सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नसतानाही दिल्लीत भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना राजकीय परिस्थितीचा अहवाल पाठविला असून भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याची परवानगी मागितली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारने राजीनामा दिला. त्यानंतर १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. जंग यांनी मुखर्जी यांना पाठविलेल्या अहवालात, दिल्लीत निवडून आलेले सरकार स्थापन होण्याची गरज अधोरेखित केली आहे.
दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नसल्याने विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष या नात्याने भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले पाहिजे, असे जंग यांनी म्हटले आहे. निवडून आलेले सरकार स्थापन व्हावे यासाठी सर्व पर्यायांचा विचार नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी व्हावयास हवा, असेही जंग यांनी म्हटले आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाचारण करण्यात आले तर त्याबाबत पक्ष विचारपूर्वक निर्णय घेईल, असे दिल्ली भाजप प्रमुख सतीश उपाध्याय यांनी सांगितले. पक्षाचे सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेते निवडणुकीला सामोरे जाण्याच्या मन:स्थितीत नाहीत आणि याची कल्पना पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांना देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपचा घटक पक्ष असलेल्या अकाली दलाच्या एका आमदारासह भाजपची सदस्यसंख्या २९ होत असून बहुमतासाठी पक्षाला आणखी पाच आमदारांची गरज आहे.
घोडेबाजाराला प्रोत्साहन ‘आप’चा आरोप
दिल्ली विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापनेसाठी पाचारण करण्याच्या नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या योजनेवर आम आदमी पार्टीने (आप) टीका केली आहे. नजीब जंग हे घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आपने केला आहे. जंग हे घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट संकेत मीडियातील वृत्तावरून मिळत आहेत. लोकशाहीची थट्टा करण्यापासून नायब राज्यपाल आणि भाजपला राष्ट्रपतींनी रोखावे. ज्या पक्षाने सरकार स्थापनेसाठी प्रथम नकार दिला होता त्याच पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण देणे ही घटनेची पायमल्ली ठरेल, असे आपचे नेते आशुतोष यांनी ट्विट केले आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हर्ष वर्धन यांनी सरकार स्थापनेला नकार देणारे पत्र दिले होते याचे नायब राज्यपालांना स्मरण असेलच, मात्र सदर बाब राज्यपालांच्या विस्मरणात गेली असल्यास आप त्यांना पत्राची प्रत देऊन स्मरण करून देण्यास तयार आहे. ज्या पक्षाने सरकार स्थापनेला लेखी नकार दिला त्याच पक्षाला सरकार स्थापनेसाठी राज्यपाल कसे पाचारण करू शकतात, असा सवालही आशुतोष यांनी केला आहे.