महायुतीची शकले झाल्यास आघाडीचाही निकाल लावण्याची युक्ती अंमलात आणून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी कायम ठेवण्याचा आग्रह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी धरला होता. परंतु राहुल गांधी यांचा मात्र राष्ट्रवादीवर तीव्र रोष होता. आघाडी स्वतहून न तोडता राष्ट्रवादीला झूलवत ठेवण्याची योजना राहुल गांधी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आखली होती, असा दावा काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आघाडी कायम राहणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी दिले होते. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते असलेल्या पवार यांनी आघाडी होणार असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीस्थित एकही नेत्याने त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.  त्यामुळे पवार स्वतहून आघाडासीठी इच्छूक होते, असे चित्र दिल्लीतील काँग्रेस नेते रंगवत आहेत.
महायुतीचे भवितव्य डगमगण्यास सुरूवात झाल्यानंतर काँग्रेसची स्वबळाची चाचपणी सुरू झाली. मागील आठवडय़ात सलग तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची जिरवण्यासाठी उमेदवार निश्चितीवर भर दिला. बुधवारी थेट ११८ उमेदवारांची यादी घोषीत करून काँग्रेसने राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळले. आघाडी तुटल्याची घोषणा करण्यासाठी राष्ट्रवादीने पत्रकार परिषद बोलवली असल्याचे वृत्त धडकताच प्रदेश कार्यालयातून काँग्रेसच्या जिल्हास्तरील नेत्यांना ‘स्वबळाचा’ आदेश देण्यात आला. राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीशी बोलणी थांबवली. उमेदवार घोषीत झाल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण स्वत निवडणूक लढवत असलेल्या दक्षिण कराड मतदारसंघाकडे रवाना झाले. हाच आघाडी संपल्याचा राष्ट्रवादीला थेट संदेश होता. केंद्रात मंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण सोनिया गांधी यांच्या विश्वासू सदस्यांमध्ये होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राहुल यांच्याशीदेखील जुळवून घेतले. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर सोनिया यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाला अभय दिले होते. परंतु राहुल गांधी यांनी अंतिम निर्णय दिल्यानंतरच चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची शाबूत राहिली. राहुल यांच्याशी चर्चा करून चव्हाण यांनी राष्ट्रवादीला जागावाटपावरून झुलवले.  तुटेपर्यंत ताणा, असा संदेश राहुल यांनी दिल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असताना कराड गाठले व राष्ट्रवादीने आघाडी तुटल्याची घोषणा केली.