पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात पण, मोदींचे वर्तन गांधीजींच्या विचारांच्या विसंगत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामटेक मधील जाहीर सभेत केली.
सध्या जागोजागी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यांचे पुजन होते परंतु, त्यांच्या विचारांचे पुजन कोणीच करत नसल्याचेही राहुल यावेळी म्हणाले.
राज्याच्या जडणघडणीत पक्षापेक्षा तेथील जनतेचे मोठे योगदान असते. राज्याच्या जनतेने आपल्या परिश्रमातून आणि रक्त आटवून महाराष्ट्राला घडवले आहे. त्यामुळे गेल्या साठ वर्षांत येथे काहीच न झाल्याचे सांगणारे मोदी राज्यातील जनतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्र गुजरातपेक्षा सर्वच क्षेत्रात पुढेच असल्याचाही उल्लेख यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केला. रामटेकमध्ये जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र व्हावे यासाठी काँग्रेस आग्रही असून त्यासाठी २०० कोटींची तरतूदही करण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले.