स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केलेल्या शिवसेनेने विदर्भातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील लढण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. भाजपच्या तुलनेत कमी ताकद असल्यामुळेच सेनेने हे पाऊल उचलले असून विदर्भातील अनेक इच्छुक सध्या मातोश्रीवर जात आहेत. सेनेच्या तुलनेत विदर्भात भाजपची संघटनात्मक शक्ती जास्त आहे. स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आलीच तर विदर्भात मागे राहू याची जाणीव झाल्यामुळेच आता शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांना निमंत्रण देणे सुरू केले आहे. गेल्या निवडणुकीत सेनेच्या वाटय़ाला २८ जागा आल्या होत्या. त्यापैकी केवळ आठ जागी सेनेला विजय मिळाला. स्वतंत्रपणे लढायचे झाले तर विदर्भातील ६२ जागा सेनेला लढवाव्या लागणार मात्र येथे सेनेजवळ प्रभावी उमेदवार नाहीत. म्हणून आता काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांना बोलावणे सुरू झाले आहे.