तुरळक घटना वगळता मुंबई शहरात मतदान प्रकिया शांततेत पार पडली. घाटकोपरच्या पंतनगर येथे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली तर भायखळ्यात अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. वांद्र्यातही तीनशे निवडणुक ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत.
पंतनगर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना आणि भाजप पक्षाच्या उमेदवारांनी दोन पेक्षा जास्त पोलींग स्टेशन लावल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी पाहणी करुन तक्रार दिल्यांनतर या पक्षांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भायखळ्यात मनसे उमेदवारांनी पक्षाच्या टोप्या घातल्या होत्या. त्याला अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी यांनी आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. त्यानंतर गवळी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. वांद्रे येथे बोगस मतदान होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी मतदान केंद्रावरी एका बुथवरून २९९ ओळखपत्र जप्त केली असून पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत.