03 April 2020

News Flash

नफ्यापुरतीच पाळत

आपण गूगलवर काय शोधतो, याची साद्यंत नोंद गूगल ठेवतं. किती वाजता, कोणी, काय प्रश्न विचारले अशी सगळी माहिती गूगल जमवतं.

(संग्रहित छायाचित्र)

संहिता जोशी

किती वाजता लोक कोणत्या शब्दाचा शोध घेत असतात, यामध्ये शोधयंत्र-संकेतस्थळांना कशाला रस असायला हवा? लोकांच्या खासगीपणावर आक्रमण नाही का हे? — या प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी, ‘खासगीपणावर आक्रमण’ कुणाच्या आणि कशाकरिता, हे जरा तपासून पाहू.. त्यातूनच कदाचित, हे प्रश्नच तितके महत्त्वाचे वाटणार नाहीत. पण म्हणून, विदा-संकलन सर्रास चालणाऱ्या आजच्या काळात लोकांना खासगीपणाचा हक्क नसतो, असं कुणी मानू नये..

आपण गूगलवर काय शोधतो, याची साद्यंत नोंद गूगल ठेवतं. किती वाजता, कोणी, काय प्रश्न विचारले अशी सगळी माहिती गूगल जमवतं. त्यावरून आपलं वय, व्यवसाय, उत्पन्न, लिंग, अशा किती तरी खासगी गोष्टींचा अंदाज गूगलला करता येतो.

ठरावीक शब्द, पॉर्न, सेक्स, जे चारचौघांत, स्त्री-पुरुष एकमेकांसमोर सहसा वापरणार नाहीत, भारतीय लोक साधारण रात्री ११ वाजता आणि दुपारी दोन-तीन वाजता शोधतात. अशा शब्दांचा शोध रात्री घेणं साहजिकच आहे असं मला वाटलं होतं; पण दुपारी शोधतात म्हणजे ऑफिसात चहाच्या वेळेत नक्की काय चालतं? गूगलनं ही विदा (डेटा) साठवली नसती तर अशी शंकाही आली नसती. याचा अर्थ आपल्याला काही खासगीपणाच उरलेला नाही; आपण कोणाला मत दिलं हेही गूगलला समजू शकतं; अशा शंका उपस्थित होणं साहजिक आहे.

विदा (डेटा), त्यासंबंधित तंत्रज्ञान आणि विदाविज्ञानामुळे (डेटा सायन्स) खासगीपणा, व्यक्तिगत मतं, निर्णयस्वातंत्र्य अशा अनेक मूल्यांवर परिणाम होत आहे, हे मी आधीच म्हणून घेते. पण गूगल ट्रेंड्समुळे, मतदान आता गुप्त राहिलेलं नाही, हे विधान पटण्यासारखं नाही. खासगीपणा, व्यक्तिगत अवकाश म्हणजे नक्की काय?

गेल्या लेखात म्हटलं की, अमेरिकी समाजात अजूनही कृष्णवर्णीय लोकांबद्दल आकस आहे, आपल्याकडे जाती-धर्मावरून हिणवणं चालतं तसं; आणि ज्या भागांमध्ये वंशवादी लोकांचं प्रमाण जास्त आहे त्या भागांमधून डॉनल्ड ट्रम्पला जास्त मतं मिळाली. हा अभ्यास करून त्या वंशवादी लोकांच्या खासगीपणाचा भंग झाला का?

लोकांना वंशवादी विचार करण्याचं स्वातंत्र्य असावं का? वंशवादी असणं म्हणजे नक्की काय? भारतीय संदर्भात जातीयवादी किंवा धार्मिक उन्मादी म्हणू.

असे प्रश्न वेळोवेळी विचारले जातात; ते विचारले पाहिजेत आणि काळानुसार बदलती उत्तरंही शोधली पाहिजेत. खासगीपणा म्हणजे काय? बदलाच्या वानगीदाखल, माझ्या आजीच्या पिढीत पाळी सुरू असताना बाहेर बसावं लागत असे; पाळी सुरू आहे का, ही व्यक्तिगत स्वरूपाची माहिती चारचौघांना समजावी का नाही, यावर बाईचा हक्क आता मी गृहीत धरते.

एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यातून चालताना आपण बिनधास्त फोनवर बोलतो. आपलं बोलणं आजूबाजूच्या लोकांना ऐकू जात नाही असं नाही; पण तिथं आपल्याला कोणी ओळखत नसतं. रस्त्यातून चालताना पुरणपोळीची पाककृती सांगितली काय किंवा आपल्याबद्दल अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाची माहिती फोनवरून सांगितली तरी फरक पडत नाही. वेगवेगळ्या लोकांशी आपली नाती वेगवेगळी असतात. कोणाशी कसं नातं आहे, काय प्रकारचे संबंध आहेत, त्याप्रमाणे त्यांना स्वत:बद्दल काय सांगायचं हे आपण ठरवतो. अनोळखी लोकांनी आपल्याबद्दल किंचित व्यक्तिगत माहिती ऐकली, तरीही बरेचदा काहीही फरक पडत नाही.

गूगल ही कोणी व्यक्ती नाही. माणसांना जसा परिचितांबद्दल गॉसिप करण्यात, उणीदुणी काढण्यात रस असतो, तसा गूगल (किंवा इतर कोणत्याही कंपन्यांचा) उद्देश नसतो. आपण आपल्या खासगी आयुष्यात काय करतो, यावरून आपल्याबद्दल भलंबुरं मत बनवून गूगल किंवा कोणालाही पैसे मिळत नाहीत. या कंपन्यांचं उद्दिष्ट एकमेव आहे, अधिकाधिक लोकांनी त्यांची सेवा वापरली पाहिजे, त्यांच्या एकाधिकारशाहीला धक्का लागू नये आणि त्यातून त्यांना चिकार नफा मिळावा. नफा मिळाल्यामुळे जगाचं काही भलं झालं का वाईट झालं, यात या कंपन्यांना रस नाही.

