दिवस उगवण्यापूर्वी पडणारे दाट धुके, दुपारी अंगाची लाहीलाही करणारे कडक ऊन अन् सायंकाळी बरसणाऱ्या जलधारा अशा एकाच दिवशी वातावरणाच्या तीन तऱ्हा अनुभवण्यास मिळू लागल्या आहेत. दिवसभराचे तप्त वातावरण आणि सायंकाळनंतर पडणारा पाऊस यामुळे निवडणुकीच्या नियोजनाचे मात्र तीन तेरा वाजू लागले आहेत. मुळातच प्रचाराला वेळ कमी असताना बदलत्या वातावरणामुळे विधानसभा निवडणुकीस उभे असलेले उमेदवार व त्यांचे समर्थक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
 दिवसाची सुरुवातच मुळात दाट धुक्याने होत आहे. हिवाळ्यातील धुक्याप्रमाणेच धुक्यांचे वलय असल्याने ग्रामीण भागात प्रचाराला दिवसा लवकरच सुरुवात करणे अडचणीचे बनत आहे. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो.  सायंकाळी उन्हे उतरल्याने उमेदवारांना जरा कुठेसे हायसे वाटू लागते. पण तोवर आकाशात काळ्या ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट होऊ लागतो. पाठोपाठ परतीच्या पावसाचा दणका काय असतो हे अनुभवयास मिळते. याचा परिणाम सायंकाळी आयोजित केलेल्या कोपरा सभांचे नियोजन पार कोलमडून पडते.
उमेदवार काळवंडले
गेले पंधरा दिवस सर्व पक्षीय उमेदवार प्रचाराच्या रणात उतरले आहेत. दिवसभर ते रणरणत्या उन्हात फिरत असल्याने उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ लागला आहे. बहुतांशी सर्वच उमेदवारांचे चेहरे काळवंडले आहेत. एरव्ही वातानुकूलीत निवास, कार्यालय व वाहनात वावरणाऱ्यांना ऑक्टोबर हिट म्हणजे काय असते हे प्रकर्षांने जाणवू लागले आहे. शिवाय दररोज ८-१० किलोमीटरची पायपीट होत असल्याने पाय कमालीचे दुखत असल्याने वेदनाशामक औषधे घेऊन दुखण्यावर मात करावी लागत आहे.