अखेर सेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा निवडणुकीपुरता का होईना थांबला आहे. पंचरंगी निवडणुकीची एक निराळीच लढाई अनेक वर्षांनी महाराष्ट्र अनुभवणार आहे. निवडणुकीच्या गणित आणि संख्याशास्त्रात तरबेज असलेले निवडणूक विद्यावाचस्पती अजून फारसे अंदाज वर्तवताना दिसत नाहीत. किंबहुना, ‘या वेळेस काही सांगता येत नाही बुवा’ असा सावध पवित्रा चहाच्या अड्डय़ावर, कॉफीच्या कट्टय़ावर दिसतो आहे. सकाळी सहा वाजता घराबाहेर पडून अर्धा-पाऊण तास बाहेर फेरफटका मारणारे ज्येष्ठ नागरिकसुद्धा हॉटेलातल्या पहिल्या चहाच्या घोटाबरोबर सावधतेने बोलताना दिसतायत.
युतीच्या समर्थकांमध्ये घालमेल आहे. बाळासाहेबांशी भावनिक नाते आणि मोदींविषयी असलेला आदर यामध्ये आता काय निवडायचे असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. दोन्ही बाजूच्या पक्ष कार्यकर्त्यांचा युक्तिवाद त्यांना बरोबर वाटतोय. दोन्ही पक्षाच्या मतदारांना उमेदवार बघून मत ठरविण्याची सवय नाही. भावनांच्या कल्लोळात मतदार अडकला आहे हे निश्चित. ऐनवेळेस ठरवू जाऊ दे नाहीतरी निवडणुकीनंतर एकत्र पाहणारच आहोत, अशी स्वत:ची समजूत काढताना अनेक युतीचे कट्टर समर्थक दिसतात. तर काही समर्थकांनी युती तुटली त्यादिवशी आपले मत ठरवून टाकले आहे. त्याविषयी सोशल मीडियातून आपली बाजू जाहीर केली आहे. खूप त्वेषाने ओतप्रोत भरलेले ब्लॉग वाचायला मिळतायत. राजकीय क्षेत्राबद्दल अनेक लोकांना असलेली सजगता, बारकाईने केलेला अभ्यास, त्याची उत्तम मांडणी हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. काही मतं जरा जास्त तिखट, असभ्यसुद्धा वाटू शकतात. पण धूर्तपणे शांत बसणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत कोणतीच बाजू न घेणाऱ्यांपेक्षा हे कधीही उत्तम.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारात तेवढा संदेह दिसत नाहीये. अनेक लोकांशी बोलल्यावर लक्षात आले की, आघाडीचे ओझे समर्थकांना नको होते. आघाडी असूनसुद्धा वैयक्तिक पक्ष, उमेदवार पहिला मग आघाडी अशी मतदारांची मानसिकता होती. दोन्ही पक्षांची बेटकुळी दाखवण्यासाठी सज्जता होतील, लहान भाऊ मोठा भाऊ हा विषय पहिल्यापासून होताच. त्यामुळे कडवट लढाईची अपेक्षा या दोन पक्षांचे समर्थक मतदार करतायत. सेना-भाजपसुद्धा वेगळे लढत असल्याने कोण मोठा भाऊ होणार हे ठरणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या काळात ठिणग्या उडण्याची चिन्हे आहेत.
युती आणि आघाडी तुटल्याने मनसेला खिडकीतून आलेला कवडसा दिसला आहे. प्रत्येत मतदारसंघात हुकमाची मते असल्याने मुंबई, पुणे, नाशिकमध्ये युती, आघाडीचे मनसुबे धुळीला मिळणार असल्याचे दावे मनसे समर्थक करतायत. मत विभागणीमुळे कुठलाही उमेदवार पाच हजार मतांनी जरी निवडून आला तरी त्या उमेदवाराची लाट होती असे म्हणावे लागेल.
झेंडय़ाला मानणारा मतदार निष्ठेने मतदान करतो का, कुंपणावरच्या मतदाराला कुंपण तोडून आपल्याकडे कोण खेचून आणतो, कुठले नेते महाराष्ट्रासाठी उत्तम कार्यक्रम घेऊन येतात, कोणत्या पक्षाच्या सभा ऐनवेळेस रान पेटवू शकतात. अशा प्रकारचे काही वेगळे मुद्दे निकाल ठरवणार आहेत. वेगळे या दृष्टीने की पारंपरिक मतदारापलीकडे जाऊन तिर मित्र पक्षातले आणि विरोधी पक्षातले अधिकाधिक मतदार खेचून आणणारे हे मुद्दे असणार आहेत.
एकूण काय तर उमेदवारांइतकीच निवडणूक ज्योतिषांना अवघड आहे आणि आता वर्तविलेले भविष्य चुकले तर उमेदवाराचा ‘मंगळ’ आड आला, असं म्हणण्याची पण सोय राहिली नाही.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)