News Flash

आयुर्वेद : एकविसाव्या शतकासाठी

आयुर्वेदाच्या पुनर्माडणीच्या या प्रक्रियेला सत्तरच्या दशकात सुरुवात झाली.

प्रतिनिधिक छायाचित्र

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ 

आयुर्वेद, आधुनिक विज्ञान आणि आधुनिक आरोग्यप्रणाली या सर्वाची शक्तिस्थळे व मर्यादा यांचे अचूक भान असणाऱ्या व अभिनिवेश टाळून शांतपणे वाटचाल करणाऱ्या संशोधकांचा चमू असेल तर आयुर्वेदाचे नवजागरण नक्कीच घडू शकेल.

प्रश्न आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाचा नसून त्याच्या नवजागरणाचा आहे असे आपण गेल्या लेखाच्या समारोपात म्हटले होते. लेख प्रकाशित झाल्यावर त्यावर पडलेल्या प्रतिक्रियांच्या वर्षांवाने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला. आयुर्वेदाच्या काही पाठीराख्यांच्या दृष्टीने आयुर्वेदाला वाईट दिवस येण्यास माझ्यासारखे आधुनिकतावादी जबाबदार आहेत. ‘मेकॉलेच्या वारसदारांना’ आयुर्वेदाचे महत्त्व पटले की आयुर्वेदाचे पुनरुज्जीवन होईल असे त्यांना मनापासून वाटते. आधुनिक विज्ञानाच्या काही पुरस्कर्त्यांना मी आयुर्वेदसमर्थकांना परखड प्रश्न विचारले याचे कौतुक वाटले, कारण आयुर्वेद ही मुळात वैज्ञानिक पद्धती आहे, असे त्यांना वाटत नाही (अलीकडच्या काळात आयुर्वेदाचे मार्केटिंग ज्या प्रकाराने केले जात आहे, त्यामुळे हे मत अधिकच दृढ होत आहे.). याहून वेगळे मत असणाऱ्या अनेकांना मात्र आयुर्वेदाची सर्वागीण समीक्षा करून त्याची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालण्याची माझी भूमिका योग्य वाटते, मात्र हे पुनर्जागरण कसे होईल याविषयी त्यांच्या मनात अनेक रास्त शंका आहेत.

पुनरुज्जीवन म्हणजे जुन्याला नव्याने उजाळा देणे. त्यात जुन्याची समीक्षा नसते; वर्तमानाचा आधार किंवा भविष्याचा अदमास नसतो. आपले पूर्वज कितीही थोर असले तरी केवळ त्यांचे गोडवे गायल्याने आपले आजचे दाहक वास्तव बदलत नाही. आपला वारसा नेमका काय होता, त्यातला सकस भाग कोणता, तो क्षीण का झाला, उद्याची आव्हाने लक्षात घेऊन आपल्याला आज काय करायला हवे, त्यासाठी ‘जुन्या’ वारशाची सांगड ‘नव्या’ ज्ञानाशी कशी घालावी, हा सारा विचार व त्याप्रमाणे कृती म्हणजे नवजागरण, नवान्वेषण! हे घडवायचे असेल तर अंधभक्ती किंवा अंधद्वेष उपयोगाचा नाही. त्यासाठी हवी वैज्ञानिकाची सत्यशोधकी नम्र भूमिका.

आयुर्वेद, आधुनिक विज्ञान आणि आधुनिक आरोग्यप्रणाली या सर्वाची शक्तिस्थळे व मर्यादा यांचे अचूक भान असणाऱ्या व अभिनिवेश टाळून शांतपणे वाटचाल करणाऱ्या संशोधकांचा चमू असेल तर आयुर्वेदाचे नवजागरण नक्कीच घडू शकेल. या दिशेने आतापर्यंत झालेल्या वाटचालीचा परामर्श आपण या लेखात घेणार आहोत.

