संहिता जोशी 314aditi@gmail.com

‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपायचं’ म्हणून जुनी, जातीयतावादी मूल्यं आणि सर्वसमावेशक उदारमतवादी मूल्यं खरोखरच एकमेकांसमोर चच्रेला आणावीत का? ‘जातीयतावाद वाईट आहे’ याबद्दल चर्चा घडवून आणायची असेल तर उदारमतवादाखातर ‘जातीयतावाद चांगला आहे’, असं म्हणणारे लोकही बसवायचे का?

‘पृथ्वी गोल आहे’, या वाक्याचं विरुद्धार्थी वाक्य काय असेल? शाळेत जे व्याकरण शिकवतात त्यानुसार ‘पृथ्वी गोल नाही’ हे विरुद्धार्थी वाक्य ठरेल. पृथ्वी ही आकार असणारी, भौतिक गुणधर्म असणारी वस्तू आहे. म्हणजे जर पृथ्वी गोल नसेल तर तिला इतर काही आकार असला पाहिजे. हा प्रश्न फक्त व्याकरणापुरता मर्यादित आहे का?

समजा चित्रवाणी वाहिन्यांतल्यासारखी ‘खिडकी-चर्चा’ घडवून आणायची आहे, पृथ्वीचा आकार गोल आहे का नाही, तर इतर कोणकोणत्या आकारांचे प्रतिनिधी बोलावता येतील? चंद्राच्या तिथ्या शोधायच्या तर पृथ्वीचं वस्तुमान एका बिंदूत सामावलेलं आहे (कृष्णविवरासारखं), हे गृहीतक पुरेल; चंद्रग्रहणाची गणितं करण्यासाठी पृथ्वी घनगोल मानणं पुरेसं; शेजार-शेजारच्या दोन गावांना जोडणारा कच्चा रस्ता पक्का करायचा असेल तर पृथ्वी सपाट आहे, असंही मानता येईल. कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवताना पृथ्वीचा आकार रसगुल्ल्यासारखा आहे- ध्रुवांकडे चपटा आहे आणि विषुववृत्ताकडे फुगीर, याचा विचार करावा लागेल. ‘खिडकी-चच्रे’साठी या विविधतेचा काही उपयोग नाही.. कारण हे लोक आपसांत भांडण्याची शक्यता कमीच. आपल्या उपयोगानुसार मोजमाप कसं करायचं ठरणार- बाळांची उंची मोजायला जी पट्टी वापरतात, तिनं कुणी रस्त्याची लांबी मोजायला जात नाहीत. अंतरच मोजायचं असतं, पण किती अंतर मोजायचं आहे, यावरून फुटपट्टी वापरायची का व्हर्नियर कॅलिपर, का आणखी काही, हे ठरवलं जातं.

अमेरिकेत काही गमतीशीर गट आहेत; त्यांतला एक गट पृथ्वी सपाट असल्याचं मानतो. ‘आमच्या धर्मग्रंथात असंच लिहिलेलं आहे’ म्हणत ते लोक विज्ञान-तंत्रज्ञानातून मिळालेले वैज्ञानिक निष्कर्ष नाकारतात. ‘खिडकी-चर्चा’ चुरचुरीत करायची असेल आणि चच्रेतून चुकीची माहिती, संदेश पसरत नाहीत याची पर्वा नसेल तर या सपाट-पृथ्वी-भक्तांना खिडकी-चच्रेसाठी बोलावता येईल. एरवी वेगवेगळ्या अभियंत्यांना बोलावून लोकांचं प्रबोधन झालं असतं; थोडी माहितीची देवाणघेवाण झाली असती. आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅपवर अशा अनेक अंधश्रद्धा सुखासुखी पसरवल्या जातात. चुरचुरीतपणाच्या मोहात ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान तपासण्याजागी चर्चा धर्माधारित श्रद्धांकडे वळते. पृथ्वी सपाट असण्याच्या कल्पनेला निष्कारण वजन येतं.

फेसबुक, रेडिट, ट्विटर वगैरे चच्रेची माध्यमं सुरू केली तेव्हा तंत्रकुशल लोकांच्या डोक्यांत स्वप्नाळू कल्पना होत्या. लोकांना एकमेकांशी चर्चा करता यावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि कदाचित आपलं नाव सांगून ज्या गोष्टी मांडायला लोकांना लाज वाटते, त्याही गोष्टी आंतरजालाच्या पडद्याआड, टोपणनाव वापरून लिहिता येतील. आपसांत चर्चा करणं, एकमेकांच्या संस्कृतींबद्दल माहिती करून घेणं, यांतून परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी वगैरे भावना वाढीस लागतील.

रेडिटचा एक प्रवर्तक स्टीव्ह हफमन म्हणतो, कायद्याच्या चौकटीत बसणारं कोणतंही लेखन आमच्या संस्थळावरून काढण्याची गरज नाही; कायदे करणारे लोक त्या विषयांतले तज्ज्ञ आहेत, मला समजतं त्यापेक्षा जास्त त्यांना समजतं. त्यामुळे कायद्याचा शब्द अखेरचा मानायला हरकत नाही.

रेडिट सुरू झालं २००५ मध्ये. अमेरिकी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कायदे बनवले गेले, तेव्हा रेडिट नव्हतं. तेव्हाच्या लोकांच्या संवेदना आणि जाणिवा निराळ्या होत्या. आपल्याकडेही जुन्या साहित्यात असे शब्द सापडतात, जे आता वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कारण आता न्याय-अन्याय म्हणजे काय, सभ्यपणा म्हणजे काय याच्या कल्पना आणि संपूर्ण समाजाच्या जाणिवा बदलल्या आहेत.

