X
X

मानवाचे अंती एक गोत्र

आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो असे ‘विज्ञान’ माझ्या एका विज्ञानप्रेमी मित्राने मला ऐकविले.

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ 

‘यामागे मोठे विज्ञान आहे’ असे सांगत जे काही तर्क लढविले जातात, त्या तर्काना आपण आपले साधेसुधे- पण सत्यान्वेषी- प्रश्न विचारतो का? विचारल्यास  काय दिसते?

सध्या आपली मते, धारणा किंवा उत्पादने लोकांच्या गळी उतरविण्यासाठी त्यांच्यावर विज्ञानाचा मुलामा सर्रास चढविला जात आहे. त्याचे आपण काय करणार, हा मोठा कठीण प्रश्न आहे. छद्मविज्ञानाचा आपल्या जीवनातील वावर इतका वाढला आहे आणि आपल्याला त्याची इतकी सवय झाली आहे की खरे विज्ञान व छद्मविज्ञान यांच्यातील सीमारेषा पार पुसट झाली आहे आणि छद्मविज्ञानाचा वापर हा आजच्या युगातील मार्केटिंगचा हमखास यशस्वी ‘फंडा’ बनला आहे. आपली इच्छा असो व नसो, दिवसभर विविध माध्यमांतून आपल्या मनावर शेकडो संदेश येऊन आदळत असतात. त्यातले काही आपण इतक्यांदा ऐकले- पाहिले- वाचले असतात, की निव्वळ सवयीपोटी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतो. सामाजिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसृत होणारे संदेश व त्यांच्याविषयीच्या जनमानसातील धारणा यांचा जर कोणी वैज्ञानिकदृष्टय़ा अभ्यास केला तर या युगाला ‘अक्कलशून्य युग’ म्हटल्याशिवाय त्याला पर्याय राहणार नाही.

‘प्रायोजित’ विज्ञानाची अर्थनिश्चिती

कोणत्याही नियतकालिकातील विज्ञान किंवा आरोग्याविषयक लिखाण तुम्ही चाळून पाहा. दर काही दिवसांनी चहा, कॉफी, सौम्य मद्य्ो किंवा माफक प्रमाणात केलेले मद्यसेवन यांचे आरोग्यावरील होणारे ‘सु’परिणाम यांच्याविषयी एक तरी बातमी तुम्हाला वाचायला मिळेल. किंवा कधी कॉफीच्या तुलनेत चहा अधिक आरोग्यदायी आहे असा निष्कर्ष असेल, तर कधी बरोबर त्याच्या उलट. त्या संशोधनाचे प्रायोजक कोण होते हे कळले तर त्या निष्कर्षांचा अर्थ आपल्याला लावता येऊ शकेल. काही दशकांपूर्वी धूम्रपान ‘तितकेसे’ घातक नाही असा निष्कर्ष काढणारे संशोधन करविण्यासाठी व ते सर्वत्र पोहोचविण्यासाठी तंबाखू उत्पादनांच्या निर्मात्यांनी पाण्यासारखा पसा खर्च केला होता, हे जाणकारांना आठवत असेलच. आताही सामाजिक माध्यमातून वेगाने पसरविले जाणारे आरोग्यविषयक संदेश वाचले की माझ्या मनात धडकीच भरते. निव्वळ पाणी पिऊन राहणे, विशिष्ट फळाचा रस पिऊन राहणे, विशिष्ट प्रकारचा आहार किंवा व्यायाम यांच्यामुळे सर्दीपासून कॅन्सपर्यंत सर्व रोग बरे होतात व माणूस शतायुषी होतो असे ‘बिनिशगी बहुदुधी’ भासणारे उपाय त्यांत सुचविले असतात. कोणी खरोखर तसले प्रयोग करून पाहिले तर त्या व्यक्तीच्या आरोग्याचे काय होणार, हा प्रश्नही असले संदेश पाठविणाऱ्या व ते न समजता-उमजता पुढे ढकलणाऱ्या व्यक्तींना का पडत नसावा, हा प्रश्न मात्र माझा पिच्छा सोडत नाही.

