युती आणि आघाडीचे तीन दशकांचे राजकारण संपल्याने राजकारणात नवी संस्कृती उदयाला येत आहे.
कोणत्याही परिस्थितीशी झपाटय़ाने जुळवून घेण्याचे कसब राजकारणाकडेच असते..
काडीमोड झाल्याची बातमी गावागावात पोहोचली आणि इच्छुकांनी कपडे बदलले. पाढरी टोपी फडताळात तळाशी ढकलली. खादीचा झब्बा गुंडाळून ठेवला आणि साधा पांढरा कुर्ता अंगावर चढविला. पांढऱ्या चपलांना कपाटात बसावे लागले, आणि साध्या, चामडी चपला कपाटातून बाहेर आल्या.
लेक्सस, स्कर्पियो, इनोव्हा गाडय़ांच्या रांगा रातोरात मुंबईकडे सुटल्या.
सकाळी सकाळी, चर्चगेटच्या योगक्षेमसमोर वसंतराव भागवत चौकात ट्रॅफिक जाम झाले होते. रस्त्यावर गाडय़ांची गर्दी मावत नव्हती.
.. दहाबारा दिवसांपासून तो फेरीवाला कार्यालयाबाहेर बसतोय.. पक्षाचे झेंडे, बिल्ले, क्लिपा, गमछे, टोप्या, स्टीकर अशा असंख्य वस्तू टेबलावर मांडून होईतोवर, समोर गर्दी होत असे.
आजची गर्दी पाहून तो भलताच खुश झाला.
बिल्ले खरेदीसाठी झुंबड उडाली, गमछे हातोहात संपले, आणि रस्त्यावर थांबलेल्या साऱ्या गाडय़ांच्या मागेपुढे पक्षाचे स्टीकर लागले..
तोवर पक्षाच्या नेत्यांची चाहूल सुरू झाली होती.
रात्री तीनचारशे किलोमीटरचा पल्ला पार पाडून पोहोचलेल्या त्या तरुण कार्यकर्त्यांने अंदाज घेतला. स्कॉर्पियोत बसलेल्या सातआठ साथीदारांना गाडीतून उतरण्याची खूण केली, आणि सारे स्टॉलसमोर जमा झाले. सगळ्यांनी गळ्यात पक्षाच्या चिन्हाचे गमछे चढविले, छातीवर कमळाचा बिल्ला चिकटला, डोक्यावर हिरवी-केशरी टोपी चढली, आणि एकमेकांना खाणाखुणा करून सारे कार्यालयात शिरले..
हे वातावरण त्यांना नवखं होतं. पण आता याच वातावरणाशी जुळवून घ्यायचं होतं. सारे एका बाजूला घोळक्याने उभे राहिले.
नेता वाटणारा एकजण समोर आला. जुन्या कार्यकर्त्यांनी त्याला आदबीनं नमस्कार केला, तेव्हा यां घोळक्यानंही ओशाळं हसत नमस्कार केला. आणखी कुणीतरी नेता येताच, जुने कार्यकर्ते बाजूला झाले, आणि नेता पुढे जात असताना झुकून नमस्कार करू लागले. मग यांनीही झुकून नमस्कार केला..
काही वेळाने आणखी एक नेता आला, आणि कार्यालयाचा नूरच पालटला. एकदम शांतता पसरली. चहूबाजूंना पाहात, हसमुखानं तो नेता एकएक पाऊल पुढे येऊ लागला. जुन्या कार्याकर्त्यांची गर्दी त्याच्यासमोर गोळा झाली. पायाला हात लावून नमस्कार करण्यासाठी सारे सरसावले. नेता हसतमुखानं एकेकाच्या खांद्यावर थोपटत होता.
या सगळ्यांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या.. गळ्यातले गमछे सावरले, टोप्या ठाकठीक केल्या, बिल्ले नीट बसवले, आणि गर्दी ओसरून नेता पुढे सरकताच हे पुढे सरसावले. थेट नेत्याच्या पायावर सगळे हात एकसाथ टेकले गेले.
नेता अचंबित झाला होता..
मग परिचयसत्र सुरू झाले, आणि त्या तरुण कार्यकर्त्यांचे जुन्या पक्षातील कामगिरीचे गुणगान करण्याची स्पर्धा साथीदारांत सुरू झाली.
नेत्याच्या नजरेत भारावलेपण उतरल्याची खात्री झाल्यावर पुन्हा सगळ्यांनी खाली झुकून नमस्कार केला, आणि सारे बाजूला झाले.
बाहेर पडल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात खुशी चमकत होती..