निवडणुकांत गुप्त मतदान असतं. म्हणजे आपण कोणाला मत दिलं, हे कोणत्याही उमेदवारांना, पक्षाला समजण्याची सोय असू नये. तरीही मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांना किती मतं मिळाली, हे सगळ्यांना समजतं. तसंच आपण दुपारी ३ वाजता ते ठरावीक शब्द शोधले का आणखी काही, यात गूगलला रस नाही. जे काही शोधलं ते गूगल वापरून शोधलं का, आणखी कोणती शोध-सेवा वापरून यात त्यांना रस असतो.

आपल्याकडे ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे सगळे लोक अगदी १०० टक्के एकसमान असतात, असं नाही. निवडणुकांमध्ये सगळे मतदार एकाच उमेदवाराला मत देतात असं नाही. तर ज्या उमेदवाराला सगळ्यात जास्त मतं मिळणार, तो जिंकणार. पिंडी ते ब्रह्मांडीच्या बाबतीतही तेच खरं. जे गुणधर्म बऱ्याच माणसांमध्ये असतात, ते गूगलमध्ये दिसणार, ते ब्रह्मांडी असणार. उलट बाजूनं बघितलं तर बरेच लोक रात्री अकराच्या सुमारास ठरावीक शब्द गूगलतात म्हणून सगळेच लोक फक्त तेच शोधत असतात असंही नाही. रात्री ११ वाजता अनेक लोक फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा नेटफ्लिक्स बघत असतील. काही लोक रात्री ११ वाजता झोपलेले असतील. शिवाय गूगल, तंत्रज्ञान न परवडणारा एक मोठा वर्ग आहे; त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यांची विदा गूगलकडे नाही.

समाज काय- कसा आहे, याचा विचार करताना गूगल वापरणारे लोक मोठय़ा संख्येनं आहेत आणि त्यांना कोणकोणत्या गोष्टींत रस आहे, यावरून समाज म्हणून आपण कसा विचार करतो, हे मात्र शोधता येतं. आजच्या काळात ‘बिगडेटा’ वगैरे शब्द वापरले जातात; तशी महाप्रचंड विदा गूगलकडे आहे. त्यामुळे लोक ‘पॉर्न’ हा शब्द जास्त शोधतात का ‘सेक्स’ हा शब्द शोधतात हे दिसतं; तसंच दिवसाच्या कोणत्या वेळेला शोधाचं प्रमाण वाढतं, यात प्रत्येक राज्यानुसार काही फरक दिसतात का, महानगरांत राहणारे लोक आणि निमशहरी, ग्रामीण भागांतले लोक यांच्या वर्तनात काही फरक आहे का, हेही तपासून बघता येतं.

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठरावीक शब्द मोठय़ा प्रमाणावर गूगलले जातात, हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं; ते समजल्यावर त्या सुमारास ऑफिसात फिरून लोकांच्या स्क्रीनकडे बघायला लागले, तर ते निश्चितच लोकांच्या खासगीपणावर आक्रमण होईल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला थोडं काही समजलं की लगेच त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डिनवर धडकणं हा डिजिटल भोचकपणा म्हणता येईल. दोन्हींत फरक असा आहे की कोणाच्या मॉनिटरमध्ये दुपारी ३ वाजता डोकावून बघायचं असेल तर मी डोकावून बघते हे ऑफिसातल्या बऱ्याच लोकांना समजेल. मला माझ्या जागेवरून उठण्याचे कष्ट घ्यावे लागतील. शिवाय, यात जरा जोखीम अशी की मी भोचकपणा करते हे लोकांना समजलं तर लोक माझ्यापासून अंतर ठेवून राहतील. पण अनोळखी लोकांबद्दल थोडी माहिती समजली म्हणून त्यांच्या फेसबुक किंवा लिंक्डिनमध्ये धडकण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत; असं डोकावलेलं आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजेल असंही नाही. म्हणजे आपला भोचकपणा आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजेलच असंही नाही.

गूगल (किंवा बिंग, याहू, आणखी कोणत्या शोध-सेवा) यांना स्वत:हूनच आपण माहिती पुरवत असतो. फेसबुक, लिंक्डिन वगैरे समाजमाध्यमांवर आपण कोणाच्या संपर्कात राहायचं हे आपण ठरवतो. ही माहिती जसे संशोधक जमा करतात, तसेच या कंपन्याही आपली माहिती जमा करतात. त्यातून आपल्याला साबणापासून घरापर्यंत आणि आजीबाईच्या बटव्यापासून ग्लोबल-वॉìमगपर्यंत सगळ्याबद्दल माहिती-मतं पुरवत असतात. त्यातून त्यांना फक्त नफा हवा असतो, त्यामुळे आपली माहिती गोळा करतात यात त्यांचा एकेका व्यक्तीविरोधात काहीही अजेंडा नसतो!

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2019 12:12 am

Web Title: vidabhan article by sanhita joshi 17
Next Stories
1 गूगलशी कशाला खोटं बोलू?
2 चूक, त्रुटी की अन्यायही?
3 नसतं तसं कसं दिसतं?
Just Now!
X