निवडणुका जाहीर झाल्याने नेत्यांच्या घरात खलबतखाने सुरू झालेत, आणि खबरे अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अशा ‘आतल्या गोटा’तल्या, खबरी सूत्रांकडून मिळणाऱ्या ‘अनधिकृत’ बातम्यांचा हा ‘रतीब’..
आबांच्या सरकारी बंगल्यावर अँटी-चेंबरमध्ये मतदारसंघातले वजनदार कार्यकर्ते बसले होते. सगळे अस्वस्थ होते. कुणीच काही बोलत नव्हतं. समोर टीपॉयवर चहा थंड होऊन राहिला होता. बाजूच्या प्लेटमधली क्रीमवाली महागडी बिस्किटं खुणावत होती. आबांनी चहाचा कप उचलला, एक बिस्कीटही हातात घेतलं. लगोलग सगळ्यांनी कप उचलले, बिस्किटं हातात घेतली.. अँटी-चेंबरमध्ये चहाच्या फुरक्यांचा आवाज घुमला.
आबांनी समोर बसलेल्या विश्वासू कार्यकर्त्यांकडे बघितलं.
‘ह्य़ो संजयकाका लई वात आननार आबा परत..’ कार्यकर्ता बोलला आणि आबांच्या तोंडात बिस्कीट अडखळलं.. त्यांनी कप तसाच टीपॉयवर ठेवला. बाजूचा सफेद नॅपकिन उचलून तोंडावरून फिरवला आणि चपराशाला खूण केली. बिस्किटाची प्लेट उचलून तो बाहेर निघून गेला..
आबा अस्वस्थ होते. तेवढय़ात अँटी-चेंबरचा दरवाजा किलकिला झाला. बाहेरून पीए डोकावत होता. आबांनी खुणेनंच त्याला आत बोलावलं आणि कार्यकर्त्यांना खूण केली. सगळे उठले आणि बाहेर पडले.
‘साहेब, ते आरटीपीवाले आलेत भेटायला’.. पीए म्हणाला आणि आबांच्या कपाळावरच्या आठय़ा आणखीनच गडद झाल्या.
‘माझ्याकडं काय काम काडलं, त्येंनी?’.. आबांनी त्रासिक आवाजात विचारलं.
‘कायतरी झैर्नाम्याचं बोलत्यात..’ पीएनं दबक्या आवाजात उत्तर दिलं आणि आबांनी खुणेनंच त्यांना आत पाठवायला सांगितलं.
पीए बाहेर गेला आणि लगोलग चार-पाच जणांचं एक शिष्टमंडळ अँटी-चेंबरमध्ये घुसलं. सगळे दाटीवाटीनं सोफा, खुच्र्यावर बसले.
‘बोला.. काय काम काडलं..?’ आपलं ठेवणीतलं ओशाळवाणं स्मित चेहऱ्यावर आणत आबांनी विचारलं.
‘साहेब, तुमच्या मतदारसंघात सगळ्यांना राइट टू पी असायला हवा..’ एकानं आवेशात मुद्दय़ालाच हात घातला.
आबांनी बेल वाजवली. पॅड घेऊन पीए आत आला.
‘म्हंजे, तुमच्या मतदारसंघातल्या तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही तसं आश्वासन द्यायला हवं..’ दुसरा एक जण तावातावानं म्हणाला.
‘आसं म्हंताय..? पन आमच्या मद्दारसंगात तर सगळ्यांस्नीच त्यो हाक्क हायेच की. कुटंपन बसा. हां.. फकस्त, आडुसा बगायला हवा..’ आबांच्या अगोदर पीए पटकन बोलून गेला आणि त्यानं आबांकडं बघितलं.
आबांनी तोंडात गोळी भरली. पीएकडं पाहून समाधानानं मान हलवली.
‘आमचे सायेब, या हक्काबद्दल पयल्यापास्नं जाग्रूक हायेत. आमच्या गावात कदीच कुनालाच त्यो हाक्क नाकारल्याला न्हाई.. तरी पन तुमचं म्हननं नोंदवून ठिवलंय..’ पीए म्हणाला.
शिष्टमंडळानं सोबतचं निवेदन आबांच्या हाती दिलं आणि ते उठले. आबांनी नमस्कार केला.
सगळे बाहेर पडल्यावर आबांनी बेसिनवर जाऊन हळूच एक पिंक टाकली आणि घाईघाईनं पीएला बोलावलं.
‘आरं, आरं, त्येस्नी सांग, की दादांकडं जावा म्हनून.. त्येंच्या मतदारसंघाच्या झैर्नाम्यात समद्यास्नी आरटीपी हवा अशी मागनी करा म्हनावं. कालवं कोरडंठाक पडल्यात तिकडं, पन कुनालाच हाक्क न्हाई..’ आबा घाईघाईनं बोलले, आणि पीए बाहेर पळाला.
अँटी-चेंबरचं दार किलकिलं करून आबांनी हळूच बाहेर बघितलं.
पीएला नमस्कार करून परतणाऱ्या शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला होता.