केंद्रात पूर्ण सत्ता देऊन जनतेने भाजपला कुर्ता दिला. विधानसभा निवडणुकीत पायजमा द्यावा असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाणे येथे केले होते. या वक्तव्याची खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पायजमा कशाला नागपूरची अर्धी चड्डी आहे ना अशी उपरोधिक टीका करीत संघावर पुन्हा शरसंधान केले.  
कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना रा. स्व. संघाची मते ब्राह्मण कार्ड चालवून मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी खासदार आनंद परांजपे यांच्या प्रयत्नांना शरद पवार यांनी संघावर घसरून पुन्हा सुरुंग लावला असल्याची कुजबुज
कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मेमधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण मतदारसंघात आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी भाजपवर टीका करताना अध्र्या चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का असा प्रश्न करून संघाचे वर्चस्व असलेल्या डोंबिवली परिसरातील स्वयंसेवकांना डिवचले होते. या विधानाची संघाने गंभीर दखल घेऊन लोकसभा निवडणुकीनंतर
‘तुमचे अस्तित्व काय ते आम्ही दाखवून देऊ’ असे प्रत्युत्तर दिले होते. पवार यांनी संघावर टीका करताना आनंद परांजपे यांनी ब्राह्मण कार्ड चालवून जमा केलेल्या मतांच्या बेगमीला सुरुंग लावला होता. त्याचा काही प्रमाणात फटका परांजपे यांना बसलाही. आताही शरद पवार यांनी संघाविषयी तिरकस विधान करून बालट ओढून घेतले आहे.
कल्याणमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पवार शहरात आले होते. कोणाला किती बहुमत मिळेल याविषयी आता जे निवडणूक अंदाजाचे वारे वाहत आहेत. तो निवडणूक तंत्राचा एक भाग आहे. विशिष्ट पक्षाला झुकून हे अंदाज काढले जात आहेत.  विधान परिषदेवर निवडून गेलेले मुख्यमंत्री होण्याची राज्यात परंपरा आहे. जनतेतून निवडून जाऊन मुख्यमंत्री व्हावे असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता पवार यांनी दिला.