News Flash

अश्मेंधन-पूर्व तांत्रिक करामती

घट म्हणजे मडके आणि पट म्हणजे कापड. हे दोन्ही संघात (कॉम्पोझिट्स) आहेत.

जिला पहिली औद्योगिक क्रांती म्हणतात तिचे नाव, अश्मेंधन (दगडी कोळसा आणि पेट्रोलियम) – ऊर्जा-क्रांती, असे ठेवायला हवे. अगदी आधुनिक काळातही अमेरिकेत चक्क गुलामगिरी चालू होती. गुलामांची मुक्तता होण्यामागे, फक्त स्वातंत्र्यवादी विचार नसून, ही नवी ऊर्जा उपलब्ध होणे हे भौतिक कारणही होते.

तंत्रांमधील मुख्य युक्ती आपल्याला गणित आणि विज्ञानाची परिभाषा न वापरताच समजू शकते हे आपण गेल्या वेळी पाहिले. या करामती कोणतेही नियोजन न करता कारागिरांनी सुटय़ा, त्यांच्या क्षेत्रापुरत्या आणि अचानक केल्या. आजही सुटय़ा सुटय़ा व्यक्ती नवमार्ग शोधन (इन्होव्हेशन्स) करत आहेतच. एक करामत करताना पुढच्या अनेक करामतींची वाट मोकळी होत असते हे त्या त्या वेळेला माहीत नसे. एका क्षेत्रातील करामत ही दुसऱ्या क्षेत्रात थेट किंवा तत्सम स्वरूपात कामी येते, हेही कोणीच योजलेले नसे. जे अशक्य ते शक्य आणि जे महाग ते स्वस्त झाले की करामत रुळत असे. आर्केमेडीजने बनवलेला पाहिला पंप ‘आटे’ किंवा मळसूत्र (हेलिक्स) या पुढे महत्त्वाच्या ठरलेल्या तत्त्वावर चालत असे. हे तत्त्व किती क्षेत्रांत पसरेल याची आर्केमेडीजलाही कल्पना नव्हती हे लक्षणीय आहे. उद्योग ‘करावा’ लागतो. विकास ‘होत जातो’!

घट म्हणजे मडके आणि पट म्हणजे कापड. हे दोन्ही संघात (कॉम्पोझिट्स) आहेत. घटक म्हणजे कॉम्पोनंट्स. नेहमीच संघाताला असे काही गुण लाभतात की जे घटकांमध्ये अजिबातच सापडत नाहीत. यांना उद्भुत गुण (इर्मजट प्रॉपर्टीज) म्हणतात. निरनिराळ्या वस्तूंना तोडून (भंजन) वेगळ्या प्रकारे जोडणे (युंजन) असे करतच काम चालू असते. जसे की ओंडका- फळ्या- कपाट. रासायनिक बाबतीत, विडय़ात काहीच लाल नसले तरी विडा लाल रंगतो, हे उद्भुत गुणाचे उदाहरण चार्वाकांपासून प्रसिद्ध आहे.

कापडात (पट) धागे असतातच पण कापडपणा येतो तो त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे. तसेच घटाचेही आहे. तत्त्वचच्रेतसुद्धा संघात या गोष्टीवर बराच विचार झाला आहे. त्यामुळे तत्त्वचच्रेला ‘घटपटादि खटपट’से टिंगलवजा नावही पडलेले आहे. वैशेषिक हे दार्शनिक केमिस्ट्रीच्या बरेच जवळ पोहोचले होते. मडके भाजले जाते तेव्हा मातीचे कण एकमेकाला का बांधले जातात? याच्या दोन उपपत्ती पिलूपाकवाद आणि पिठरपाकवाद म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. ‘मोक्षमेव लभते’ या घोषणेमुळे, तत्त्वचर्चा व्यावहारिक बाबींपासून तुटली, हे एक दुर्भाग्य आहे.

हातयंत्रांत सर्वात परिष्कृत असे हातयंत्र म्हणजे हातमाग. एकमेकात घुसणाऱ्या दोन ‘कंगव्यां’पासून उभ्या धाग्यांचे दोन एकाआड एक संच निघतात. ते एकमेकातून उलटसुलट आरपार जात राहतात. प्रत्येक उलटण्याअगोदर धावता धोटा आडवा धागा ओवून घेतो. हेच कापड विणकाम करून बनवायचे तर किती अवघड जाईल! (अर्थात नंतरच्या काळात विणकामाचेही यांत्रिकीकरण होजियरी या स्वरूपात झाले हा भाग निराळा.) हातमाग उद्योग गावोगावी न होता केंद्रिभूत झालेला होता. बलुतेदारांत कोष्टी हे बलुते नसते यावरून हे सहजच ध्यानात येते.

