गेली पंचवीस वर्षे केवळ पराभवाचेच धनी झालेल्या बहुजन समाज पक्षाने या वेळी आपली निवडणूक रणनीती बदलली आहे. बसपने पहिल्यांदाच त्यांच्या अजेंडय़ावर प्राध्यान्याने स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा आणला आहे. याच मुद्यावर विदर्भ ढवळून काढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.
१९८५चा अपवाद वगळता महाराष्ट्रात बसपने आतापर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविल्या आहेत. १९८५मध्ये बसपने रिपब्लिकन पक्षाला समर्थन दिले होते. बसपचे बांधीव मतदार आहेत. विदर्भात त्यांची संख्या जास्त आहे. २००४च्या व २००९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसपने आश्चर्यकारक मते घेतल्याने त्याचा बऱ्याच मतदारसंघांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला होता.