्यक्तीनं आपल्याला विचारलं, ‘तुम्ही शिव्या देता का?’ तर याचं उत्तर ‘नाही’ असं देणारे बरेच लोक सापडतील. किंवा ‘खूपच कमी वेळा’, असं म्हणणारे बरेच लोक सापडतील. तरीही आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर, फेसबुक-ट्विटरवर शिवीगाळ करणाऱ्या पोस्ट्स बरेचदा दिसतात. ज्यांच्या नावानं शंख चालतो, ती व्यक्ती बहुतेकदा आपल्या ओळखीची नसते. विशेषत: वातावरण तापलेलं असतं, निवडणुकांचा हंगाम असतो तेव्हा तर फारच. तसं कोणाला तोंडावर विचारलं, ‘तुम्ही जातपात मानता का?’ तर लोक बहुतेकदा ‘नाही’ असं उत्तर देतील. खरंच जातपात मानणं कमी झालं असेल का? किंवा धर्माच्या आधारावर लोकांना हीन लेखणं, वाळीत टाकणं कमी झालंय का?

मला या प्रश्नांची नक्की उत्तरं माहीत नाहीत. पण हे प्रश्न सुचले ते वर उल्लेख केलेल्या पुस्तकातून. पुस्तकाचा लेखक सेथ स्टीफन-ड्विडोविट्झ यानं केलेल्या ‘अभ्यासाची गोष्ट’ या लेखातून बघू.

२०१६ साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यात हिलरी क्लिंटन निवडून येणार आणि डॉनल्ड ट्रम्प हरणार, असं बहुतेकशा एग्झिट पोल्समध्ये दिसत होतं. प्रत्यक्षात हिलरीला ट्रम्पपेक्षा जास्त मतं मिळाली, पण इलेक्टोरल कॉलेज नावाच्या प्रस्थापित अमेरिकी पद्धतीनुसार ट्रम्प जिंकला. एग्झिट पोल घेणाऱ्यांचं काय चुकलं? अर्थात, त्या लोकांना इलेक्टोरल कॉलेज वगैरे सगळे तपशील पुरेसे माहीत होते. मग काय माहीत नव्हतं?

ट्रम्पच्या आधी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असलेला बराक ओबामा कृष्णवर्णीय आहे. वंशवाद ही गोष्ट अमेरिकेत सभ्य समजली जात नाही. त्यामुळे चारचौघांत कृष्णवर्णीयांना नावं ठेवलेली दिसत नाहीत. पण काळा माणूस राष्ट्राध्यक्ष झाल्याचं अनेकांना आवडलेलं नव्हतं. ट्रम्पनं तसं स्पष्ट न म्हणता, आडूनआडून टीका करायला २०१० सालापासून सुरुवात केली होतीच.

आपण गूगलतून बऱ्याच गोष्टी शोधतो. मला या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आठवत नव्हतं, लेख लिहिताना ते शोधलं. कधी इंग्लिश शब्दाचा अर्थ माहीत नसतो, कधी माझ्या छंदांसंदर्भात शोधाशोध करते. गेल्या आठवडय़ात ‘ग्रम्पी कॅट’ची मॉडेल मांजर गेली, तर तिचे फोटो शोधले. या सगळ्या गूगलशोधांची नोंद गूगल करतं. कोणत्या भागांतून, कधी, काय शोधलं जातं याचे आकडे ‘गूगल ट्रेंड’मधून सहज सापडतात.

कोणी, कधी, काय शोधलं, याचा तपास घेत असताना त्या लेखकाला असं लक्षात आलं की अमेरिकेच्या विशिष्ट भागांमधून ‘निगर जोक्स’ असं लोकांनी गूगलमध्ये शोधलं होतं. (‘निगर’ हा शब्द अत्यंत वंशवादी समजला जातो; आपल्याकडे अशा शब्दाशी समांतर शब्द वापरल्यास अ‍ॅट्रोसिटीचा दावा होऊ शकेल.) या वाक्याचा सांख्यिकी (स्टॅटिस्टिक्सनुसार निघणारा) अर्थ काय? अमेरिकेच्या सगळ्याच भागांमधून लोकांनी काळ्या लोकांबद्दल केलेले विनोद शोधले. पण काही विशिष्ट भागांमधून या शोधाचं प्रमाण बरंच मोठं होतं. ज्या भागांत माणसं जास्त, तिथे अशा शोधांचे आकडे जास्त असतील. म्हणून माणशी किती शोध घेतले गेले, याची तुलना केली जाते.

