मराठी साहित्य विश्वाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. त्यात मायमराठीची पताका सातासमुद्रापार जाण्यापासून तर इंग्रजीच्या अतिवापरामुळे टोकाची उपेक्षा झेलण्यापर्यंत अनेक बदलांची ही भाषा साक्षीदार आहे. परंतु २०१९ या सरत्या वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या मराठीच्या पालक संस्थेच्या एका चुकीमुळे मराठीच्या उदार प्रतिमेवर संकुचिततेचा ठपका लागला. ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भातील यवतमाळात आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी साहित्य महामंडळाने इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित केले होते. मराठीचे अभिजात श्रेष्ठत्व इतर भाषिक लेखकांपर्यंत पोहोचावे आणि इतर भाषिक लेखकांच्या योगदानाची मराठीला ओळख व्हावी, यासाठी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नयनतारा सहगल यांचे नाव आयोजकांना सुचवले होते. आयोजकांनीही ते मान्य केले होते. परंतु संमेलन तोंडावर असताना ऐन वेळी नयनतारा यांचे निमंत्रण परत घेण्यात आले. नयनतारा यांचे भाषण वादग्रस्त होईल, या भीतीपोटी हे पाऊल उचलल्याचे नंतर आयोजकांनीच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. यानंतर महामंडळाच्या जाहीर निषेधाचेही सोहळे पार पडले. आता उस्मानाबाद येथे आयोजित ९३ व्या साहित्य संमेलनाची तुतारी निनादत असतानाही नयनतारांच्या अपमानाच्या निषेधार्थ उठणाऱ्या स्वरांची तीव्रता कमी झालेले नाही.