शिवसेनेच्या मदतीने आजवर कोकणचा गड सर करणाऱ्या भाजपने, विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागात पक्षाची संघटनात्मक बांधणी फारशी नसल्याने प्रचारासाठी कार्यकत्रे आणि नेते आयात करण्याची वेळ पक्षावर आली आहे. कोकणातील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी आता गोव्यातील मंत्री आणि आमदार प्रचार करणार आहेत.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीसाठी भाजपने आजवर प्रयत्न केलेला नाही. रत्नागिरी आणि गुहागर मतदारसंघ सोडल्यास भाजपचे फारसे अस्तित्वही दिसून येत नाही. अशा वेळी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याने या विभागात भाजपची मोठी अडचण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. आणि म्हणूनच गोव्यातून मंत्री आयात करण्याची वेळ भाजपवर आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी प्रचार प्रमुखांच्या नेतृत्वाखाली २५ जणांची टिम असणार आहे. यात गोव्यातील, आमदार, नगराध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी हे सर्व जण प्रत्येक मतदारसंघात तळ ठोकून असणार आहेत. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ते मतदारांपर्यंत पोहोचण्याची अवघड जबाबदारी यांना पार पाडावी लागणार आहे.
रायगड जिल्ह्य़ात भाजप ही एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्यांपुरती मर्यादित आहे. उरण, अलिबाग, कर्जत आणि पनवेल या ठिकाणी पक्षाचे काही पॉकेट्स आहेत. पक्षाला पनवेल, श्रीवर्धन, पेण मतदारसंघात इतर पक्षांतील आयात केलेले उमेदवार निवडणूक िरगणात उतरवावे लागले आहेत. त्यामुळे आयात केलेल्या उमेदवार आणि प्रचारकांच्या जीवावर भाजप सत्तेपर्यंतची वाटचाल कशी पार करणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.