मतदान झाले आणि लागलीच चर्चा सुरू झाली ती राज्यात सत्तेवर कोण येणार याची? विविध मतदानोत्तर पाहण्यांचे अहवाल भाजपला कौल देत असले, तरी ‘चाणक्य’ वगळता कोणीही भाजपला पूर्ण बहुमत दिलेले नाही. १४५चा जादुई आकडा न गाठता आल्यास भाजपपुढे सत्तास्थापनेचे कोणते पर्याय असू शकतात, अन्य कोणती समीकरणे आकाराला येऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्या विविध शक्यतांवर एक दृष्टीक्षेप..
पुन्हा सेना-भाजप युती?
युती तुटल्यानंतर भाजपला क्रमांक एकचा शत्रू मानणारी शिवसेना निवडणुकीनंतर त्या पक्षाशी हातमिळवणी करण्याची शक्यता कमी आहे. शिवसेनेने भाजपवर, त्यातही नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली जहरी टीका विसरून सेनेचा पाठिंबा घेण्याचा विचार राज्यातील भाजपनेते करतील ही शक्यता दुरापास्तच.
..की सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी?
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देतील का, या शक्यतेचीही चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादीला फारशी अडचण येणार नाही, कारण शरद पवार यांचा अंतिम शब्द हाच निर्णय असणार आहे. मात्र शिवसेनेच्या कडव्या हिंदूुत्वाशी सत्तेसाठी हातमिळवणी करण्यामुळे संभाव्य तोटय़ांचा काँग्रेसला विचार करावा लागेल. दिल्लीचे पक्षश्रेष्ठी त्याला मान्यता देतील का, हाही प्रश्न असेल. मात्र आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तोच दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याचा विचार काँग्रेस करू शकेल.
राष्ट्रपती राजवट?
राज्यात पूर्ण बहुमताचा आकडा कोणताच पक्ष गाठू शकला नाही, तर राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढविला जाईल. असे झाल्यास सत्तेची गणिते जमविण्यासाठी सर्वात मोठय़ा ठरणाऱ्या पक्षाला पुरेसा कालावधी मिळेल, असा होरा आहे. अर्थात, मतदानानंतर लगेचच सुरू झालेल्या चाचण्यांच्या अहवालानुसार परिस्थिती असेल, तरच या सर्व शक्यता संभवतात, अन्यथा बहुमताच्या जादूई आकडय़ाच्या जवळ जाणाऱ्या पक्षाला अन्य लहानमोठे पक्ष सहजपणे गळाला लावता येतात, हा इतिहासच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Bjp government or new yuti era in maharashtra
First published on: 16-10-2014 at 03:53 IST