वैज्ञानिक निकषांवर खातरजमा

आयुर्वेदाच्या पुनर्माडणीच्या या प्रक्रियेला सत्तरच्या दशकात सुरुवात झाली. डॉ अशोक वैद्य हे प्रख्यात औषधक्रियाशास्त्रज्ञ (Pharmacologist) तेव्हा सिबा गायगी रिसर्च सेंटर या विख्यात बहुराष्ट्रीय कंपनीच्या संशोधन केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते. या केंद्राच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत भारतातील हजारो वनस्पतींच्या औषधी गुणधर्माचा आधुनिक विज्ञानाच्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला. प्रत्येक वनस्पती म्हणजे किती तरी रसायनांचा कारखानाच. त्यातील प्रत्येक सक्रिय औषधी घटक (active constituent) वेगळा करून, तो शुद्ध करून त्यातील औषधी गुणांची चाचणी मूषक (Mouse), उंदीर (Rat), ससा अशा प्राण्यांवर घेण्यात आली. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या बृहद् प्रकल्पाच्या अखेरीस असा निष्कर्ष काढण्यात आला की १-२ अपवाद वगळले तर या हजारो औषधी वनस्पतींमध्ये कोणतेही सुरक्षित व गुणकारी नवे औषधी घटक सापडले नाहीत. त्यामुळे हा संशोधन प्रकल्प बंद करण्यात आला. डॉ. अशोक वैद्य मात्र या निर्णयाशी सहमत नव्हते. पिढीजात वैद्यपरंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या या संशोधकाने लहानपणापासून वनस्पतींपासून बनविलेल्या औषधांची परिणामकारकता अनुभवलेली होती. परंतु आधुनिक विज्ञानाच्या मार्गाने गेले तर उत्तर चुकत होते. त्यांना जाणवले की फरक पडतोय तो संशोधनाच्या पद्धतीत. आयुर्वेदीय औषधात एकाच वेळी अनेक वनस्पतींचा विशिष्ट प्रमाणात वापर केलेला असतो. त्याउलट आधुनिक विज्ञानात प्रत्येक वनस्पतीतील सक्रिय घटक वेगळा करून तो शुद्ध स्वरूपात वापरण्यावर भर असतो. आयुर्वेदात वनस्पतीतील सर्व घटकांचा समुच्चय म्हणून विचार केला जातो, हे ध्यानात आल्यावर डॉ. वैद्यांनी पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक वैद्य अंतरकर यांच्या सोबतीने आयुर्वेद व आधुनिक विज्ञान यांचा तौलनिक अभ्यास सुरू केला व त्यातून त्यांना अनेक गुणकारी आयुर्वेदिक औषधांचा आधुनिक विज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून शोध घेता आला. या दोघा संशोधकांसमोर पहिले आव्हान होते ते आयुर्वेदिक औषधांची गुणकारिता सिद्ध करण्याचे. त्यासाठी त्यांनी असा विकार निवडला, ज्यावर आधुनिक वैद्यकाजवळ कुठलाच उपचार नाही – कावीळ. आणि प्रयोगाच्या सिद्धतेसाठी वापरली आधुनिक वैद्यकातील सर्वोत्तम पद्धत – Randomised Controlled Trial.

प्रयोगासाठी त्यांनी निरोगी स्वयंसेवकांची (volunteers) दोन गटांत विभागणी केली जे वय, वजन, प्रकृतीमान इ. निकषांवर समतुल्य होते. त्यातील प्रत्येक व्यक्तीची यकृतकार्यक्षमता मोजण्यासाठी रक्तातील एसजीओटी व एसजीपीटी या दोन विकरांचे (enzyme) प्रमाण हा निकष ठरविण्यात आला (यकृताची कार्यक्षमता मोजण्यासाठी आजही हाच निकष वापरला जातो.). यातील एका गटाला ‘आरोग्यवर्धिनी’ हे आयुर्वेदिक औषध देण्यात आले, तर दुसऱ्या गटाला तसेच दिसणारे परंतु कोणतेही औषधी द्रव्य नसणारे कृतक्-औषध (Placebo) देण्यात आले. कोणाला कोणत्या प्रकारचे (खरे की कृतक्) औषध देण्यात येत आहे, हे औषध घेणारे स्वयंसेवक किंवा त्यांना औषध देणारे तज्ज्ञ यांपैकी कोणालाच माहीत नव्हते. विशिष्ट काळानंतर प्रत्येक स्वयंसेवकाच्या रक्तातील एसजीओटी व एसजीपीटीचे प्रमाण मोजण्यात आले. तीन-चार आठवडय़ांत आरोग्यवर्धिनी घेणाऱ्या गटाची यकृतकार्यक्षमता दुसऱ्या गटाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या सुधारल्याचे संख्याशास्त्रीय पुराव्यांनी सिद्ध झाले.