विविध उत्पादनांच्या जाहिरातीत संख्याशास्त्राचा असा मजेदार वापर केला असतो, की ‘खोटे बोलण्याचे तीन प्रकार असतात- साधे खोटे, निखालस खोटे व संख्याशास्त्र’, हे वाक्य खरे वाटू लागते. एरवी ९९% ‘किटाणू’ मारणारे साबण किंवा टूथपेस्ट, तमुक टक्के अधिक गोरेपणा देणारे क्रीम्स आणि तत्सम असंख्य उत्पादने यांच्या लोकप्रियतेचा आपण काय अर्थ लावणार?

बहुतेकांना न पडणारे प्रश्न

सर्वात कहर म्हणजे ‘काय वाट्टेल ते’ विज्ञान सांगून जुन्या व्रत-वैकल्यांची भलामण करणारे ते थोर संदेश! वडाच्या झाडाभोवती गरोदर व सुवासिनी स्त्रियांनी (अर्थात हिंदू) फेऱ्या का माराव्यात याची कारणमीमांसा करताना वडाचे झाड (त्याची जागा तुळस, पिंपळ किंवा अन्य कोणतीही पवित्र मानली जाणारी वनस्पती घेऊ शकते) फक्त प्राणवायू सोडते व इतर झाडे मात्र कार्बन डायऑक्साइड सोडतात. त्यामुळे त्याच्याभोवती फेऱ्या मारल्याने स्त्रीचे (व गरोदर स्त्रीच्या पोटातील बाळाचे) आरोग्य सुधारते असा संदेश तो फॉरवर्ड करणाऱ्या असंख्य हातांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचला. वनस्पती दिवसा प्रकाशसंश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात आणि त्या क्रियेत ऑक्सिजन सोडतात इतपत खरे, पण श्वासोच्छ्वासासाठी इतर सजीवांप्रमाणे त्याही प्राणवायू घेऊन कार्बन डायऑक्साइड सोडतात, हे प्राथमिक शाळेत शिकविले जाणारे विज्ञान त्या असंख्यांपैकी कोणालाही का आठवू नये, हा प्रश्न मला छळत राहतो. असा आरोग्यदायक लाभ होणारच असेल, तर ‘गरीब बिचाऱ्या’ पुरुषांना त्यातून वगळण्यामागे प्राचीन काळी कोणा स्त्रीमुक्तीवाद्यांचा कट होता का आणि तो ‘हुश्शार’ पुरुषांना का समजला नाही, हे प्रश्नही माझ्या मनात त्यापाठोपाठ उमटतात. तीच बाब (सधवा स्त्रियांनी) कुंकू लावण्याची. कुंकू लावण्याच्या जागेच्या बरोबर मागे पिच्युटरी ग्रंथी असते. कुंकू लावण्यासाठी कपाळावर बोट टेकले तर ती ग्रंथी उद्दीपित होते व त्याचा त्या व्यक्तीच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो असे ‘विज्ञान’ माझ्या एका विज्ञानप्रेमी मित्राने मला ऐकविले. पण त्यामुळे मला पडलेल्या प्रश्नांची मालिका, उदा. नुसते बोट टेकवल्याने जर आरोग्याचे फायदे मिळणार असतील तर मग पुन्हा कुंकू लावायची काय गरज? ते लाभ भरपूर मिळावेत यासाठी कपाळावर सतत टकटक केले तर चालेल का? पुरुषांची पिच्युटरी ग्रंथी उद्दीपित होण्याने काय नुकसान होते? शरीराच्या इतर भागांवर (उदा. कानफटात, पोटावर) प्रहार केल्यास त्या त्या भागातील ग्रंथी उद्दीपित होतात का? इ., ऐकण्यास तो थांबला नाही. कान पिळल्याने बुद्धी तल्लख होते, पुरुषाचे पाय स्त्रीने दाबले तर धनप्राप्ती होते, अशा अनेक विषयावरील (छद्म)विज्ञानाधारित विचारमौक्तिके सध्या माझा उद्धार करण्यासाठी माझ्या मन:पटलावर क्रीडा करीत आहेत.

