लोकसभेचे युद्ध संपल्यानंतर आता राज्याराज्यांत विधानसभेसाठी लढाया सुरू होणार आहेत. त्याची पहिली खडाखडी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांत लागणार आहे. भारतीय जनता पक्षप्रणीत महायुती आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी यांच्यात होणारा हा सामना ख-या अर्थाने मोदी सरकारची लिटमस टेस्ट ठरणार आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत भल्याभल्यांचा चोळामोळा करणारी ‘मोदी लाट’ अद्याप उधाणतीच आहे, की ओसरली, याचाही फैसला होणार आहे. गटातटात विभागलेला (म्हणजेच सामुहिक नेतृत्व) महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षासाठी तर हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. युतीच्या बुडाखालून खुर्चीची उब गेल्यालाही आता पंधरा वर्षे झाली आहेत. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी या पक्षाकडून जोर लावला जाणे, हे गैर नाही. मात्र, तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून पक्षोपक्षीच्या टाकाऊ गणंगांना पावन करून घेण्याचे जे सत्र भाजपने आरंभले आहे, ते खचितच चिंताजनक आहे.
कॉंग्रेस आघाडी हे महाराष्ट्रात बुडते जहाज ठरणार असल्याची कल्पना या दोन्ही पक्षांतील अनेक स्वनामधन्य नेत्यांना आणि क्षत्रपांना आली आहे. त्यामुळे सुरक्षित आसरा शोधण्यासाठी त्यांची पळापळ सुरू झाली आणि त्यामुळेच मग सध्याचे सुरक्षित घर म्हणून हे नेते आता भाजपच्या वळचणीला येत आहेत. बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, भास्करराव पाटील-खतगावकर, सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर अशा धेंडानी भाजपच्या तंबूत सध्या आसरा शोधला आहे. तर, पुण्यात ‘पुण्यश्लोक’ आमदार विनायकराव निम्हणही भाजपशी घरोबा करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशा ओवाळून टाकण्याची पात्रता असणा-या लोकांसाठी भाजपकडून का पायघड्या घातल्या जात आहेत, हेच खरे न सुटणारे कोडे आहे. बरे, या खोगीरभरतीपैकी एक जरी स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याची आणि आपल्याबरोबर आपल्या मतदारसंघाच्या आजुबाजूच्या तीन-चार जागा निवडून आणण्याची क्षमता असणारा असता, तरी एकवेळ राजकारण म्हणून ते समजून घेता येईल. मात्र, या सगळ्यांचीच राजकीय ताकद अगदी तोळामासाही नाही. बबनराव पाचपुते यांना त्यांच्या नगर जिल्ह्यात आणि श्रीगोंदा तालुक्यातही फारसे कोणी ओळखत नाही. ते स्वतःला ‘हभप’ म्हणवून घेत असले, तरी वारकरी संप्रदायात त्यांना कोणी विचारत नाही. राष्ट्रवादीची ताकद नसेल, तर नगरमधील मातबर कॉंग्रेस नेत्यांकडून त्यांचे शिरकाणच व्हायचे. मात्र, तरीही आपल्या दंडातील बेटकुळ्या दाखवित पाचपुते भाजपच्या कंपुत शिरले आहेत. याच पाचपुतेंविरोधात कधीकाळी आपणच आरोपांचा धडाका लावला होता, याचाही विसर भाजपच्या देवेंद्राला पडला आहे. श्रीगोंद्यातून पाचपुतेंची उमेदवारीही नक्की असल्याची चर्चा आहे. इतर आयारामांचीही हीच स्थिती आहे.
विदर्भात गावित आणि मेघे, मराठवाड्यात खतगावकर, किन्हाळकर आणि सूर्यकांता पाटील, पश्चिम महाराष्ट्रात पाचपुते, घोरपडे अशा आयारामांसाठी पायघड्या घालत असताना गडकरी, फडणवीस आणि तावडे प्रभृतींनी आपल्या पक्षातीलच कार्यकर्त्यांच्या भावना तरी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. शतप्रतिशत भाजप करायचे पक्षाचे आणि नेतृत्वाचे लक्ष्य योग्यच आहे. स्वतःचा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाने करायलाच हवा. कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाची वाटचाल होत असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छा-आकांक्षांचा योग्य सन्मान पक्षनेतृत्वाने ठेवलाच पाहीजे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत सतरंज्या घालणा-या कार्यकर्त्यांच्या जिवावरच पक्ष वाढला. ज्यांनी या सतरंज्या घातल्या, त्यांना आता त्यावर बसण्याची संधीही मिळायला हवी. नाहीतर सतरंज्या घालायला आम्ही आणि त्यावर बसायला इतर पक्षांतून आलेली ही संधीसाधू पिलावळ, अशी त्यांची भावना झाली, तर पक्ष नेतृत्वाच्या योजनेला तो मोठा धक्का ठरेल. सत्ता हे राजकीय पक्षाचे साध्य असते. ते साधण्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. मात्र, ते करताना इतर पक्षांनी झिडकारलेल्या, नाकारलेल्या आणि पक्षालाच ‘लायबिलिटी’ ठरेल, अशांना सामावून घेण्यात काही अर्थ नाही, याची जाणीव भाजपच्या धुरीणांनी ठेवायला हवी.
– विनय चाटी
vinay.chati@gmail.com

(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)