शक्यता आणि इशारा

ही तर नुसती सुरुवात होती. नंतरच्या दोन दशकांत मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयातील डॉ. शरदिनी डहाणूकर, कॅन्सर रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या डॉ. सुमती भिडे व देश-विदेशातील अनेक संशोधक यांनी या पद्धतीने अनेक आयुर्वेदिक औषधींची उपयुक्तता सिद्ध केली. त्यातून पुढे विरुद्धगामी औषधक्रियाशास्त्र (Reverse Pharmacology) या नव्या ज्ञानशाखेचा जन्म झाला. त्यामुळे नवे औषध प्रयोगशाळेपासून बाजारात येण्याची दीर्घ प्रक्रिया गतिमान होण्याची शक्यता निर्माण झाली. आधुनिक विज्ञान, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र या तीन कोनांना सांधणारा सोनेरी त्रिकोण (Golden Triangle) जर अस्तित्वात आला, तर त्यातून आयुर्वेद व आधुनिक वैद्यक दोघांचाही लाभ होईल, ही संकल्पना खुद्द वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदे(सीएसआयआर)ने मान्य केली. पारिजातक (मलेरिया), अश्वगंधा (कॅन्सररोधी), गुडुची (कॅन्सरवरील उपचारांचे विपरीत परिणाम कमी करणे), कुटकी (यकृतसंरक्षण), गुग्गुळ (मेदनाशक) अशा किती तरी आयुर्वेदिक औषधींची उपयुक्तता आता आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध झाली आहे. देशात व विशेषत: परदेशात या दिशेने अतिशय मौलिक संशोधन सुरू आहे. भविष्यात तर नव्या-जुन्याच्या या संगमातून नव्या विद्याशाखा जन्माला येतील आणि आयुर्वेदिक औषधांची कार्यपद्धती रेण्विक जीवशास्त्राच्या (Molecular Biology)च्या परिभाषेतूनही मांडता येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

वरील उदाहरणातून विज्ञान व वैज्ञानिक पद्धती यांबद्दल आपल्याला काय शिकता येईल, याचा विचार आपण पुढील लेखात करूच. पण त्यापूर्वी, एक धोक्याचा इशारा! संशोधनाच्या पातळीवर आयुर्वेदाच्या ज्ञानभांडाराची फेरमांडणी करीत असतानाच त्याच्या व्यावहारिक रूपाचा(प्रॅक्टिसचा)ही विचार करायला हवा. आज टीव्ही व अन्य माध्यमांतून आयुर्वेदाच्या नावाखाली अशी उत्पादने विकली जात आहेत, ज्यांची गुणकारिता व सुरक्षितता यांची खात्री कोणालाच देता येत नाही. दोन वर्षांपूर्वी मेनका गांधी यांनी इस्पितळात फिनाईलऐवजी गोमूत्राचा जंतुनाशक म्हणून वापर करण्याचे फर्मान काढले. गोमूत्र हे फिनाईलइतकेच प्रभावी व सुरक्षित आहे, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा हाताशी नसताना हा निर्णय घेण्यात आला. ज्या गायींचे मूत्र त्यासाठी वापरण्यात येते, त्या स्वत: निरोगी आहेत की नाही, याची खातरजमा करण्याची गरजही मंत्रिमहोदयांना भासली नाही.

परंपरेच्या अभिमानाला डोळस दृष्टी आणि मूल्यविवेक यांची साथ नसेल, तर त्यातून परंपरेचे नुकसान होते, हा धडा आपण केव्हा शिकणार?

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :

ravindrarp@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2018 2:17 am

Web Title: ayurveda for the 21st century
Next Stories
1 आयुर्वेद : विज्ञान की भाकडकथा?
2 पुराणातली वानगी 
3 प्राचीन भारतातील विमानविद्या
Just Now!
X