छद्मविज्ञानाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जातिसंस्थेची भलामण. गेल्या पाच हजार वर्षांपासून, किंबहुना मानव जातीच्या उद्गमापासून जातिसंस्था अस्तित्वात आहेत, कारण ती ईश्वरनिर्मित. म्हणून नैसर्गिक व अपरिवर्तनीय आहे. जातिसंस्थेतील बंधनांमुळे त्या त्या जातीची (आनुवंशिक) गुणवैशिष्टय़े टिकून राहतात. त्या वैशिष्टय़ांमुळे काही जाती (जात्याच) थोर किंवा कनिष्ठ असतात.. ही व असली विधाने स्वतला उच्चशिक्षित म्हणविणाऱ्या व्यक्ती बेधडकपणे करीत असतील, तर कठीण आहे. या गुंतागुंतीच्या विषयात फारसे न अडकताही अनुवंशशास्त्र व त्याच्या जेनोमिक्ससारख्या उपविद्याशाखा त्यावर काय सांगतात हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल जेनोमिक्स’ या पश्चिम बंगालमधील संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, भारतात जातींतर्गत विवाहाची सक्ती गेल्या ६०-७० पिढय़ांपासून, म्हणजे सुमारे १२००-१४०० वर्षांपूर्वी व्यवहारात रूढ झाली. तीही प्रामुख्याने उच्च जातीतल्या स्त्रियांपुरती होती. उच्च जातीतील पुरुष अन्य जातींतील स्त्रियांशी सर्रास संबंध ठेवू शकत. म्हणजे भारताच्या ज्ञात इतिहासातील पहिल्या सुमारे दोनतृतीयांश काळात जातींमधली सरमिसळ ही नित्यनेमाने घडणारी बाब होती. आद्य स्त्रीचा कालखंड आजच्या १,८०,००० वर्षांपूर्वीचा मानला जातो, तर आदिम पुरुषाच्या पहिल्या पाऊलखुणा १,४०,००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या तुलनेत १२००-१५०० वर्षे हा कालावधी मानव जातीच्या उत्क्रांतीच्या मानाने अतिशय क्षुल्लक आहे. त्यामध्ये कोणतेच महत्त्वाचे आनुवंशिक बदल घडणे शक्य नाही. किंबहुना जात व तिची वैशिष्टय़े ही बाब कोणत्याही वैज्ञानिक निकषांवर टिकणारी नाही.

खरे तर पृथ्वीवरील मानवांची बाह्य रूपे कितीही भिन्न असली तरी त्यांचा डीएनए ९९.९९ टक्के एकसारखा आहे.

नुकतीच माझ्या एका तरुण मित्राने आपली जेनोमिक कुंडली बनवून घेतली, त्यासाठी त्याने आपल्या लाळेचा नमुना जेनोमिक संशोधन करणाऱ्या एका संस्थेकडे पाठविला. त्या कुंडलीनुसार त्याच्या आनुवंशिक गुणधर्मात ५६ टक्के नर्ऋत्य आशियाचे, २६ टक्के आग्नेय आशियाचे, १२ टक्के भूमध्य भागाचे, तर सहा टक्के उत्तर युरोपचे गुणधर्म सापडले. इतकेच नाही तर त्याच्या डीएनएमध्ये निएन्दरथल (Neonderthal’)  व देनिसोवान (Denisovan) या आता नष्ट झालेल्या प्रजातींचाही अंश सापडला आहे. आपल्यापैकी कोणीही आपली जेनोमिक कुंडली बनवून घेतली तर ती (अगदी शुद्ध रक्ताच्या कडव्या अभिमान्यांच्या बाबतीतही) फारशी वेगळी नसेल.

कविवर्य विंदा करंदीकरांनी सांगितलेले ‘मानवाचे अंती एक गोत्र’ हे केवळ काव्यमय सत्य नसून ते अत्याधुनिक विज्ञानाच्या कठोर निकषांवर सिद्ध झालेले वैज्ञानिक सत्य आहे. आपण ते अंगीकारले, तर आपणा सर्वाचे जीवन किती सुसह्य व आनंदी होईल. पण हे सत्य स्वीकारण्याची आपली तयारी आहे का?

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :

ravindrarp@gmail.com

20
Just Now!
X