मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने तयार झालेल्या पालघर मतदारसंघात चमत्कार झाला. वसईचे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे बाळाराम जाधव हे वसई, विरार आणि बोईसरमध्ये मिळालेल्या पाठिंब्यामुळे निवडून आले. एका छोटय़ा आघाडीचा खासदार निवडून येणे हे तसे दुर्मीळ, पण ही किमया ठाकूर यांनी साधली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकूर यांचे दोन आमदार निवडून आले. एक खासदार आणि दोन आमदारांच्या जोरावर ठाकूर यांचे महत्त्व वाढले. पुढील निवडणुकीत ठाकूर यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक राहणार आहे. ठाकूर यांच्या खासदाराने यूपीए सरकारला दिलेला पाठिंबा किंवा दोन आमदार राज्यात आघाडी सरकारबरोबर असल्याने पुढील निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, ही ठाकूर यांची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची अवस्था फारच कमकुवत आहे. पालघरचा अपवाद वगळता जिल्ह्य़ात काँग्रेसचा एकही आमदार नाही. त्यातूनच जिल्हा विभाजन करून पालघर जिल्याची निर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पालघर स्वतंत्र जिल्हा झाल्यास काँग्रेसला बरे दिवस येतील हे त्यामागचे गणित आहे. पण राष्ट्रवादीने खोडा घातल्याने पालघर जिल्हा निर्मितीस मुहूर्तच मिळत नाही. जिल्ह्य़ातील काँग्रेसची नेतेमंडळी हा मतदारसंघ ठाकूर यांना सोडण्याच्या विरोधात आहेत. पाच वेळा खासदारकी भूषवूनही जिल्ह्य़ावर स्वत:चा काहीही ठसा उमटवू न शकलेल्या निष्क्रिय अशी प्रतिमा असलेल्या दामू शिंगडा यांनाच पक्षाने पुन्हा संधी दिल्यास काँग्रेसचे काही खरे नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्येच आहे. भाजपमध्ये माजी खासदार आणि विद्यमान आमदार चिंतामण वनगा यांच्याऐवजी विष्णू सावरा यांचे नाव चर्चेत आहे. निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यास काँग्रेसला ते फायदेशीर ठरू शकते. सध्या तरी काँग्रेसचे नेते कोणता निर्णय घ्यायचा या संभ्रमात आहेत. ठाकूर यांना राष्ट्रवादी मदत करू शकते, पण काँग्रेसला ही मदतही राष्ट्रवादीकडून मिळणे कठीण आहे. एकूणच वसईचे ठाकूर कोणता निर्णय घेतात यावरच या मतदारसंघातील राजकारण अवलंबून राहणार आहे.
लोकसभा मतदारसंघ : पालघर
विद्यमान खासदार : बळीराम जाधव, बविआ
मागील निकाल : भाजपचे चिंतामण वणगा यांचा पराभव
जनसंपर्क
सतत जनसंपर्क ठेवण्याचा प्रयत्न असतो. वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर पट्टयात अधिक वावर असतो.
मतदारसंघातील कामगिरी :
*डहाणू-चर्चगेट लोकल सेवेचा प्रारंभ. या लोकलच्या
अधिक फे ऱ्या सुरू व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा.
*आदिवासींची अतिक्रमणे नियमित करून त्याबदल्यात
त्यांना वनपट्टे आखून देण्याचे काम.
लोकसभेतील कामगिरी
उपस्थित केलेले प्रश्न – २४०, तारांकित २२, अतारांकित २१८, १३ वेळा चर्चेत सहभाग.
एकूण हजेरी : ३१८ (३४० दिवसांपैकी)
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांवर विशेष चर्चा ’मच्छीमार, टेक्सटाइल मिल कामगारांच्या समस्यांवर चर्चा
*अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग ’डहाणू-चर्चगेट लोकलसाठी आग्रह.
निष्क्रियतेचा कळस
निष्क्रियतेचा कळस काय असतो, हे जाधव यांच्या कामगिरीकडे पाहून सांगता येईल. चर्चगेट-डहाणू लोकल सुरू करण्याचे श्रेय खासदार स्वत:कडे घेत असले, तरी त्याची प्रक्रिया ते खासदार होण्यापूर्वीच पूर्ण होत आली होती. मौनी खासदाराला निवडून दिले तर आपल्या पदरात काय पडते, याचा अनुभव सध्या मतदार घेत आहेत. झुंडशाही आणि धनशक्तीच्या जोरावर विजय मिळविल्यानंतर आपण मतदारांचे काही देणे लागतो, यावर खासदार महोदयांचा विश्वासच राहिलेला नाही. – अ‍ॅड. चिंतामण वणगा, भाजप
लोकलचा प्रश्न सोडविला
वर्षांनुवर्षे रखडलेला चर्चगेट-डहाणू लोकलचा प्रश्न सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लावल्याचे समाधान. या मार्गावर लोकलच्या जादा फेऱ्या सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न चालू आहे. आदिवासी बांधवांची अतिक्रमणे नियमित करून त्याऐवजी वनपट्टे आखून देण्यात यशस्वी ठरलो. यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला.  – बळीराम जाधव