कुंभकलेचे विविध आविष्कार

ओल्या मातीला आकार देता येतो आणि दिलेला आकार भाजल्यानंतर बऱ्यापैकी भक्कम बनतो. वर्तुळ-छेद असलेल्या वस्तू फिरवून बनवता येतात यालाच आज आपण टìनग म्हणतो. टìनग हे कातकामातही चालते. तुळशीच्या खोडाला भोक असतेच. बाहेरून छान आकार देऊन एकेक तुकडा तोडत ‘तुलसीहार गळा’चे मणी आजही बनतात. मणी बनवताना फिरवण्याचे काम काहीसे रवी घुसळल्याप्रमाणे पण उलट-सुलट दोरी ओढून करतात. ही प्राथमिक ‘लेथ’ आहे. असो. पण ओली माती भाजल्यावर भक्कम-सच्छिद्र किंवा कडक-खरबरीत बनते, या गोष्टीचा उपयोग पुढे फक्त कुंभ बनविण्यापुरता मर्यादित राहिला नाही.

कच्च्या विटांऐवजी भाजलेल्या विटा आल्यावर भिंतीची जाडी बरीच कमी करता आली. पोर्सलिीन हे फक्त घरगुती भांडय़ां(क्रोकरी)पुरते मर्यादित राहिले नाही. विजेचे अ-वाहक म्हणजे इन्शुलेटर्स शक्य झाले. सहाण हे ग्राइंडिंगचे पहिले रूप. अनेक ग्राइंडिंग व्हील्स बनली. धारवाला सायकलने हे व्हील फिरवून धार लावून देतो हे आपण पाहिले असेल. शस्त्रांच्या बाबतीत धार लावणे हे किती महत्त्वाचे होते हे उघड आहे. पण कुंभकलेचा एक भन्नाट आविष्कार म्हणजे क्रुसिबल!

फौंड्रीमध्ये वितळवलेला धातू ज्या भांडय़ात व भांडय़ातून ओतता येतो त्याला क्रुसिबल असे म्हणतात. अशी कल्पना करा की लागणारे भांडे अशा धातूचे हवे की जे तेवढय़ा तापमानालाही वितळणार नाही. पण मग हा सुपर-धातू कशात वितळवायचा? ही अनवस्थाच झाली असती. पण प्रत्यक्षात कुंभकलेने वाळूचे कण एकत्र विलयन पावतात आणि खूप तापमानाला टिकणारे भांडे, बऱ्याच कमी तापमानाला बनविता येते.

यशदस्थिती म्हणजे अ‍ॅडव्हांटेज. धातू ठेवण्याला अ-धातू चालतो ही एक निसर्गत: लाभलेली यशदस्थिती आहे. हे क्रुसिबल फोडता येण्याइतके ठिसूळही असेल, पण तापमानाला टिकेल. म्हणजे दुसऱ्या अंगाने डिसअ‍ॅडव्हांटेजियस गोष्ट एका अंगाने अ‍ॅडव्हांटेजियस असली की झाले.

अशा इतर अनेक अनवस्था टळत गेलेल्या आहेत. एखादे सूक्ष्म आणि अचूक (प्रिसाईज अ‍ॅण्ड अ‍ॅक्क्युरेट) मशीन बनवायला त्याहून सूक्ष्म आणि त्याहून अचूक मशीन जर लागले असते तर मुळात एक सर्वाधिक सूक्ष्म-अचूक मशीन कोठून मिळणार होते? कमी दर्जाची साधने वापरून माणूस आपल्या कौशल्याने जास्त दर्जाची साधने बनवू शकतो हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. याला ‘बूटिंग अप प्रोसेस’ असे हल्ली म्हटले जाते. छोटी क्रेन वापरून मोठी क्रेन बांधता येते. छोटय़ा खांबाला कप्प्या लावून तसाच छोटा खांब पहिल्या खांबावर चढवता येतो आणि उंचच उंच खांब बनवता येतो. चामडय़ाच्या वस्तू अनेक आहेत. सध्या वेगळी मटेरियल्स सापडल्याने चामडेच लागेल असे नाही. पखाल आणि पोहरा यापेक्षा जास्त यांत्रिक गोष्ट म्हणजे लोहाराचा भाता.

