सोमवारपासून सुरू होणाऱ्या विशेष विधानसभा अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये सुरू असलेल्या भेटीगाठींबाबत भाजपमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतहून राज्यात फडणवीस सरकारला पाठिंबा देऊ केल्यानंतर भाजपच्या नावाने बोटे मोडणारी शिवसेना आता कोणत्या नैतिकतेने पवारांचे उंबरठे झिजविते, असा सवाल भाजप वर्तुळातून केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप हा बहुमताच्या सर्वात जवळचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही लगेचच थेट मुख्यमंत्रीपदाची मागणी करणाऱ्या शिवसेनेने निकालानंतरही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादीने भाजपला स्वतहून विनाअट पाठिंबा जाहीर केल्यानंतर, भाजपला राष्ट्रवादीसोबत जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे, असे सांगत सत्तेतील सहभागाकरिता मंत्रिपदांसाठी अटी घालणारी शिवसेना आता विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीशी साटेलोटे का करते, असा सवाल भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने केला. निवडणुकीआधी आणि निकालानंतरही भाजपने शिवसेनेवर कोणतीही टीका केली नाही. शिवसेनेकडून मात्र सातत्याने टीका होत असल्याची खंतही या नेत्याने व्यक्त केली. सत्तेत सहभागी व्हावयाचे किंवा नाही याचा निर्णय सर्वस्वी शिवसेनेने घ्यावयाचा असताना भाजपवर अटी लादून वेळकाढूपणा करण्यात राज्याचे कोणते हित शिवसेना पाहात आहे, अशी बोचरी टीका या पदाधिकाऱ्याने केली.
शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट मान्य असेल तर भाजपला पाठिंबा देऊ, अशी पहिली अट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर लगेचच घातली. सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही असे सांगत सेनेकडून भाजपवरच दबावतंत्र सुरू राहिले. संपूर्ण महाराष्ट्राचे हित हीच अपेक्षा आहे असे सांगणाऱ्या शिवसेनेने आता मंत्रिपदांच्या मागणीसाठी हट्ट का धरला, शिवसेनेला राज्याचे हित व स्थैर्य महत्त्वाचे आहे, की स्वपक्षाच्या मंत्रिपदात अधिक रस आहे हेच यातून स्पष्ट होते, असेही भाजपचा हा पदाधिकारी म्हणाला.
शरद पवार यांच्याकडे भाजपने पाठिंबा मागितलेला नाही. त्यासाठी भाजपचा कोणीही नेता त्यांच्याकडे गेला नव्हता. असे असतानाही, तेव्हा भाजपवर टीका करणारे शिवसेनेचे नेते आता पवार यांच्याकडे कशासाठी खेपा घालत आहेत, असा खोचक सवालही या नेत्याने केला.
दरम्यान, सेना नेत्यांनी भेटी घेतल्याच्या वृत्तास शरद पवार यांनीच थेट दुजोरा दिल्याने शिवसेनेची पंचाईत झाली असून आता त्यावर सारवासारवही सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवारास आव्हान देणारी जुळवाजुळव करण्याकरिताच या भेटीगाठी सुरू झाल्याच्या वृत्तामुळे ही अस्वस्थता अधिकच वाढली. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीकडील अतिरिक्त मतांचा कोटा शिवसेनेस मिळावा या प्रयत्नांकरिता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची सारवासारव सेनेच्या सूत्रांनी केली.