शिवसेनेसोबतची युती कायम रहावी अशी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची शेवटपर्यंत इच्छा होती आणि त्यादृष्टीने प्रयत्नही केले गेले मात्र, शिवसेनेची जागावाटपाबाबत जशी ठाम भूमिका होती. त्यांना १५१ जागांपेक्षा कमी जागा लढविणे शक्य नव्हते तसे आम्हालाही १३० पेक्षा खाली येणे शक्य नव्हते म्हणून वेगळे लढण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शुक्रवारी भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्याच्या जनतेला तब्बल दोन दशकांनंतर एकपक्षीय सरकार आणण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत जनता भाजपच्याच बाजूने कौल देईल असा विश्वासही रुडी यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीसोबत छुप्या युतीच्या आरोपांचेही रूडी यांनी यावेळी खंडन केले. ते म्हणाले की, अशाप्रकारचे अविवेकी तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवसेनेशी युती नसली तरी उद्देश मात्र एकच आहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी भ्रष्टसरकारला निस्तनाभुत करण्याचे भाजपचे उद्दीष्ट आहे आणि जनता आम्हाला बहुमताने निवडून देईल, असेही ते पुढे म्हणाले.