लोहाराचा भाता : पहिला कॉम्प्रेसर

कॉम्प्रेसर ही गोष्ट तशी बरीच जुनी. लोहाराचा भाता हा कॉम्प्रेसरच असतो. आगीला जास्त ऑक्सिजन देणे एवढाच मर्यादित हेतू त्यात होता आणि आहे. परंतु खडक फोडून बोगदा काढण्यासाठी खणणारे हत्यार हेसुद्धा कॉम्प्रेसरने न्यूमॅटिक टूल म्हणून चालवता येईल ही कल्पना कोणालाच नव्हती. इतकेच नव्हे तर कापड गिरणीतला ‘धावता धोटा’ हवेचा तीव्र झोत मारून रिप्लेस करता येईल हेही बराच काळ लक्षात आलेले नव्हते. आज न्यूमॅटिक कापड गिरण्या यशस्वी ठरलेल्या आहेत. एकदा कॉम्प्रेसर जमला की तोच उलटय़ा बाजूने व्हॅक्यूम क्लीनरही होऊ शकतो अशाही सुप्त शक्यता असतात.

याहून महत्त्वाचे असे की, न्यूमॅटिक टूल्स बनविणारांना कॉम्प्रेसरने रेफ्रिजरेशन शक्य होईल याची कल्पना नव्हती! वायू दाबला की गरम होतो. तो निवू दिला आणि एकदम मोकळा सोडला तर भोवतालापेक्षा खालच्या तापमानाला जातो. हे रेफ्रिजरेशनचे तत्त्व सापडण्याने नाशवंत मालसुद्धा साठविण्यासारखा बनतो, हा अन्न उत्पादनात फार मोठा फायदा आहे.

म्हणजेच अगोदर जे योजले नव्हते असे उपयोग नंतर लक्षात येतात आणि तंत्रांची प्रगती होते. निरुपयोगी आहे म्हणून थांबणे किंवा काहीसा धोका आहे म्हणून आरपार वर्ज्य करणे असे आधुनिक काळात तंत्राबाबत केले गेले नाही. समुद्रपर्यटनाला पाप मानणे, चुकीच्या लोकांच्या हाती लागू नये या नावाखाली विद्या गुप्त ठेवणे, अशा गोष्टी बंद झाल्या आणि एकूणच ‘आक्रसलेपणा’ कमी झाला. हे तांत्रिक प्रगतीमागचे एक महत्त्वाचे रहस्य आहे. इतर अनेक क्षेत्रांतही आपण हे दाखवून देऊ शकतो. तंत्रज्ञान अगोदर निर्माण होते आणि नंतर विज्ञान त्याचा खुलासा करते अशी स्थिती, गेली ७० वर्षे हा अपवाद सोडला, तर राहिलेली आहे. गेल्या ७० वर्षांत मात्र ‘नव-विज्ञाना’तले शोध लागल्यानंतर एलईडी बल्ब, लेझर किरण, इलेक्ट्रॉनिक्समधली नवी डिव्हायसेस, यानाद्वारे पृथ्वीवर पत्ता शोधण्याची जीपीएस यंत्रणा हे टप्पे शक्य झालेत.

विविध क्षेत्रांतील माणसांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने नवसृजनाचे अनेक योगायोग घडून येतात. मॅट रिडले यांचे ‘रॅशनलऑप्टिमिस्ट’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. त्यात नोंदवलेले एक निरीक्षण असे : दोन मित्र, एक गायडेड मिसाइल्स (शुक्लकाष्ठ) बनवणारा आणि दुसरा जठर व आतडी यांचा सर्जन, योगायोगाने भेटले आणि त्यांच्या चच्रेतून आतून निरीक्षण करत काम करण्याचे म्हणजेच एंडोस्कोपीचे तंत्र सापडले. अपूर्व-संयोग हे सृजनाचे मूलतत्त्व आहे. इंटरनेटमुळे कोणीही कोणाशीही संवाद करू शकतो अशी व्यवस्था सृजनाला जास्त वाव देणारी आहे हे उघड आहे. मॅट रिडले म्हणतात, ‘उत्क्रांतीत जे स्थान ‘सेक्स’ला आहे तेच स्थान विकासात विनिमयाला, म्हणजेच व्यापाराला, आहे!’

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे स्वातंत्र्यसमृद्धीसवरेदयवादीआंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 2:02 am

Web Title: first industrial revolution development in technologies archimedes
Next Stories
1 शीड : ‘उघड/मिट’ अ‍ॅम्प्लिफायर!
2 दगड-दांडा-दोरी आणि टोपली वगैरे
Just Now!
X