त्यातही भाषा आणि समाज यांची गंमत बघू. काळ्या माणसांनी एकमेकांना ‘निगा’ किंवा ‘निगर’ म्हणणं सभ्य समजलं जात नाही, म्हणजे ऑफिसात कोणी असं बोलणार नाहीत; पण त्यात वंशवादही नाही. पण गोऱ्या वर्णाच्या किंवा आपण भारतीय लोकांनी हा शब्द काळ्या लोकांबद्दल वापरणं वंशवाद आहे. रॅप संगीतात बरेचदा हा शब्द येतो, पण तो ‘निगा’ (nigga) असा येतो, निगर (nigger) नाही. फक्त ‘निगर’ असं गूगलण्यातही वंशवाद असेलच असं नाही, कारण ठरावीक व्यक्तीसाठी शिवी म्हणून हा शब्द वापरलेला नाही. आकडे बघायचे तर कृष्णवर्णीय लोकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या रॅप संगीतात वापरला जाणारा शब्द, ‘निग्गा’  सर्वाधिक गूगलप्रिय आहे. त्यापुढे शोधला जातो तो ‘निगर’ आणि सगळ्यात कमी प्रमाण आहे ‘निगर जोक्स’चं.

अमेरिकेच्या ज्या भागांमध्ये ‘निगर जोक्स’ सगळ्यात जास्त प्रसिद्ध होते, तिथे ट्रम्पला जास्त मतं मिळाली. याचा अर्थ कसा लावायचा? सगळ्यात आधी शब्दांचे संदर्भ बघावे लागतात. अपमानास्पद शब्दाची तुलना साध्या शब्दाशी करता येत नाही. दुसरी गोष्ट, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार हे आकडे बघावे लागतात. तिसरं महत्त्वाचं म्हणजे सामाजिक संदर्भ. भारतात ‘निगर जोक्स’ याला फार महत्त्व देता येणार नाही, कारण भारतात कृष्णवर्णीयांची संख्या फारच कमी आणि वंशवादाचा इतिहासही भारताला नाही. (भारतात याला समांतर जातीयवाद किंवा धर्मद्वेष म्हणता येईल.)

जिथे ‘निगर जोक्स’ सगळ्यात जास्त प्रमाणात शोधले तिथे ट्रम्पला एग्झिट पोलपेक्षा जास्त मतं मिळाली; दोन्हींमध्ये साधर्म्य आहे; दोन गोष्टींत साधर्म्य आहे म्हणूनच एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडली असं थेट म्हणता येत नाही. किंबहुना संख्याशास्त्रात प्रसिद्ध वाक्य आहे  – correlation doesn’t mean causation,  परस्परसंबंध म्हणजे कार्यकारणभाव नव्हे. अमेरिकेत गोऱ्या लोकांना कृष्णवर्णीय ओबामा राष्ट्राध्यक्ष होणं फार आवडलेलं नव्हतं. त्यामुळेच ट्रम्प जिंकला असं म्हणता येत नाही; पण गौरेतर लोकांविरोधात ट्रम्पनं केलेली भडकाऊ विधानं, ट्रम्पनं ओबामाचा जन्म अमेरिकेत झालाच नाही असा सुरू केलेला विवाद, आणि वंशवादी गूगल शोध यांमधून ही कारणपरंपरा दिसते.

आपण गूगलला बऱ्याच गोष्टी विचारतो, आणि विचारताना सांगतोसुद्धा. या पुस्तकाच्या लेखकाचं नाव मी गूगलला विचारलं, तेव्हा गूगलला मी ‘सांगितलं’ की मला या पुस्तकात रस आहे. किंवा ‘ग्रम्पी कॅट’मध्ये मला रस आहे. हे पुस्तक किंवा ‘ग्रम्पी कॅट’ या गोष्टी सभ्य समजल्या जातात. अशा सभ्य गोष्टी आपण सहज समाजमाध्यमांवरही लिहितो; समाजशास्त्रज्ञ-विदावैज्ञानिक (डेटा सायंटिस्ट) त्याचाही अभ्यास करतात. ज्या गोष्टी सभ्य समजल्या जात नाहीत त्या लोक गूगलवर शोधतात, हे या ‘निगर जोक्स’-प्रकल्पातून समजलं.

आपण गूगलवर काय शोधतो, हे इतरांना समजत नाही. आपल्या घरात बसून, फोन किंवा संगणकावरून शोधताना आपण काय बघतोय, काय वाचतोय हे घरातल्या इतरांना बहुतेकदा माहीत नसतं; त्यामुळे असभ्य मानल्या गेलेल्या कित्येक गोष्टी घरी बसून शोधता येतात. सर्वेक्षण करणाऱ्या माणसाशी किंवा फोनवर आपण एक वेळ खोटं बोलूही, पण खासगीपणाच्या सोयीमुळे आपण गूगलशी खोटं बोलत नाही.

त्यामुळे गूगल-शोध आणि फेसबुक-ट्विटर यांच्यावर आपण आता ज्या नोंदी करत आहोत, त्यातून आजचे भारतातले सभ्यतेचे संकेत कोणते आणि तरीही लोकांच्या मनात काय असभ्य विचार असतात, हे शोधणं सहज शक्य आहे.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com