तब्बल दोन दशकांनंतर कोणत्याही आघाडी वा युतीविना लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यभरातील सुमारे ६४ टक्के मतदारांनी एकूण ४११९ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद केले. ‘मुंबई वेगळी करण्याचा डाव’, ‘महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा हेतू’, ‘मराठी अस्मितेचे शत्रू’ असे अनेक आरोप करून विरोधी पक्षांनी धारेवर धरल्यानंतरही महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्याच पारडय़ात मत टाकल्याचा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांतून व्यक्त करण्यात आला आहे. पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या मोदींच्या भाजपच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार, असा या चाचण्यांचा सूर आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढत असल्याने चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध अन्य पक्ष असा सामना प्रामुख्याने रंगला होता. विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा मित्र असलेल्या शिवसेनेने तर आपला संपूर्ण प्रचार भाजपविरोधाभोवती केंद्रित केला होता. मात्र, तरीही राज्यातील मतदारांनी भाजपच्याच हातात सत्तेच्या चाव्या दिल्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २७ प्रचार सभा आणि लोकसभा निवडणुकीतील ‘मोदींची लाट’ याचा महाराष्ट्रात प्रभाव पडल्याचे विश्लेषण या चाचण्यांनी केले आहे. top05भाजप आणि मित्रपक्षांना सव्वाशेच्या आसपास जागा मिळतील, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर ५५ ते ७५ दरम्यान जागा जिंकेल, असा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी मांडला आहे. राज्यात १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे पूर्णपणे पानिपत होईल, असे चित्र या चाचण्यांनी उभे केले आहे. त्यातही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फटका बसेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. या दोन्ही सत्ताधारी पक्षांना ४०हून कमी जागा मिळतील, असे मतदानोत्तर चाचण्यांचे भाकीत आहे. ‘टूडेज चाणक्य’ने मात्र, भाजपला १५१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘चाणक्य’ने गतवर्षी पाच राज्यांत झालेल्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत व्यक्त केलेले अंदाज अचूक ठरले होते, हे विशेष!top03राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही मतदार नाकारतील, असा या चाचण्यांचा सूर आहे. गत निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यंदा दोन आकडी संख्या गाठणेही शक्य होणार नाही, असे या चाचण्यांचे म्हणणे आहे. टाइम्स नाऊ-सीव्होटरच्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील ३६पैकी २५ जागा जिंकून शिवसेना या शहरावरील वर्चस्व कायम राखण्याची शक्यता आहे.
वाढीव मतदानाचा भाजपला फायदा
वाढीव मतदान म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधातील कौल, असे मानले जाते. त्यानुसार राज्यात झालेले ६४ टक्क्यांहून जास्त मतदान हे भाजपच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी विभागांमध्ये झालेल्या वाढीव मतदानामुळे भाजपच्या जागा वाढण्यास मदतच होणार आहे.
हरयाणातही भाजपची सत्ता?
मतदानोत्तर चाचण्यांनुसार हरयाणातही भाजपलाच सर्वाधिक मते मिळणार असून राज्यात प्रथमच भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. ‘टुडेज चाणक्य’च्या पाहणीनुसार भाजपला ५२, इंडियन नॅशनल लोकदलाला २३, काँग्रेसला दहा तर अन्य पक्ष व अपक्षांना पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे. एसी नेल्सनच्या मतदानोत्तर पाहणीनुसार भाजपला ४६ तर लोकदलाला २९ जागा मिळतील, असा अंदाज आहे.