अच्छे दिन येणार आहेत, असे सांगण्यात आले व त्या भरवशावर तुम्ही मतदान केले. मग आता अच्छे दिन आले आहेत काय, असा प्रश्न शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला व अजून अच्छे दिन आले नाहीत, असे ठासून सांगितले. विदर्भ भगवा करण्यासाठी मी विदर्भात फिरत आहे, असे सांगून ते म्हणाले, आम्ही केंद्रात मोदींची सत्ता यावी म्हणून मते मागितली व ती तुम्ही दिली, पण आता मोदी शिवसेनेसाठी मते मागत नाहीत, हे दुर्दैवच आहे.
महाराष्ट्रात भाजपाला चेहरा नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, हे भाजपाने सांगावे, असा प्रश्न करून ते म्हणाले, दिल्लीत सत्तासीन होण्यासाठी आमचा वापर केला व आता महाराष्ट्रात स्वत:च्या बळावर सत्ता प्राप्त करण्यासाठी आमची साथ सोडून दिली. मोदी हे भाजपाचे नव्हे, तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी योजना करावी.
राज्यात काँग्रेसविरोधात लाट आली आहे. मोदींनी नुसती भाजपासाठी मते मागू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. गेल्या १५ वर्षांत काँग्रेसने केवळ तमाशा केला. विदर्भात उद्योगधंदे आणण्याचे आश्वासन दिले, पण एकही उद्योग विदर्भात आणला नाही. राज्यातील तुमची इतक्या वर्षांत काँग्रेसने केलेली फसवणूक पाहून आता शिवसेनेला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आम्ही सत्तेवर आल्यानंतर आठवीच्या मुलांना टॅब मोफत देणार आहोत. विदर्भाशी माझे रक्ताचे नाते आहे, असे सांगून ते म्हणाले, हा विदर्भ ंमाझा आहे. महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना काय कळणार विदर्भ, असे सांगून त्यांनी भाजप अध्यक्ष अमीत शहा यांना अप्रत्यक्ष टोला हाणला. भाजपाला हिंदूत्व नको आहे. संकटात मदत करणारा मित्र नको आहे. २५ वर्षांंपासून युती असतांना आता मित्राच्या पाठीत वार केला. तुम्ही मित्राचा विश्वासघात केला. आता तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार, असा प्रश्न त्यांनी भाजपाला केला आहे. युती तुटली, याचे आपणास दु:ख आहे, असेही ते म्हणाले.
हा महाराष्ट्र आहे धृतराष्ट्र नाही, असे बजावून ते म्हणाले आमची सत्ता आल्यावर शेतकऱ्यांच्या पिकाला नुसता बाजारभावच देणार नाही, तर त्यांना बाजारपेठही मिळवून देऊ. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती हवी. शेतकरी हे चोर, दरोडेखोर नाहीत. माफी ही चोर, दरोडेखोरांना दिली जाते. मतदारांनी आता आधीच्याच लोकांच्या हातात सत्ता दिली तर ती तुमची चूक ठरेल व तुमच्या मुलांचे आयुष्य सडून जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. व्यासपीठावर यावेळी शिवसेनेचे पाचही मतदारसंघातील उमेदवारांसह संपर्क नेते दिवाकरराव रावते, जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर, दाळू गुरुजी, रामा कराळे, अॅड. अनिल काळे आदी नेते उपस्थित होते.
सभा तब्बल ३ तासांनी सुरू
उद्धव ठाकरे यांची सकाळी ११.३० वाजताची सभा दुपारी अडीच वाजता सुरू झाली. तीव्र उन्हामुळे अनेक शिवसैनिक झाडांच्या सावलीत बसल्याने सुरुवातील सभेला काहीच गर्दी नाही, असे चित्र होते. उद्धव ठाकरे अकोल्यात आल्यानंतर व्यासपीठावरील नेत्यांनी शिवसैनिकांना चेतविले व उन्हाला घाबरू नका, अशी साद घातली तेव्हा कोठे शिवसैनिक प्रांगणात जमले. आज काँग्रेसचे नेते व मनपाचे माजी महापौर सुरेश पाटील, भारिप-बमसं व काँग्रेसमध्ये गेलेले दशरथ भांडे यांनी व इतर अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.  
२० टक्के पोलीस ‘बदमाश’
पोलीस दलात २० टक्के पोलीस हे निगराणी बदमाश आहेत. ते सकाळी पोलीस पोषाखात असतात व रात्री दरोडे घालतात, असा घणाघाती आरोप अकोला पश्चिमचे शिवसेना उमेदवार व माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपल्या भाषणात केला.