पंतप्रधान नरेंद्र मोदी इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत असा अप्रत्यक्ष टोला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.
पंतप्रधान कार्यालय बंद ठेवून आणि सीमेवर गोळीबार होत असताना नरेंद्र मोदी प्रचारात मग्न असल्याची टीका राज ठाकरे यांनी सोमवारी केली होती. तर, उध्दव यांनीही आपल्या प्रचार सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले होते. प्रत्युत्तरात प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात भाजपचेच सरकार येणार असल्याचे दिसू लागल्यामुळे या पक्षांचे ताळतंत्र सुटले असल्याची टीका केली.
मनसे आणि शिवसेना नेतृत्त्वांच्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी सरकार विरोधात एकही शब्द ऐकायला मिळत नाही आणि दोघांचीही भाषणे शरद पवारांच्या भाषणाची दुरी ओढणारी असल्याचेही जावडेकर म्हणाले. राज आणि उध्दव यांच्या भाषणात विकासाच्या कोणत्याच मुद्द्यांवरून चर्चा सध्या होताना दिसत नाही हे दुर्देव असून त्यांनी कितीही भाजप विरोधात प्रचार केला तरी, आम्ही मात्र सकारात्मक घोषणा करून महाराष्ट्रात बहुमताने सरकार स्थापन करू असा विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.