वर्धा
युती व आघाडीतील बेबनावाचा विद्यमान आमदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेल्या दत्ता मेघेंनी जिल्ह्य़ात काँग्रेसचे पानिपत करण्याचा विडा जाहीरपणे उचलला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला हिसका देऊन त्याचा पहिला प्रत्यय दिला, पण आता सर्वच समीकरणे बिघडल्याने पहिल्या क्रमांकाचा शत्रू ठरविताना सर्वच पक्षांची गोची झाली आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन काँग्रेस, दोन अपक्ष व प्रत्येकी एक भाजप व सेनेचा आमदार, अशी संमिश्र स्थिती आहे.
वर्धा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालेले विद्यमान आमदार प्रा. सुरेश देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे शेखर शेंडे व सेनेचे रविकांत बालपांडे हे रिंगणात आले. काँग्रेसचा गड राहिलेल्या या मतदारसंघात सेलूचा ग्रामीण भाग निर्णायक भूमिका बजावतो. जिल्ह्य़ाच्या राजकारणात मैत्री निभावणारे आमदार देशमुख व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रणजित कांबळे यांच्या मैत्रीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही निवडणूक आहे.
आर्वी
भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे लोकसभा निवडणुकीत खासदार रामदास तडस यांना उर्वरित मतदारसंघाच्या तुलनेने सर्वात कमी मताधिक्य देऊ शकल्याने त्यांच्या ताकदीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. माजी आमदार अमर काळे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने केचे-काळे, असा दुहेरी सामना रंगणार आहे. सेना व राष्ट्रवादीला येथे चेहराच नाही. पूरग्रस्तांचे प्रश्न निवडणुकीचा कळीचा मुद्दा ठरू शकतो.
देवळी
गेली ४८ वर्षे काँग्रेसच्या राव-कांबळे गटाची मक्तेदारी राहिलेल्या या मतदारसंघात रणजित कांबळे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. विविध विकासकामांवर कोटय़वधी रुपयांचा रतीब ओतणाऱ्या कांबळेंना या वेळची निवडणूक कठीण जाणार असल्याची चर्चा पूर्वी होती, पण आता चित्रच पालटले. चौरंगी लढतीत कांबळेंना आव्हान कोण देणार, हा कळीचा मुद्दा आहे. दलित-कुणबी-आदिवासी-तेली, अशा ध्रुवीकरणाने येथील निवडूणक रंगते.
धामणगाव
विद्यमान आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांना काँग्रेसने परत तिकीट दिले असून ते हॅट्ट्रिक करणार काय, या प्रश्नाभोवतीच खेळ रंगू लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुण अडसड यांनी पुत्रासाठी तिकीट मागितल्यानंतर आता स्वत: उमेदवारी दाखल केली आहे. गेल्या सहा निवडणुकीत चार वेगवेगळ्या पक्षांचे आमदार निवडून देणाऱ्या या मतदारसंघात पेयजल, रस्ते व आरोग्यसेवा या बाबी ऐरणीवर येतात.
मोर्शी
विविध पक्षांचा आडोसा घेतल्यानंतर शेवटी अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार डॉ. अनिल बोंडे यांना ही संत्रनगरी या वेळी कामाचा जाब विचारत आहे. डॉ. बोंडे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता, पण जागा सेनेकडे होती. आता चित्रात कमालीचा बदल झाल्याने बोंडेंना टक्कर देणारे राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख व काँग्रेसचे नरेश ठाकरे यांची कसोटी लागणार आहे. या परिसरातील लोकांची संत्रावरील प्रक्रिया उद्योगाची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही. त्याच प्रश्नावर रान उठण्याची चिन्हे आहेत.
हिंगणघाट
सेनेचे विद्यमान आमदार अशोक शिंदे हे अखेरची संधी द्या म्हणून मतदारांना साकडे घालत आहेत. गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस हद्दपार झाली आहे, तर मनसेने जिल्ह्य़ात येथेच बाळसे धरले आहे. राष्ट्रवादीत दुही असून भाजप गेल्या वेळच्या सक्षम अपक्षाच्या हातात कमळ देण्याच्या तयारीत आहे.