ताणून धरलं, तरी आज ना उद्या जागावाटपाची बोलणी करावी लागणार, थेट चर्चेची वेळ आली तर प्रत्येक मतदारसंघाचं उभं-आडवं चित्र मांडावं लागणार हे विनोदजींना माहीत होतं. त्यांनी घरी बैठकीची आखणी केली आणि कोकणातल्या कार्यकर्त्यांना सांगावा गेला. प्रत्येक मतदारसंघाचा अहवालच तयार करून आणा, असा निरोप गेला.
दुसऱ्याच दिवशी वीस-पंचवीस इच्छुक, शाखाप्रमुख, संघटक आणि काही निवडक पदाधिकारी गाडय़ा करून मुंबईत दाखल झाले.   
चहापाणी झाल्यावर बैठक सुरू झाली.
‘काढा.. काय काय आणलंय तुम्ही?’ विनोदजींनी फर्मान सोडलं.
‘आधी थोडं बोलायचं होतं’.. एकजण चाचरत म्हणाला. विनोदजींनी हनुवटीवर ठेवलेला तळवा बाजूला केला, आणि त्याच हाताने ‘बोला’ अशी खूण केली.
‘आम्ही कोकणात राहातो. लाटा कशा येतात, कशा जातात, कुठल्या लाटेला कसं तोंड द्यायचं, आम्हाला बरोब्बर कळतं’.. कोकणातला तो कार्यकर्ता बोलू लागला. आपल्यालाही हेच सांगायचं होतं, असा भाव साऱ्यांच्या डोळ्यात उमटला होता.
‘लाट किनाऱ्यावर फुटते, आणि संपते. पण लाटेसमोर छाती दाखवायची नसते. लाटेला उजव्या-डाव्या अंगाला घेऊन कमरेनं ती कापावी लागते. पण लाट ती लाटच असते, तिच्याशी किती मस्ती करायची हे समजायला हवं. किनाऱ्यावर फुटलेली लाटसुद्धा, मागं जाताना मागे ओढते, आणि एकदा का पायाखालची वाळू सरकली, की काही सांगता येत नाही’..
कार्यकर्ता संथपणे बोलत होता. विनोदजींनी पुन्हा तळवा हुनवटीखाली ठेवला, खुर्चीत बसल्या जागी ते पुढे झुकले, आणि त्यांचे डोळे चमकू लागले.
‘हे भाषणात वापरायला चांगलंय’.. त्यांच्या मनात विचार चमकून गेला. ‘आणखी एकदोन दिवसांतच कुठे भाषणाचा कार्यक्रम आहे का, तपासायला हवं’.. ते मनाशीच म्हणाले. कार्यकर्ता बोलतच होता.
विनोदजींनी त्याला खुणेनंच थांबवलं.  
‘पण अहवालाचं काय?’ विनोदजींनी विचारलं, आणि मतदारयाद्यांचा गठ्ठा त्यानं समोर उघडला.
यादीच्या पानापानावर मतदाराच्या नावासमोर लाल, निळ्या शाईच्या खुणा होता. पानाच्या तळाशी त्याच रंगातले आकडे होते.
‘हे बघा.. या वॉर्डात आपली इतकी मतं आहेत’.. लाल शाईनं लिहिलेल्या आकडय़ावर बोट ठेवत कार्यकर्ता एकएक पान उलटत होता. शेवटच्या पानावर तक्ता होता. एकूण मतदार, लाल शाईतील मतदार, निळ्या शाईचे मतदार असे आकडे त्यात भरले होते.
कार्यकर्त्यांनं यादी बाजूला ठेवली, आणि खिशातला कागद काढला.
मतदारसंघात कोणत्या गल्लीत आपली मतं किती, याचा सारा तपशील कागदावर होता.
‘आता सांगा, आपला उमेदवार इथे येणार की नाही?’.. कार्यकर्त्यांने लाल शाईच्या आकडय़ावर बोट आपटत विचारलं.
‘अरे पण अहवाल कुठंय?’.. विनोदजी म्हणाले.
‘हाच अहवाल. हा कागद दाखवा, आणि मतदारसंघ मागून घ्या.. आपला मतदारसंघ आहे हा’.. कार्यकर्ता म्हणाला.
विनोदजींनी शांतपणे कागद घडी करून खिशात ठेवला. त्यांचे डोळे चमकत होते.