बॉम्बे जिमखान्यासमोरील फॅशन स्ट्रीट येथे बुधवारी मध्यरात्री नाकाबंदी सुरू असताना एका इनोव्हा गाडीत २४ लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी तपासणीसाठी ही गाडी अडवली होती. गाडीच्या मागील भागात ठेवलेल्या एका बॅगेत हे पैसे लपवून ठेवल्याचे आढळले. गाडीचा चालक राजेंद्र भारद्वाज पैशांबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. आझाद मैदान पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून पुढील तपासासाठी भारद्वाज याला प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास विक्रोळीच्या आंबेडकर चौक येथील संदेश विद्यालयाजवळ पैसे वाटप सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच पार्कसाइट पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी गेले त्यांनी लक्ष्मी नवसुपे आणि मेघा म्हात्रे या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एकूण १ लाख ६६ हजार रुपये असलेली ८३ पाकिटे आढळून आली. विक्रोळी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संदेश म्हात्रे यांच्या पोलिंग एजंटांच्या जेवणाची आणि अन्य खर्चाची ही रक्कम असल्याचे या महिलांनी सांगितले.  या महिलांची अधिक चौकशी पार्कसाइट पोलीस करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चेंबूरच्या खडी मशीन परिसरातील मोनोरेल स्थानकाजवळील मंडपात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती आरसीएफ पोलिसांना मिळाली. पोलिसांना काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचे कार्यकर्ते निलोबा सरोदे पैसे वाटत असल्याचे आढळून आले. सरोदे यांच्याकडून ३१,५०० रुपये जप्त करण्यात आले. सरोदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.