‘आदर्श’ घोटाळाप्रकरणी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खापर फोडल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली आहे. या वक्तव्याबद्दल पृथ्वीराजबाबांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी मुळत हे विधानच चुकीचे होते, अशी तोफ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी डागली. सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनीही पक्षाच्या नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. ‘घर फिरले की वासेही फिरतात’ या म्हणीचा पृथ्वीराजबाबांना आता अनुभव येऊ लागला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:ची प्रतिमा उंचविण्याच्या प्रयत्नात पक्षाच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले. अशोक चव्हाण न्यायालयीन चौकशीत दोषी आढळले होते. तसेच आपण या नेत्यांच्या विरोधात कारवाई केली असती तर काँग्रेस पक्ष फुटला असता, असेही मत त्यांनी त्या मुलाखतीत मांडले होते. काँग्रेस नेतृत्वाने या मुलाखतीची गांभीर्याने दखल घेतल्यानेच बहुधा पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असावी. मुलाखत संपल्यावर संबंधित प्रतिनिधीशी बोललो ते छापण्यात आल्याची सारवासारव चव्हाण यांनी केली.
पक्षाच्याच माजी मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे वा त्यांच्याबद्दल संशय निर्माण करणे हे सारेच चुकीचे असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. चव्हाण यांनी या संदर्भात खबरदारी घ्यायला पाहिजे होती, असे सांगत ठाकरे यांनी पृथ्वीराजबाबांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा संतप्त झाले असून त्यांनी थेट सोनिया गांधी यांच्याकडेच तक्रार केल्याचे सांगण्यात येते. दुसरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही संतप्त भावना व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाबाबत योग्य वेळी बोलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सारे खापर पृथ्वीराजांवर?
निवडणुकीत काँग्रेसला फार काही चांगल्या यशाची अपेक्षा नाही. मतदानोत्तर चाचण्यांमध्येही पक्षाची पीछेहाट झालेली दिसते. या पाश्र्वभूमीवर रविवारी निकाल विरोधात गेल्यास पक्षाचे सारे नेते एकमुखी या पराभवाचे खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडणार हे जवळपास स्पष्ट आहे. या मुलाखतीमुळे संतप्त झालेले नेते या संधीचा फायदा घेण्याची शक्यता आहे.