राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पावणेपाच वर्षे सरकारमध्ये असले की, धर्मनिरपेक्ष आणि निवडणुकीच्या काळात तीन महिने जातीयवादाची भाषा बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याचे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.  
गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ भ्रष्टाचार करून राज्याला नाही, तर देशाला लुटल्याने त्यांच्यापासून जनतेला मुक्ती हवी आहे. त्यामुळे राज्यातील जनता भाजपच्या पाठीशी आहे. शरद पवार निवडणूक आली की, भाजप हा जातीयवादी पक्ष म्हणून आरोप करीत असतात. जातीयवादाचे खरे विष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेच्या मनात पेरले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता जात, धर्म असा कुठलाही भेद न पाळता मतदान करणार आहेत. जातीयवादी पक्ष म्हणून भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे. त्यांच्याजवळ आता भाजपला लक्ष्य करण्यासाठी कुठलाच विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाचे कर्णधार आहेत. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांच्या राज्यात जास्तीत जास्त सभा घेतल्या तर वाईट काय?
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर बोलताना जावडेकर म्हणाले, भाजपच्या अजेंडय़ामध्ये स्वतंत्र विदर्भाचा विषय असून तो विषय मार्गी लावण्यात येईल. काँग्रेस-राष्ट्रवादीची त्याबाबत तळ्यात मळ्यात भूमिका आहे. भाजपने जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण केली आहेत. त्यामुळे विदर्भाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित करण्यात आला तर त्यात गैर काय? अन्य वाहिन्यांवरही तो दाखविण्यात आला. गेल्या १० वर्षांत का दाखविण्यात आला नाही, याचे आश्चर्य आहे. ज्या कार्यक्रमावर बंदी आणण्यात आली होती तो कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे.