शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी पेटून उठण्याचे भावनिक आव्हान करीत पक्षप्रमुख उद्धव आणि आदित्य ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रचंड जनसमुदायापुढे नतमस्तक झाले. तुम्ही मला लढायला बळ दिले, तुमच्या प्रेमातून मी उतराई होऊ शकत नाही, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्यावर कार्यर्तेही क्षणभर हेलावले. भाजपने युती तोडल्यावर निर्माण झालेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांचे अखेरचे अस्त्र उपसले.
शिवसेना प्रमुखांनी मला आणि आदित्यला तुमच्या हवाली करून सांभाळ करण्याचे आवाहन दिल्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अटितटीच्या लढाईसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. अफजलखानाच्या फौजा महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरत आहेत. त्यांच्याकडे पैशांची ताकद आहे. पण प्रत्यक्ष औरंगजेबानेही जंगजंग पछाडून त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. तर त्याला येथेच मूठमाती मिळाली. तोच पराक्रम पुन्हा करून दाखविण्यासाठी ‘वेडात मराठे वीर दौडले साथ..’ हे चित्र निर्माण करावे असे आवाहन ठाकरे यांनी केले. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुलात शिवसेनेची सभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव दोन वर्षांनी होत असून तो शिवसेनाचा मुख्यमंत्रीच साजरा केरल असा विश्वास व्यक्त करून तोपर्यंत जनहिताच्या ५० योजना पूर्ण करण्यचा संकल्प ठाकरे यांनी जाहीर केला. ठाकरे यांच्या भाषणाचा मुख्य रोख भाजपवरच होता व त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडले. भाजपच्या अटी जर मी मान्य केल्या असत्या तर शिवसेना संपलीच असती, असे सांगून ठाकरे म्हणाले शिवसेना प्रमुख आज असते तर युती तोडण्याची त्यांची हिंमतच झाली नसती. भाजपने सत्तेवर आल्यावर केलेल्या रेल्वे दरवाढी विरोधात शिवसेनेनेच आवाज उठविला होता याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. तसेच अच्छे दिन आल्यावर त्यांनी जुन्या मित्राची साथ सोडल्याची टीका त्यांनी केली.