गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पार वाताहत होईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला असला तरी दोन्ही काँग्रेसचे नेते निदान प्रत्येकी ५० जागांपर्यंत तरी उडी मारू अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
सत्तेत येणार नाही हे दोन्ही काँग्रेसचे नेते खासगीत मान्य करतात. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये दोन्ही काँग्रेसला ४० पेक्षा कमी जागा दाखविण्यात आल्या असल्या तरी तेवढी वाईट परिस्थिती नाही, असा दावा दोन्ही काँग्रेसचे नेते करीत आहेत.
विदर्भात गतवेळच्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता असली तरी फार वाईट परिस्थिती नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विदर्भात गेल्या वेळी काँग्रेसचे २४ आमदार निवडून आले होते. मुंबईतही जागा घटणार असल्या तरी दुहेरी आकडा गाठू, असेही सांगण्यात येते.
राष्ट्रवादीची परिस्थिती वाईट आहे, असे चित्र रंगविण्यात येत असले तरी नक्कीच ५० पर्यंत जागा निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी, पक्षाला चांगले यश मिळेल, असा दावा केला. मात्र, काँग्रेस सत्ता स्थापनेत तडजोडी करणार नाही तसेच जातीय पक्षांना मदत करणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.