रेडिट, फेसबुक वगैरे सुरू झाले तेव्हा हे असं तंत्रज्ञान अस्तित्वात असू शकतं, ते लोकप्रिय होऊ शकतं आणि सभ्य, पापभीरू लोकांसारखेच वर्ण-वंश-जात आणि इतर अनेक सबबींवरून इतरांचा द्वेष करणारे, दंगली किंवा हिंसाचाराची चिथावणी देणारे लोकही ते तंत्रज्ञान वापरू शकतात, याची कल्पना कोणालाच नव्हती. कायदेतज्ज्ञांना तंत्रज्ञानाची कुवत माहीत नव्हती; तंत्रतज्ज्ञांना त्याचा लोकांवर होणारा परिणाम माहीत नव्हता आणि हे व्यवसाय सुरू करणाऱ्यांना आपली संस्थळं एवढी लोकप्रिय होतील (की लोकप्रियताच त्यांच्या मूळ हेतूला हरताळ फासू शकेल) याची कल्पना नव्हती. अर्थशास्त्रात याला विखंडित ज्ञान (डिस्पस्र्ड नॉलेज) म्हणतात. हुसेनच्या चित्राचा रंग कोणता, हे एका दृष्टिहीनानं आणखी चार दृष्टिहीन लोकांना विचारलं म्हणून उत्तर मिळणार नाही. आपल्या तंत्रज्ञानाचा जगावर वाईट परिणाम होईल, अशी पुसट शंकाही या लोकांना आली नव्हती.

फेसबुक, रेडिट, ट्विटर ही समाजमाध्यमं मुख्य धारेतली आहेत. अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत, विशेषत: एकेकटय़ा गोऱ्या पुरुषांनी सामूहिक हत्याकांडं घडवली, त्यांच्यात एक समान दुवा होता. ते सगळे एकाच संस्थळावर बागडत होते; त्यांचा बुद्धिभेद तिथेच झाला का, हे नक्की सांगता येत नाही. पण आपले हिंसक हेतू त्यांनी या संस्थळावर जाहीर केले होते. अशी संस्थळं मुख्य धारेतली समाजमाध्यमं समजली जात नाहीत. पण फेसबुक, रेडिट वगरेंवरही हिटलरनं केलेलं ज्यू लोकांचं शिरकाण, होलोकॉस्ट ‘झालंच नाही’; पृथ्वी ‘सपाट आहे’; ‘लसींमुळे मुलं स्वमग्न होतात’ असं मानणाऱ्या आणि जात-वर्ण-वंशवर्चस्ववादी लोकांची कमतरता नाही. ते या हिंसक, फूट पाडणाऱ्या आणि/किंवा विघातक अंधश्रद्धा बाळगतात आणि पसरवतात. त्यातही वैज्ञानिक अंधश्रद्धा कमी उपद्रवी ठरतात; त्यांचा प्रतिवाद करणं तुलनेनं सोपं.

कठीण काम असतं, ते लोकांच्या मनांतला द्वेष निपटून काढणं. आपलं काही चुकतंय, हे ज्यांना समजत नाही; त्यांच्यात बदल होणं शक्य नाही. लोकांच्या समजुती आणि गैरसमजुतीही देवाणघेवाणीमुळे घट्ट होऊ शकतात. चच्रेमुळे मतपरिवर्तन होऊ शकतं, हा गैरसमज नाही; ज्यांना कोणी चूक पटवून देतात, त्यांचं मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते. या उलट, आपल्यासारख्याच धारणा असणाऱ्या समूहात गेल्यावर आपल्या धारणा आणखी घट्ट होण्याची शक्यता वाढते. फेसबुक ज्या प्रकारे आपल्या भिंतीवर पोस्टी दाखवतं; गूगलल्यावर जी संस्थळं समोर येतात; त्यात आपल्या मतांच्या विरोधी गोष्टी समोर येण्याची शक्यता नगण्य असते. समजा, आपला असा ग्रह असेल की मोबाइलमुळे तरुण बिघडतात असं वाटत असेल तर आपल्या दृष्टीनं बिघडलेल्या तरुणांच्या मोबाइलवापराकडे आपण काटेकोर नजर ठेवून तेवढीच गोष्ट ध्यानात ठेवू. कोणी तल्लीन होऊन मोबाइलवर गंभीर वाचन करत असेल तरीही त्यांची मोजणी ‘मोबाइलमुळे बिघडलेले’ यांतच होईल.

विदा आणि त्यासंबंधित तंत्रज्ञानाचा विचार करता अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. जुनी, जातीयतावादी मूल्यं आणि सर्वसमावेशक उदारमतवादी मूल्यं खरोखरच एकमेकांसमोर चच्रेला आणावीत का? ‘जातीयतावाद वाईट आहे’ याबद्दल चर्चा घडवून आणायची असेल तर उदारमतवादाखातर ‘जातीयतावाद चांगला आहे’, असं म्हणणारे लोकही बसवायचे का? उदारमतवाद म्हणजे विषारीपणा, विखार यांना करुणा, सहृदयता यांच्या जोडीचं स्थान देणं नाही. जातीयतावाद वाईट, असं सगळी माध्यमं म्हणतील. किती सफाई कामगार ड्रेनेजमध्ये पडून मरतात याबद्दल ‘द गार्डियन’ या ब्रिटिश संस्थेनं लेख लिहिले तरी भारतीय माध्यमं लिहीत नाहीत; हा जातीयतावाद आहे का याबद्दल चर्चा करणं महत्त्वाचं ठरतं.

गेल्या आठवडय़ातआलेला ताजा कलम – राजकीय नेत्यांकडून आलेल्या बनावट बातम्या, चर्चा फेसबुकवरून हटवल्या जाणार नाहीत, असं फेसबुकच्या शेरील सँडबर्गनं जाहीर केलं आहे.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.