शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ शनिवारी महालक्ष्मी रेसकोर्सवर फोडण्यात येणार असून शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी शिवसेनेने केली आहे. भाजपने युती तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मौन पाळले असून ते कोणती प्रतिक्रिया व्यक्त करणार आणि भूमिका जाहीर करणार, याविषयी सर्वानाच उत्सुकता आहे.
शिवसेनेवर टीका करायची नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. शिवसेना नेते भाजपवर संतप्त झाले असून तो कधीही व्यक्त होईल, अशी परिस्थिती आहे. शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी वर्दळ वाढली असून भाजपविरोधात प्रतिक्रया व्यक्त होत आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाकरे हे भाजपवर टीकास्त्र सोडणार का, मोदी यांच्या लाटेवरून ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असताना ते भाजपबाबत कोणती खेळी करणार, याविषयी चर्चा सुरू आहे.
अमित शहा आज मुंबईत
नवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी मुंबईत दाखल होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हटविण्याबरोबरच शिवसेनेविरोधातही कोणती राजकीय खेळी करायची, याबाबत शहा प्रदेश नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शहा यांनी भाजप नेत्यांची बैठक बोलाविली असून निवडणूक विषयक तयारीचा ते आढावा घेणार आहेत. मराठी विरूध्द गुजराती असा संघर्ष सुरु झाल्यास त्याला कसे तोंड द्यायचे,शिवसेनेने टीका केल्यावर भाजप नेत्यांनी काय भूमिका घ्यायची, याचाही विचार केला जाईल.